सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मीप्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
टर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवास करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो. क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे.
रोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या टाईल्सचा बेल टॉवर शोभिवंत दिसतो. एकोणिसाव्या शतकात इथे मोठा भूकंप झाला पण सुदैवाने बेल टॉवर अबाधित राहिले.
‘मार्शल टिटो स्क्वेअर’हा झाग्रेबमधील सर्वात मोठा चौक आहे.रुंद रस्ते, पुतळे, कारंजी, रेस्टॉरंटस्, मॉल्स रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या छोट्या बागा यामुळे हा चौक शोभिवंत दिसतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानातून क्रोशाचे विणकाम असलेल्या सुंदर लेस, रुमाल, ड्रेस नजाकतीने मांडले होते. तऱ्हेतऱ्हेचे टाय होते. गाईडने सांगितले की नेकटाय आणि फुटबॉल यांची सुरुवात क्रोएशियाने केली.
झाग्रेबपासून साधारण दोन तासांवर ‘प्लिटविक लेक्स नॅशनल पार्क’ आहे. अनेक डोंगर, दर्या, नद्या, धबधबे, सरोवरे असलेला हा एक खूप मोठा नैसर्गिक विभाग आहे. २९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेला प्लिटविक लेक्स परिसर फार प्राचीन काळापासून म्हणजे हिमयुगानंतर अस्तित्वात आला असे शास्त्रज्ञ म्हणतात. हा संपूर्ण विभाग चुनखडीच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. या खडकांची सतत झीज होत असते. त्यामुळे डोंगर उतारावर अनेक घळी तयार झाल्या आहेत. त्यातून जलधारा कोसळत असतात. त्यांचे अनेक लहान-मोठे तलाव तयार झाले आहेत. निळ्या-हिरव्या रंगाचं गहिरं पाणी आणि त्यात तरंगणारी पांढऱ्या स्वच्छ कापसाच्या ढगांची प्रतिबिंबे मोहक दिसतात.
गाईड बरोबर जंगलातील थोडी पायवाट चालून एका छोट्या दोन डब्यांच्या रेल्वेत बसलो. दोन्ही बाजूंना बर्च, पाइन, ओक अशा सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल होते. पाच मिनिटात गाडीतून उतरून परत चालायला सुरुवात केली. अनेक पायर्यांची चढ-उतर केली. छोट्या जंगलवाटेमधून ठिकठिकाणी निळ्या हिरव्या रंगांचे तलाव आणि त्यात अनेकांगांनी उड्या मारणारे असंख्य धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन होत होते. निसर्गाला अजिबात धक्का न लावता हे पायी चालण्याचे मार्ग तयार केले आहेत. वर्षानुवर्षे या चुनखडीच्या डोंगरांमधील कॅल्शिअम विरघळल्यामुळे ते सच्छिद्र झाले आहेत. या सातत्याने होणार्या प्रक्रियेमुळे या डोंगरातून येणारे झरे, धबधबे यांचा प्रवाह बदलत राहतो. वाहून गेलेल्या कॅल्शिअमचे पुन्हा लहान-मोठे दगड, बंधारे बनतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा ओघ बदलत राहतो. मोठे धबधबे निर्माण होतात. इथल्या लहान-मोठ्या सोळा सरोवरांपैकी एका सरोवरातून यांत्रिक बोटीतून फेरफटका मारला. किनाऱ्याजवळील मातकट रंगाच्या पाण्यातून बोट निळसर हिरव्या नितळ पाण्यात शिरली. किनाऱ्यावरील उंच, हिरव्या वृक्षांची छाया त्यात हिंदकळू लागली. गार गार वाऱ्याने शिरशिरी भरली होती. चालून चालून पाय दमले होते पण डोळे आणि मन तृप्त झाले होते.
घनदाट सूचिपर्ण वृक्षराजी आणि अनेक प्रकारच्या ऑर्किड्सनी समृद्ध अशा इथल्या जंगल दऱ्यांमध्ये जैवसमृद्धी आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, वटवाघळे, तपकिरी अस्वल आणि अन्य वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक सहजीवनाचे अस्तित्व कसोशीने जपलेले आहे वृक्षांच्या जुन्या ओंडक्यांचा उपयोग करुन त्यापासून लाकडी बाके, कडेचे लाकडी कंपाउंड, उपहारगृहांचे लाकडी बांधकाम, पाय वाटेवरून घसरू नये म्हणून बसविलेल्या लाकडाच्या गोल चकत्या सारं तिथल्या निसर्गाशी एकरूप होणारं आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, केबल कार,बोट रोईंग अशा अनेक प्रकारांनी धाडसी तरुणाई इथल्या निसर्ग वैभवाचा मुक्त आनंद घेत होती. प्लिटविक लेक्स नॅशनल पार्कला युनेस्कोने १९७९ साली वर्ल्ड नॅचरल हेरिटेज…. जागतिक नैसर्गिक वारसा संपत्ती असा दर्जा दिला आहे .
क्रोएशियाला शास्त्रीय संशोधनाची महान परंपरा आहे. आज दैनंदिन व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा सहजतेने वापर करतो त्यातील कितीतरी महत्त्वाचे शोध येथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ( Nikola Tesla १८५६–१९४३) यांनी लावले आहेत. त्यांची प्रयोगशाळा व ऑफिस असलेली इमारत झाग्रेब इथे बघायला मिळाली.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये डायरेक्ट करंटचा (DC ) शोध लावला त्याच वेळी निकोला टेस्ला यांनी अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंटचा (AC ) शोध लावला. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या वापरामध्ये सुरक्षितता, सहज वहन व किमतीमध्ये बचत झाली. नुसते बटण दाबून इलेक्ट्रिकचे दिवे लावताना आपण निकोला टेस्ला यांची आठवण ठेवली पाहिजे. टीव्ही चॅनल्स बदलताना, एसी लावताना आपण रिमोट कंट्रोलचा वापर करतो त्याचे संशोधन निकोला टेस्ला यांचेच. फ्रीज, मिक्सर, वाशिंग मशीन, हेअर ड्रायर अशा अनेक वस्तू ज्यावर चालतात त्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध टेस्ला यांनीच लावला. रेडिओचा शोध प्रथम मार्कोनी यांच्या नावावर होता. पण हा शोध टेस्ला यांनीच प्रथम लावल्याचे सिद्ध होऊन १९४ ३ साली त्यांना या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. थर्मास, गॅस लायटर हेही त्यांचेच संशोधन!
त्यांच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक कारला टेस्ला असे नाव देण्यात आले आहे.
विसाव्या शतकापासून क्रोएशिया उद्योगधंदे, व्यापार, शैक्षणिक संस्था, दळणवळणाची साधने यांतही आघाडीवर राहिले आहे .मोठ्या पुलांची बांधणी, सस्पेन्शन ब्रिज, टर्बाइन्स, पॅरॅशूट जम्पिंग, आपण वापरत असलेले चष्मे हे संशोधन क्रोएशियातील शास्त्रज्ञांचे आहे. टीव्हीची सॅटॅलाइट डिश, असे अनेक महत्त्वाचे शोध लावले फाउंटन पेन चा शोध लावणारे पिकाला मास्टरयांच्या नावाची पेन फॅक्टरी अजूनही झाग्रेब मध्ये आहे .एमपी थ्री चा शोध इथलाच. क्रोएशियाच्या नवीन पिढीनेही हा वारसा पुढे नेला आहे. कार पार्किंग बाय टेक्स्ट मेसेज, सोलर पाॅवरवर चालणारा मोबाईल चार्जर बनविले आहेत. फेरारी, पोर्शे अशा कंपन्यांशी स्पर्धा करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी झाग्रेब पासून जवळच आहे. केवळ 45 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈