सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग २ ✈️

पुनाखा व्हॅली इथे जाताना दहा हजार फूट उंचीवरील दो_चुला पास (खिंड ) इथे उतरलो. इथले चार्टेन मेमोरियल म्हणजे छोटे गोलाकार १०८ स्तूप सैनिकांचे स्मारक म्हणून उभारलेले आहेत. इथून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे नयनमनोहर दर्शन होते. पुढे घाटातून उतरत जाणारा वळणावळणांचा रस्ता लागला. छोट्या छोट्या घरांचे पुंजके दरीभर विखुरलेले आहेत. पुनाखा ही १६३७ पासून १९३७ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षाहून अधिक काळ भूतानची राजधानी होती.फोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुरम्य स्थान आहे. इथे मोनेस्ट्री व त्याला जोडून लाकडी बांधणीचा कलाकुसरीने सजलेला देखणा राजवाडा आहे. अजूनही राजघराण्यातील विवाह इथे संपन्न होतात. इथली थांका म्हणजे रेशमी कापडावर धार्मिक रीतिरिवाजांचे चित्रण करणारी चित्रे अजूनही आपले रंग टिकवून आहेत.  जपान,  कोरिया,  बँकॉक अशा अनेक देशातील प्रवासी बुद्ध दर्शनासाठी आले होते. छोटी  मुले भिक्षू वेष परिधान करून बौद्ध धर्माचे शिक्षण घेत होती. नद्यांच्या संगमावर कलापूर्ण लाकडी पूल उभारला आहे.

पुनाखाहून पारो व्हॅलीला जाताना वाटेत अनेक ठिकाणी संत्री,  लाल सोनेरी सफरचंद आणि याकचे चीज विक्रीला होते. या पारो व्हॅलीमध्ये  भाताचे उत्तम पीक येते. जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. उंचावरील हॉटेलच्या पायऱ्या चढून गेलो. गरम- गरम जेवण मिळाले. सकाळी एका पक्ष्याच्या मधुर आवाजाने जाग आली. हिरवागार कोट आणि बर्फाची हॅट घातलेली पर्वत शिखरे कोवळ्या उन्हात चमकत होती. आवरून पारो एअरपोर्ट पॉईंटवर पोचलो. आम्ही उभे होतो त्या उंच कड्यावरून संपूर्ण एअरपोर्ट दिसत होता. कड्याखाली पारो-चू नदी खळाळत वाहत होती. नदीकाठाला समांतर  सिमेंट कॉंक्रिटचा दहा फूट रुंद रस्ता होता. त्याला लागून असलेल्या हिरवळीच्या लांबट पट्ट्यावर एअरपोर्ट ऑफिसच्या दोन लहान इमारती होत्या. त्यांच्या पुढ्यात छोटासा रनवे. पलीकडील हिरव्या लांबट पट्ट्यावर असलेल्या दोन- तीन छोट्या इमारती,  त्यांच्यामागच्या डोंगर उतरणीला टेकून उभ्या होत्या.

‘वो देखो,  आ गया,  आऽऽगया’ ड्रायव्हरने दाखविलेल्या दिशेने आमच्या नजरा वळल्या. उजवीकडील दोन डोंगरांच्या  फटीतून प्रखर प्रकाशझोत टाकीत एक विमान एखाद्या पंख पसरलेल्या परीसारखे अवतीर्ण झाले आणि एका मिनिटात डावीकडील दोन डोंगरांच्या फटीत अदृश्य झाले. आश्चर्याने डोळे विस्फारलेले असतानाच,  यू टर्न घेऊन ते विमान माघारी आले आणि पारो एअरपोर्टच्या छोट्याशा धावपट्टीवर अलगद टेकले. घरंगळत थोडेसे पुढे जाऊन विसावले. उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून आम्ही वैमानिकाच्या कौशल्याला दाद दिली.  चारी बाजूंच्या हिरव्या- निळ्या डोंगररांगांच्या तळाशी विमान उतरले तेव्हा एखाद्या हिरव्या कमळावर पांढरेशुभ्र फुलपाखरू पंखावरील,  पोटावरील लाल काळे ठिपके मिरवत डौलदारपणे बसल्यासारखे वाटले.

पारोच्या खोल दरीतील हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात लहान विमानतळ आहे. प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ सर्व जगात आव्हानात्मक समजला जातो. एकच छोटा रनवे असलेल्या या विमानतळावर ‘ड्रक एअर’ या भूतानच्या मालकीच्या विमानकंपनीची दिवसभरात फक्त तीन ते चार विमाने बँकॉक,  नेपाळ, कलकत्ता, मुंबई इथून येतात. सर्व उड्डाणे दिवसाउजेडीच करण्याचा नियम आहे. एअरपोर्ट ऑफिस दुपारी तीनला बंद होते. या विमानांचे पायलट विशेष प्रशिक्षित असतात. जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर हा विमानतळ आहे. अठरा हजार फूट उंच पर्वतरांगातून विमान अलगद बाहेर काढून ते डोंगरांच्या तळाशी १९८० मीटर्स एवढ्याच लांबीच्या रनवेवर उतरविणे आणि तिथून उड्डाण करणे हे निःसंशय बुद्धीकौशल्याचं,   धाडसाचं काम आहे.जगभरातील फक्त आठ-दहा पायलट्सना इथे विमान चालविण्याचा परवाना आहे. वर्षभरात साधारण तीस हजार प्रवाशांची वाहतूक होते आणि अर्थातच या सेक्टरचे विमान तिकिटही या साऱ्याला साजेसे महाग असते.

एक चित्तथरारक घटना चक्षूर्वैसत्यम अनुभवून आम्ही गाडीत बसण्यासाठी वळलो. विमान उतरत असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तसा तो काल संध्याकाळपासून थांबून थांबून पडतच होता. पावसामुळे बोचरी थंडी वाढली होती. डोळे भरून समोरचे दृश्य मनात,  कॅमेऱ्यात साठवून आम्ही गाडीत बसणार तो काय आश्चर्य,  लागोपाठ दुसरे विमान आले.  त्याचे स्वर्गावतरण होऊन ते हँगरला जाईपर्यंत तिसरे विमानसुद्धा आले. आनंदाश्चर्यात आम्ही बुडून गेलो.

भाग- समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments