सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ७ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग ३
या तीनही बेटांवर आम्हाला कावळे सोडून पक्षी दिसले नाहीत. फार थोड्या गाई व कोंबडे दिसले. समुद्रपक्ष्यांच्या एक-दोन जाती मनुष्य वस्ती नसलेल्या पिट्टी बेटावर आहेत असं कळलं. लक्षद्वीप बेटांपैकी बंगाराम,तिनकारा,अगत्ती अशी बेटे परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. तिथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या गडद निळ्या, स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी,कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.
कोरल्स म्हणजे छोटे- छोटे आकारविहीन समुद्र जीव असतात. समुद्राच्या उथळ, समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनचे असे जीव त्यांच्यातील कॅल्शिअम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रीफ तयार होतात. ही वाढ फारच मंद असते. या रिफस् मुळेच किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हण़़ण्याप्रमाणे जागतिक तापमानवाढीमुळे आर्टिक्ट व अंटार्टिक यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटं समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच आहेत. त्यावर डोंगर /पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीपसमूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा एक मनुष्य वस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.
प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखे लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टी देवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेलं गडद निळं वस्त्र परिधान केलं होतं . उसळणाऱ्या पाण्याच्या लांब निर्या करून त्याला पांढऱ्या फेसाची किनार त्या समद्रवसने देवीने लावली होती.पांढऱ्याशुभ्र वाळूतील शंख, खेकडे, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या- छोट्या पायांनी सुबक, रेखीव रांगोळी काढत होते. छोट्या-छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांचे फ्लाॅवरपॉट सजले होते .अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादिअनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.
लक्षद्वीप समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈