कविराज विजय यशवंत सातपुते
☆ अक्षय तृतीया ☆
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा अक्षय तृतीया पर्व पर रचित कविता “अक्षय तृतीया “।)
अक्षय सुखाची वैशाख तृतीया
पर्वणी साधुया मुहूर्ताची ….!
शुभदिन योग शुभ मुहूर्ताचा
दानधर्म साचा फलदायी. …!
गहू, हरभरे जवस नी सातू
दानधर्म हेतू साधियेला. …!
पितृश्राध्द कर्म मिष्टान्न भोजन
हवन, तर्पण लाभदायी. ….!
जडजवाहीर सुवर्ण लंकार
शुभकार्य द्वार उघडिले.. . !
स्नेहबंध वृद्धी नामजप सिद्धी
अक्षय प्रसिद्धी सामावली.
अक्षय तृतीया शुभारंभ योग
कर्मफल भोग अविनाशी. . . . !
चैत्रगौरी सण आनंदी सांगता
समृद्धी मागुता प्रवेशली.. . !
संकल्प आरंभ आनंद वर्धन
सौभाग्य दर्पण अंतरात . . . . !
अक्षय तृतीया ठेवा मांगल्याचा
कर्म साफल्याचा शुभदिन. . . . . !
सुख, स्नेह, शांती अक्षय रहावी
त्रिसूत्री जपावी स्नेहमयी.
विजय यशवंत सातपुते, पुणे.