सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 135
☆ गाव आठवांचा एक… ☆
गाव आठवांचा एक
रोज स्वप्नात दिसतो
दिसे डोंगर साजिरा
सूर्य जाताना हसतो
सूर्य जाताना हसतो
पश्चिमाही लालेलाल
सांज सावळी होताना
वारा पुसे हालचाल
वारा पुसे हालचाल
वृक्ष वेली धुंदावती
आल्या गेल्या पाहुण्यांशी
चूली पेटत्या बोलती
चूली पेटत्या बोलती
येतो गंध भाकरीचा
बेत फक्कड असावा
वास छान ओळखीचा
वास छान ओळखीचा
येते दाटून ही भूक
माय प्रेमाने वाढते
याला म्हणतात सुख
याला म्हणतात सुख
ओटी भरून घेतले
आणि गावाच्या बाहेर
नवे शहर गाठले
नवे शहर गाठले
परी गाव खुणावते
त्या पाण्यात पाटाच्या
अनवाणी घोटाळते
अनवाणी घोटाळते
कधी बोरी बाभळीशी
सांगा विसरू कशी मी
आहे नित्य हृदयाशी !
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈