मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ शिंपल्यातला मोती ☆ –श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है वरिष्ठ साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर भावप्रवण कविता । )
फेसाळत ना वरती आलो
शिंपल्यातला मोती झालो
अंधाराची सोबत होती
तरी उजळलो गोरा झालो
वस्त्रामधली उब मी व्हावे
जीवन सारे तुझे पहावे
लपटावे तू मला म्हणुनी
तागा झालो दोरा झालो
शब्दांमधले अर्थ कळाया
हवीत नाती घट्ट जुळाया
शब्द चुकीचा नको जायला
म्हणून कागद कोरा झालो
तिचे वागणे तापट आहे
केला माझा पोपट आहे
तापमान हे जरा कळावे
म्हणून मीही पारा झालो
कोमल भिंती हृदयाच्या ह्या
तुझ्या स्मृतीने फुटती लाह्या
जन्मठेप ही तुला मिळाली
तुझ्याचसाठी कारा झाले
पाठीवरचे केस मोकळे
शांत पहुडले जणू सापळे
जीव फुंकणे माझ्या हाती
त्यांच्या करिता वारा झालो
अक्षर आहे अक्षर राहो
फोडित नाही उगाच ठाहो
देशावरच्या प्रेमापोटी
भारतमाता नारा झालो
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८