मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ आकार …..! ☆ श्री सुजित कदम
श्री सुजित कदम
(श्री सुजित कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)
☆ आकार …..! ☆
फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देताना
आयुष्याचा आकार नेहमीच चुकत गेला….
आख्खं आयुष्य गेलं
ह्या फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देण्यात
पण हे चाक कधी मला हवं तसं
फिरलंच नाही
आणि परिस्थितीला हवा तसा
आकार मला कधी देताच आला नाही
माझी लेकरं लहान असताना
त्यांची कित्येक स्वप्न मी
नाईलाजास्तव माझ्या
पायाखालच्या चिखलात तुडवत गेलो
आणि त्याच्याच स्वप्नांच्या चिखलाची
त्यांच्यासाठीच
मला हवी तशी स्वप्न दाखवत गेलो
पण आता इतकी वर्षे संभाळून ठेवलेल्या
परिस्थितीचा घडा आता
हळूहळू पाझरू लागलाय
पायाखालचा चिखलही
आता पहील्या पेक्षा कमी झालाय
कारण आता…
लेकरांनी
आपआपल्या स्वप्नांचा चिखल
आपआपल्या पायाखाली तुडवायला सुरवात केलीय
पुन्हा नव्याने परिस्थितीला
त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी….
© सुजित कदम, पुणे