मराठी साहित्य – मराठी कविता – ? खरा चेहरा ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर भावप्रवण कविता । )
तिच्या डोळ्यांपेक्षा
माझा तुझ्यावरच जास्त विश्वास होता
कारण…
माझा खरा चेहरा
फक्त तूच दाखवत होतास
भाव भावनांसह…
कधी कधी मी
तिच्याही डोळ्यांत शोधायचो
माझा खरा चेहरा
पण ती लागुदेत नव्हती थांग
नेमक्या क्षणी
पापण्यांचा पडदा घ्यायची खाली
आणि
ठेवायची कैद करून…
पण तुझं मात्र तसं नव्हतं
खुल्या मनाने दाखवायचास सारं
टिपायचास साऱ्या भाव भावना
जशाच्या तशा…
माझी सुखं, दुःखं, आनंद
सारं सारं मला दिसायचं तुझ्या चेहऱ्यात
कधी कधी तुझा चेहरा
वाटायचा मळकट
मी फिरवायचो आरश्यावरून बोळा
आणि काय आश्चर्य
तू करून टाकायचास
दोन्हीही चेहरे
एकसारखे स्वच्छ…
आज मात्र तू भासलास
तिच्या सारखा
रक्ताचा मागमूसही न ठेवता
किती ओरखडे काढलेस चेहऱ्यावर…
विश्वास आणि आरशाला तडे गेले
की हे असेच होणार…
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८