सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 128
☆ गझल… ☆
अशा वेळेस पूर्वीचे बहाणे शक्य नाही
तरीही मी मला विसरून जाणे शक्य नाही
म्हणे अनयास राधा वागले धुंदीत एका
गळ्याशी दाटलेले गीत गाणे शक्य नाही
तरूणाईत मी दर्यात त्या पोहून आले
नदीनाल्यामधे आता नहाणे शक्य नाही
अशा वेळेस एकाकी करावे काय आता
विषारी वल्लरीचे मूळ खाणे शक्य नाही
जरी केला गुन्हा प्रीतीस साक्षात्कार म्हटले
झिजावे चंदनासह मी? सहाणे, शक्य नाही
दिशा अंधारल्या दाही दिसेना आज काही
उजेडाचे नवे घेणे उखाणे शक्य नाही
अरे कृष्णा कशाला नाद हा केला खुळा रे
प्रवाही कोणत्याही मी वहाणे शक्य नाही
© प्रभा सोनवणे
१५ /१६ एप्रिल २०२२ – सिंगापूर
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈