मराठी साहित्य – मराठी कविता – ? अर्धवट कविता ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अर्धवट कविता ?

 

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक  अतिसुन्दर रचना ।  निःसन्देह उनकी यह  मुक्त छंद रचना… किसी भी तरह से उनके जीवन से कम नहीं।)

 

उपवर झालेली

माझी अर्धवट कविता

योग्य शब्दांच्या शोधात

थांबली आहे अजून

वय उलटून चाललंय तरी…

 

कधी शब्द सापडलाच चांगला

तर मात्रेत बसत नाही

आणि मुक्त छंद लिहायचाच नाही

हे तर ठरवून टाकलंय मी…

 

ती मात्र हुशार निघाली

लिहिते मुक्त छंदात

शब्दही असतात

अगदी बाळसेदार

व्यासपीठावर मिरवते

टाळ्याही घेते…

 

मुक्त छंदाच्या संसारात

तिची कविता रमली आहे

आणि माझी कविता थांबली आहे

वाट पहात

आशय, विषय, मात्रांच्या प्रतिक्षेत…

 

लोक मला हेकेखोर म्हणतात

पण

कुठलीच तडजोड

चालणार नाही मला

जीवनात आणि कवितेच्या बाबतीतही…

 

जीवन आणि कविता ही

वेगळी काढता येत नाही

म्हणूनच दोन्ही कागद

कोरे आहेत अजून

एक कवितेचा आणि दुसरा माझा

याही वयात…!

 

© अशोक भांबुरे, धनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]