मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ माझी आज्जी . . . . !☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ माझी आज्जी . . . . !☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  रचित माझी आज्जी . . . . ! भावप्रवण कविता में   निःसन्देह कविराज  जी  की स्मृतियों  में  उनकी आजी की स्मृतियाँ झलकती हैं। किन्तु, वे बरबस हमें हमारी दादी/नानी की स्मृतियों की याद दिलाती हैं। ।) 

माझी आज्जी डोकावते
भावनांच्या गोकुळात.
यशवंत, गुणवंत
लेक तिच्या काळजात .. . . . !

संस्कारांचा पारिजात

माझी आज्जी दुवा एक.
दोन पिढ्या सांधणारा
नात्यातला सेतू नेक.. . . . . !
रितभात शिकविली
मोठ्या मायेने आईला.
सदा मानूनी आपली
लेक मानली सुनेला  . . . . !
आजी माहेराची ओढ
सासरला हेलावते.
नातवांचे बालहट्ट
निगुतीने सांभाळते.. . . . . !
आजोबांच्या माघारीही
आज्जी आधाराचा हात
बोलवूनी बोलवेना
तिच्या आसवांची बात. . . . !
माझी आज्जी झंझावात
इंदिरेचे एक रूप
परंपरा सांभाळूनी
दिला जगण्या हुरूप. . . . . !
माझी आज्जी रानजाई
सुख दुःख,  दरवळ
तिच्या  आठवात आहे
बकुळीचा परीमल.. . . . . !
विजय यशवंत सातपुते, पुणे.