सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 141
☆ सांज… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
सांज अशी सजलेली
पसरली स्वर्ण लाली
क्षितिजावर आतुरतेने
शब्दांचे मंजुळ पक्षी!
सांज अशी नटलेली
जणू शेला पांघरलेली
शब्दांचा लेवून साज
अवतरली कोण नीलाक्षी?
सांज अशी मंतरलेली
शब्दकळाच अंथरलेली
प्रतिभेच्या रुजाम्यावरची
अतिसुबक साजिरी नक्षी!
सांज अशी मोहरलेली
मोहरलेली घेवून रंग गुलाबी
शब्दांचे मेघ बरसले
अन तरारली गुलबक्षी!
सांज अशी अवतरली
अप्सराच कुणी थिरकली
फुलवून शब्द पिसारा
नाचली धुंद मयुराक्षी
सांज उतरली खाली
दशदिशात काजळलेली
शब्दांचे तोरण झुलते
गगनाच्या विशाल वक्षी !
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈