सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग
संध्याकाळी रिव्हर क्रूजमधून फेरफटका मारला. फोंटांका नदीच्या एका कॅनॉल मधून सुरू झालेली क्रूज, मोइका नदीतून, विंटर कॅनॉलमधून नीवा नदीमध्ये गेली आणि पुन्हा फोंटांकाच्या एका कालव्यात शिरून आम्ही किनार्याला उतरलो. क्रूज सहलीमध्ये दुतर्फा दिसलेल्या इमारती आता ओळखीच्या झाल्या होत्या. क्रूजमधील प्रवासाने सुंदर पीटर्सबर्गचा निरोप घेतला.
जिंकलेल्या प्रदेशातील उत्तमोत्तम गोष्टींचा विध्वंस करण्याची जेत्यांची प्रवृत्ती जगभर आढळते. पीटर्सबर्गमधील अनेकानेक कला प्रकार, प्रासाद शत्रूंनी नष्ट केले. पण आज ते ऐश्वर्य पुन्हा जसेच्या तसे दिमाखात उभे आहे. याची कारणे अनेक आहेत. पीटर दी ग्रेटपासून अशी पद्धत होती की, जी जी कलाकृती, पेंटिंग निर्माण होईल त्याचा छोटा नमुना व त्याची साद्यंत माहिती म्हणजे वापरलेले मटेरियल, त्याची रचना, मोजमाप वगैरे आर्काइव्हज मध्ये जतन करून ठेवण्यात येत असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीटर्सबर्गमध्ये जशा अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, सायन्स इंस्टिट्यूशन्स आहेत तशीच एक रिस्टोरेशन युनिव्हर्सिटी आहे. वेळेअभावी आम्ही ती पाहू शकलो नाही. पण नष्ट झालेल्या कलाकृतींचे पुनर्निर्माण आणि असलेल्या वस्तू आणि वास्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी तिथे खास शिक्षण दिले जाते. याशिवाय राज्यकर्त्यांचा दृष्टिकोण आणि आर्थिक पाठबळ हेही महत्त्वाचे!
या पार्श्वभूमीवर आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आपल्याकडेही अनेक नामवंत, उत्तमोत्तम चित्रकार, शिल्पकार, काष्ठ कलाकार आहेत. सर्वश्री बाबुराव सडवेलकर,व्ही. एस. गुर्जर,ज. द. गोंधळेकर, जाधव, शिंदे, शिल्पकार करमरकर,स.ल.हळदणकर,राजा रविवर्मा, रावबहादूर धुरंधर,एम.आर.आचरेकर, गोपाळराव देऊसकर, विश्वनाथ नागेशकर, भैय्यासाहेब ओंकार, डी. जी. कुलकर्णी, संभाजी कदम अशी असंख्य नावे आहेत. काही वर्षांपूर्वी नामवंत चित्रकार सुहास बहुलकर यांचा लेख एका दिवाळी अंकात वाचला होता. दिवंगत नामवंत कलाकारांच्या कलाकृती मिळवून, त्याचे पुनर्लेपन,वॉर्निशिंग, माउंटिंग करून त्यांचे प्रदर्शन भरविणे व त्यायोगे कलाकाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देणे अशा उद्देशाने त्यांनी अनेक कलाकारांच्या, माळ्यावर धूळ खात पडलेल्या कलाकृती मोठ्या कष्टाने मिळविल्या. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करणारे, निराशाजनक होते. वर्तमानपत्रातून जे.जे. महाविद्यालयातील चित्रांची, पुतळ्यांची हेळसांड, बेपर्वा वृत्ती, राजकारण हे सारे वाचून वाईट वाटते. हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. कलाकारांना आर्थिक काळजीतून मुक्त ठेवणे हे समाजाचे, सरकारचे काम आहे. या चित्रांचा, कलाकृतींचा सांभाळ, डागडुजी,पुनर्लेपन, वॉर्निशिंग,जपणूक, यासाठी शास्त्रोक्त शिक्षण आवश्यक आहे. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. राजकारण विरहीत राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठिंबा व सामान्य नागरिकांचा सहभाग असेल तरच हे सांस्कृतिक वैभव सांभाळले जाईल. आपला भारत हा सुद्धा ‘ऐश्वर्यसंपन्न’ देश आहे. प्रत्येकाने हे ऐश्वर्य सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
पीटर्सबर्ग समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈