मराठी साहित्य – मराठी कविता – ? थरार ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

? थरार ?

 

उजाडती किलबिलती रम्य सकाळ,

बागेतला हिरवा चैतन्य खळाळ

 

लाल साज ल्यालेली गोजिरी लीली

कृष्णकमळ लेवून वेल बहरलेली

 

नाजुकशी साद अचानक कानी पडली

भिरभिरती नजर त्या दिशेने रोखली

 

पानांआड दिसत होता झुपकेदार शेपटा

क्षणांत दृष्टीस पडला खारूताईचा मुखडा

 

वाकून खाली बघत तिचा चालू होता सतत ओरडा

वाळक्या काटकीला घट्ट बिलगला होता तिचा काळजाचा तुकडा

 

पाळीवर त्या माऊलीची सैरावैरा धावपळ सुरू झाली ,

पिल्लाला वाचविण्याची अखंड धडपड तिची सुरू झाली

 

करावी का मदत आपण विचार आला मनी

पण विपरित काही घडलं तर… याची भीती होती मनी

 

लोंबकळून, कसरत करून पिल्लाचा धीर खचला

तोल सावरता सावरता काटकी भवतालचा विळखाच सुटला

 

असे काही घडेल ह्याची कल्पना  होतीच

पण माऊलीच्या धडपडीला यश येईल ह्याचीही खात्री होतीच

 

काळजात धस्स झाले हो पाहता पडतांना छोटूलीला

पण कोण आनंद झाला म्हणून सांगू , बघून तिला कुमुदिनीवर अलगद विसावतांना

 

सुर्रकन् उतरून आली खाली खारूताई

कुंडापाशी डोकावून शोधू लागली पिल्लांस आई

 

बघून पिल्लांस सुखरूप माऊलीचा जीव तो निवला

अलगद पकडून लहानग्यास भर्रकन् झाडाच्या दिशेने पळाला

 

आईची माया अजोड आहे मनोमन साक्ष पटली

वात्सल्याला तोड नाही खुणगाठ पक्की बांधली

 

देव तारी त्याला कोण मारी प्रचिती याची आली

सकाळच्या त्या थरार नाट्याने सुरूवात रोमांचक झाली

 

©  सौ. ज्योति हसबनीस