सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 142
☆ प्रयाण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(जुन्या डायरीतून…१ जानेवारी १९९७)
ती एकटीच निघाली आहे
दूरच्या प्रवासाला
रिक्त हाताने—
मुक्तपणे–फकिरीवृत्तीने
ती तोडू पहाते आहे–
तिच्या आयुष्याला जखडणारे
साखळदंड!
भीती एकच–
ती जिथे चालली आहे
तिथे असेल का माणसांचेच जंगल?
इथल्या सारखे तिथेही भेटतील का?
काही कनवाळू अन्
प्रेमळ पक्षी!
भव्य पिंपळवृक्ष आणि आधारवडही —
की अधून मधून इथे आढळणा-या लांडग्या,कोल्ह्यांचे आणि साप विंचवांचेच
असेल त्या जगात वास्तव्य??
निरीच्छपणे,एकाकी वाटेने जाताना
साखळदंडाच्या ओझ्यापेक्षाही
जंगलातल्या संभाव्य धोक्याचीच भीती—
गिळून टाकते अवसान,
समर्थपणे जगण्याचे!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈