मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ वृक्षवल्लरी लावुचला ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। आज प्रस्तुत है उनकी पर्यावरण सुरक्षा एवं वृक्षारोपण का अतिसुन्दर संदेश देती हुई मधुर कविता “वृक्षवल्लरी लावुचला”।)
☆ वृक्षवल्लरी लावुचला ☆
चला चला रे चला चला
वृक्ष वल्लरी लावु चला !!धृ.!!
हरितगृहाच्या मखमालीची
खुलली दालने धनदौलतीची
प्रदूषणाला पळवून आपण
वाचवू ओझोन वायूला !!१!! चला चला रे ….
वटवृक्षाची आगळीच शान
हिरव्या हिरव्या पानांत बुंदके लाल छान
वटपौर्णिमेला ह्यालाच मान
आधारवड हा पांतस्थांचा पक्षीगणांचा
रक्ष त्यांचे करु चला !!२!!चला चला रे…
कल्पवृक्ष हा मूळ कोकणी
गोड खोबरे मधुरचि पाणी
अघटित ही देवाची करणी
तेल तूप अन् सुंदर शिल्पे
तयापासुनि बनवू चला !!३!! चला चला रे…
आम्रवृक्ष हा भव्य देखणा
आम्रमंजिरी मोहवी मना
घमघमाट हा दरवळे वना.
आम्ररसाच्या मधुर सेवना
आपण सारे आता पळू चला !!४!! चला चला रे…
मृदंग जैसा फणस देखणा
वरि काटे परि आत गोडवा
निसर्गातला अगम्य ठेवा
कोकणातला अमोल मेवा
फणसगरे आता खाऊ चला !!५!! चला चला रे..
साग शिशीर उंबर पिंपळ
चंदन चंपक. करंज जांभूळ
हिरडा बेहडा बकुळ बहावा
घाटामधुनि तया पहावा
दर्शन त्यांचे करु चला !!६!!चला चला रे…
पळस पांगारा काटेसावरी
शोभून दिसते उंच डोंगरी
पहा फुले ती लाल केशरी
या दिव्य सृष्टीदेवतेपुढे
नतमस्तक होऊ चला ७!!चला चला रे…
निसर्ग आपुला मित्र म्हणूनी
दोस्ती तयासी घट्ट करोनी
वर्धन रक्षण मित्रांचे या
आनंदाने आपण करु चला !!८!!चला चला रे…
©®उर्मिला इंगळे, सातारा