मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ कस्तुरी ☆ –श्री अशोक श्रीपाद भांबुरे
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है वरिष्ठ साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर भावप्रवण कविता । )
☆ कस्तुरी ☆
डोळ्यांत चांदण्यांचे आकाश पेलले मी
अपराध एक झाला सूर्यास टाळले मी
पाऊस ना तरीही डोळ्यांत पूर कुठला
गळक्याच पापण्यांचे हे दार लोटले मी
एकेक रात्र येथे वाटे युगायुगाची
स्वप्नात रोज माझ्या काटेच वेचले मी
ना कस्तुरी कुठेही श्वासात गंध तुझिया
क्षण तेवढे सुखाचे मोजून ठेवले मी
आजन्म सोसला मी येथे जरी उकाडा
छाया तुझी मिळाली ग्रीष्मात नाचले मी
त्यांच्या मनात होते जे डाव क्रूर काही
त्या सभ्य चेहऱ्यांच्या डोळ्यांत वाचले मी
हे रान केवड्याचे सांभाळले परंतू
नव्हता इलाज तेव्हा हे नाग ठेचले मी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८