मराठी साहित्य – मराठी कविता – ? सूर्यास्त ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? सूर्यास्त ?

 

का भिडतो हा अस्त जिवाला

नित्य पडते कोडे मनाला

का घ्यावा अस्ताचा ध्यास

अन का रूजवावा मनी ऊर्जेचा -हास

 

सतत तळपत्या सूर्यालाही

का बघावे होतांना म्लान

क्षितिजाआड दडणा-या बिंबाचे

का ऐकावे मूक गान

 

मूक  गहिरी रंगछटा

व्यापी भूतल, चराचरास

आसमंती अन् जळी घुमती

भैरवीचे सूर उदास

 

चैतन्याच्या ह्या सम्राटाचे

घायाळ करी अस्तास जाणे

सांजसावल्यांसवे कातरवेळीचे

मंदमंद पदरव हे जीवघेणे

 

उदयास्ताची मैफल

अनोख्या रंगात रंगलेली

जन्ममृत्युच्या अटळतेची

कहाणी क्षितिजावर कोरलेली

 

©  सौ. ज्योति हसबनीस