सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 133
☆ गझल… ☆
सदा तेच क्षण डोळ्यांमध्ये
तुझे जागरण डोळ्यांमध्ये
टिपू काय ती मी ओठांनी
सुरेख पखरण डोळ्यांमध्ये
नकोय अंजन आता कुठले
तुझीच झणझण डोळ्यांमध्ये
तुला सजवले मी हृदयाशी
दिसे समर्पण डोळ्यांमध्ये
दिवे कशाला लावू आता
सदैव औक्षण डोळ्यांमध्ये
अथांग सागर मनीमानसी
ते गहिरेपण डोळ्यांमध्ये
भाषा अवगत कशी जाहली?
दिसे व्याकरण डोळ्यांमध्ये
जरी मला तू ओढ लावली
पण आकर्षण डोळ्यांमध्ये
सगळे तो ही स्वच्छ दाखवी
बिलोर दर्पण डोळ्यांमध्ये
© प्रभा सोनवणे
२० मे २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈