सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 132
☆ काहूर… ☆
माझ्या मनीचे काहूर
कुणा सांगू सईबाई
असे एकाकी हा जीव
जशी अंगणात जाई
जशी अंगणात जाई
अंगोपांगी फुलारते
मनी सुगंधाची कळी
अपसूक उमलते
अपसूक उमलते
निळे कमळ पाण्यात
गतकाळाचे तरंग
कसे दाटती डोळ्यात
कसे दाटती डोळ्यात
जुन्या आठवांचे थवे
भाग्य तेच तेच लाभे
फक्त जन्म नव नवे
© प्रभा सोनवणे
१६ मे २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈