सुश्री ज्योति हसबनीस
अमलताश
(सुश्री ज्योति हसबनीस जी का पुष्पों एवं प्रकृति के प्रति अपार स्नेह की साक्षी है । इसके पूर्व हमने सुश्री ज्योति जी की “कदंब के फूल” एवं “गुलमोहर ” पर कवितायें प्रकाशित की थी जिसे पाठको का अपार स्नेह प्राप्त हुआ था। )
संपली शिशिराची पानगळ,
नवोन्मेषांनी बहरले भंवताल ।
रृतुबदलाचे संकेत देत,
मंद वाहे पहाट वारा ।
शिरीषाच्या फांदीतून ऊसळे,
अत्तर कुपीचा गोड फवारा ।
मंगलमय सृष्टीची शुचिता रेखी,
धवल शुभ्र वलयांकित अनंत हा
लालकेशरी पखरण करी,
गुलमोहोर राजस,अग्नीशिखेसम पलाश हा ।
घेत होते भरूनी गंध
मी श्वासाश्वासांत ,
धुंद पाऊले वाट चालती,
सृष्टीच्या स्पंदनांत ।
अवचित एका वळणावरती,
पाऊले मग अडखळली ।
देखोनि सुवर्णचित्र ते ,
नजर तयावरच खिळली ।
भार तोलत, लय साधत ,
फांदी फांदीही लवली ।
सोनपुटे लेऊन दैवी ,
हंड्या झुंबरे सजली ।
नेत्र अनिमिष टिपे
दृष्य हे लडिवाळ,
मति होई कुंठीत ,
बघूनी कांचन झळाळ ।
जणू चैत्रगौरीच्या स्वागता ,
चित्रकार तो सरसावला ।
फांदीफांदीतून झुंबरांचा ,
सुवर्ण साज हा अवतरला ।
अधोवदना ही सालंकृत तरुणी,
जणू पुढ्यात ऊभी साक्षात् ।
घरंदाज हे , अवनत रूप सोनसळी,
ठसले मम अंतर्मनांत ।
उधळून सारे ऐश्व़र्य आपले,
अमलताश हा पुढ्यात उभा ।
ऐश्वर्यसंपन्न होई परिसर सारा,
लेऊन त्याची कांचन आभा ।
© सौ. ज्योति हसबनीस
खूप छान
अतिशय सुंदर!