सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग १
पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतारावर तिबेट आणि भारत यांच्यामधील छोट्याशा जागेत वसलेला भूतान हा एक चिमुकला देश! चिमुकला म्हणजे किती? जेमतेम आठ लाख लोकवस्ती असलेल्या, लांबट- चौकोनी आकाराच्या भूतानचा विस्तार ४७००० चौरस किलोमीटर म्हणजे आपल्या केरळ राज्याएवढा आहे.
मुंबईहून बागडोगरा इथे विमानाने पोहोचलो. पश्चिम बंगालमधील बागडोगरा हे भारतीय लष्कराचे मोठे ठाणे आहे. बागडोगरापासून जयगावपर्यंतचा बसचा प्रवास सुरम्य होता. सुंदर गुळगुळीत रस्ते, दोन्ही बाजुला दाट झाडी, लांबवर पसरलेले काळपट- हिरवे चहाचे मळे, भातशेती, शेलाट्या, उंच सुपार्या असा हिरवागार देखणा परिसर आहे. जयगाव हे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव संपले की एका स्वागत कमानीतून फुन्तशोलींग या भूतानच्या सरहद्दीवरील गावात आपण प्रवेश करतो. या प्रवेशद्वारातून वाहनांची सतत ये-जा असते. भूतानी वेशातील गोऱ्या, गोल चेहऱ्याच्या, शांत, हसतमुख ललनांनी हॉटेलमध्ये स्वागत केलं. लिफ्ट बंद असल्याने त्या सडपातळ, सिंहकटी पण काटक ललनांनी आमच्या सर्वांच्या अवजड बॅगा तिसऱ्या मजल्यावर पटापट वाहून नेल्या.
भूतानची राजधानी ‘थिम्पू’ इथे निघालो होतो. स्क्रूसारखा वळणावळणांचा, संपूर्ण घाटरस्ता आहे. दुतर्फा साल, महोगनी, शिरीष अशी घनदाट वृक्षराजी आहे. मध्येमध्ये लाल, पिवळी ,पांढरी रानफुलं आणि खळाळणारे झरे आपले स्वागत करतात. घाटरस्त्यावरील वाहतूक अगदी शिस्तीत चालली होती. उंचावरच्या चुखा या गावात चहापाण्याला थांबलो. हॉटेलमधून स्वच्छ पाण्याची चुखाचाखू ही नदी दिसत होती. इथे हैड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट आहे. भूतानमध्ये हैड्रोइलेक्ट्रिक पॉवरची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व निर्यात होते. ही वीज विकत घेण्यात भारताचा पहिला नंबर आहे.
दिव्यांनी उजळलेल्या राजधानीच्या शहरातील दुमजली उंचीएवढ्या बिल्डिंग्जवर लाकडी महिरपी उठावदार रंगाचे रंगविल्या आहेत. सरकारी नियमांप्रमाणे सर्व इमारती, राजवाडे, मॉनेस्ट्री यांचे बांधकाम पारंपरिक डिझाईन व स्थापत्यशास्त्रानुसार करावे लागते. भूतानमधील बहुतेक लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. सातव्या शतकात तिबेटमधून आलेल्या लामाने इथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. किंग जिगमे दोरजी वांगचुक यांच्या स्मरणार्थ १९७४ साली उभारलेले मेमोरिअल चार्टेन हा भुतानी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या राजाने परंपरा आणि आधुनिकता यांची योग्य सांगड घातली. इतर देशांशी मैत्री जोडली. भूतानला जगाची दारे उघडी करून दिली. म्हणून या राजाबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे. स्मारकाच्या ठिकाणी बुद्धाचा खूप मोठा पुतळा आहे. त्याच्या पुढ्यात वाटीसारख्या आकाराची तुपाची निरांजने तेवत होती. भाविक लांबट- गोल तांब्याची धर्मचक्रे फिरवत होते. त्यावर काही अक्षरे लिहिलेली होती.
चीन ने भेट दिलेली १७० फूट उंचीची ब्राँझची बुद्धमूर्ती(चंचुप्रवेश?) थिम्पू मधील कुठल्याही ठिकाणांहून दिसते. एका उंच डोंगरावरील या मूर्तीभोवतालचे बांधकाम सुरू होते. तिथून दूरवरच्या हिमालयीन पर्वत रांगा दिसत होत्या.टकीन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. बकरीचे तोंड आणि गायीसारखे अंग असलेला हा प्राणी टकीन रिझर्वमध्ये जाऊन पाहिला. तिथेच हातमागावर विशिष्ट प्रकारे कापड विणण्याचे प्रात्यक्षिक पाहिले.या हँडीक्राफ्ट आवारात एक सुंदर शिल्प आहे. एका झाडाखाली उभ्या असलेल्या हत्तीच्या पाठीवर एक माकड बसलेले आहे. माकडाच्या पाठीवर ससा आणि त्याच्या पाठीवर एक पक्षी बसलेला आहे. जमिनीवरील बलाढ्य प्राणी, झाडांवरील प्राणी, बिळात राहणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी ही एकमेकांवर अवलंबून असलेली एक निसर्गसाखळी आहे. या सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने रहाणे, झाडावरील फळे मिळविणे असे जगण्याचे साधे ,सोपे, सरळ तत्वज्ञान यात दडलेले आहे. ही चित्राकृती पुढे अनेक शिल्प, भरतकाम, चित्रकला यात वारंवार दिसत होती. आणखी एक वेगळेपण म्हणजे पुरुष लिंगाचे(Phallus–फेलस) चित्र बिल्डींगच्या, हॉटेलच्या दर्शनी खांबांवर, मॉनेस्ट्रीच्या बाह्य भिंतींवर रेखाटलेले असते व ते शुभ मानले जाते. दुकानात अशी चित्रे,की-चेन्स विकायला असतात. निसर्गातील सृजनत्वाचे ते प्रतीक मानले जाते.
हँडीक्राफ्ट स्कूलमध्ये बुद्ध धर्माशी संबंधित अनेक वस्तू, पेंटिंग, १२ तोंडे आणि २४ हात असलेली देवीची मूर्ती होती. विद्यार्थी मूर्तीकाम शिकत होते. हातमागावर विणकाम चालू होते.थिम्पू हेरिटेज म्युझियम व मिनिस्ट्री हाऊस पाहून व्हयू पॉईंटवर गेलो. तिथून दरीतली छोटी घरं आणि छोटासा पिवळसर रंगाचा राजवाडा चित्रातल्यासारखा दिसत होता. थिम्पूचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे या सबंध शहरात कुठेही ट्रॅफिक लाईट्स ( सिग्नल्स) नाहीत. वाहतूक कमी असली तरी ती अतिशय शिस्तबद्ध असते. एकाच मध्यवर्ती जंक्शनवर थोड्या उंच ठिकाणी बसून, एक पोलीस हातवारे करून वाहतुकीचे नियंत्रण करताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की सगळीकडे सेन्सर्स बसविलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतुकीतील बेशिस्त, चुका ड्रायव्हर करीत नाहीत.
भाग-१ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈