सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 130
☆ गझल… ☆
तुझी आमंत्रणे स्वीकारणेही मानवत नाही
तुला भेटायला येणे तरीही सोडवत नाही
तुझ्याशी मारल्या गप्पा कधी काळी भरोश्याने
अताशा बोलते आहेस जे ते ऐकवत नाही
सखे नाते जिव्हाळ्याचे तसे नव्हतेच तेव्हाही
परी होते सुगंधी वाटले ते दरवळत नाही
तुझ्या माझ्यात ना काही टिकावू , शाश्वतीचेही
पहाता आठवू काही मुळीहीआठवत नाही
तुझे ही नाव घेताना कृतज्ञच होत राहो मी
दिले होतेस जे काही कधीही विस्मरत नाही
उन्हाने तापला रस्ता जरासा गारवा लाभो
उकाडा होत असताना कुठेही का पडत नाही
अरे तू मेघराजा ना, धरित्री मारते हाका
असा दाटून आलेला तरी का कोसळत नाही?
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद हेमंत सर !