सुश्री ज्योति हसबनीस
पिटुनिया
बागेतल्या बहराचे, चित्र मनाशी रंगवले,
ईवल्या ईवल्या पिटुनियाला वाफ्यामध्ये रोवले ।
बघता बघता जिवांची , जवळीक की हो वाढली ,
खेळता बागडता , डहाळीत डहाळी गुंतली ।
गुंतल्या डहाळीचे डोहाळे, साऱ्यांनीच जपले
तृप्त सृजनाचे कौतुक सोहळे नजरेने टिपले ।
रंगांचे हे बंदिस्त जग ,झाले खुले सर्वांसाठी ,
फुलपाखरांचे थवे लोटती , रंगोत्सवी या रंगण्यासाठी ।
विस्मित होई मन हे बघून, विविध छटा रंगांच्या ,
नकळत जोडले जाती कर अगाध लीलेस ईश्वराच्या ।
मनमोहक रंगीत साज ल्यालेला
देखणा कोपरा बागेतला ,
मनी रंगवलेला बहर प्रत्यक्षात उतरलेला ।
© सौ. ज्योति हसबनीस
पिटुनिया चे वर्णन अप्रतिम! ईश्वरी लीला सुरेख शब्दात व्यक्त केलेल्या आहेत.