मराठी साहित्य – मराठी कविता – ? पळस ? – सुश्री ज्योति हसबनीस
सुश्री ज्योति हसबनीस
पळस
अग्नीशिखा ही भुईवरची
निसर्गाने सफाईने रोवली
रेखीव रचना किमयागाराची
आसमंत चितारून गेली
केशरी लावण्याचा
दिमाख ऐन बहरातला
मखमली सौंदर्याचा
रूबाब निळ्या छत्रातला
पेटती मशाल ही रानातली
की रंगभूल ही मनातली
प्रणयातूर ऊर्मि जणू ही
उत्सुक तप्त श्वासांतली
धगधगता अंगार क्रोधाचा
जणू आसमंती झेपावला
विखार अंतरीचा
जणू अणूरेणूतून पेटला
जणू निखारे अस्तनीचे
बाळगले विधात्याने
आणि छत्र निळाईचे
केले बहाल ममत्वाने
वाटेवरचा पळस
खुप काही सांगून गेला
ईश्वरी अगाधतेचा
अमीट ठसा उमटवून गेला
© सौ. ज्योति हसबनीस