मराठी साहित्य – मराठी कविता – ? सज्ञान रंग ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक भावप्रवण कविता । )
रंगात कोरड्या मी भिजणार आज नाही
रंगात ओल ज्या ते गालास लाव दोन्ही
ठेवीन हात धरुनी हातात मीच क्षणभर
तो स्पर्श मग स्मृतींचा राहो सदैव देही
छळतील डाग काही सोसेल मी तयांना
हे रंग जीवनाचे नुसते नको प्रवाही
ते रंग कालचे तर बालीश फार होते
सज्ञान रंग झाला सज्ञान आज मीही
जातीत वाटलेले आहेत रंग जे जे
ते रंग टाळण्याची मज पाहिजेल ग्वाही
ते पावसात भिजले आकाश सप्तरंगी
त्यातील रंग मजवर उधळून टाक तूही
रंगात रंग मिळता जन्मेल रंग नवखा
येथे नव्या दमाने खेळेल रंग तोही
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८