सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग २ ✈️

रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचीनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटरच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा, हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतले. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबल खुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहीलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्टस्साठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचं बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकुन राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनिसाकडून कळलं की तो पांढराशुभ्र मऊ,मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे.  त्याचंच एक बेट तयार झालेलं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही.गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व निरनिराळ्या रंगांचे लहान-मोठे मासे, सी ककुंबर यांचं दर्शन झालं.

कालपिनी बेटावर परत येऊन जेवण व विश्रांती झाली. नंतर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काचा मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडुका होता. ‘भारत मेरा देश है’म्हणंत नाच चालू होता. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता. नंतर आम्हाला तिथल्या होजिअरी फॅक्टरीत नेलं. तिथे बनविलेले टीशर्ट तसेच शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू , किसलेल्या नारळाचा वाळवलेला चुरा यांची खरेदी झाली.

आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र राखाडी- काळसर झाला होता. शुक्राची चांदणी चमचमत  होती. थंडगार शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.

कोचिनपासून ४०१ किलोमीटर्स दूर असलेले ‘कवरत्ती’   हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे.( आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’ होतं.) इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या, छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स, लहान-मोठे, काळे-पांढरे, निळे, पिवळे मासे, कासवं ,शंख- शिंपले, सी ककुंबर अशी विधात्याने निर्मिलेली वेगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझिअम बघायला गेलो.  समुद्री जीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू तिथे होत्या. ॲक्वेरियममध्ये शार्कसह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते .इथे ‘लक्षद्वीप डायव्हिंग ॲकाडमी’ आहे.

केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरुमल याच्या कारकिर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात इथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होते. १७९९च्या श्रीरंगपट्टनमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली.

मुस्लिम बहुल असलेल्या या लक्षद्वीप बेटांवरील स्थानिकांचं आयुष्य तसं खडतरच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो,आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळं एवढेच उत्पन्न. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात.बोटीवरील सुसज्ज हॉस्पिटल मध्ये त्यांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचीनला नेण्यात येते. इथला ८० टक्के पुरुषवर्ग देशी-परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे, अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाचा खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.

बोटीवरचा स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसंच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेले पर्स, पाकिटं, मोबाईल यांना कसलाही धोका नाही.सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.

भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments