सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ७ – क्रोएशियाचे समुद्र संगीत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

क्रोएशियाला  एड्रियाटिक सागराचा ११०० मैल समुद्र किनारा लाभला आहे. दुब्रावनिक या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावरील शहरात पोहोचताना उजवीकडे सतत निळाशार समुद्र दिसत होता. त्यात अनेक हिरवीगार बेटे होती. क्रोएशियाच्या हद्दीत लहान-मोठी हजारांपेक्षा जास्त बेटे आहेत. त्यातील फार थोड्या बेटांवर मनुष्यवस्ती आहे. काही बेटांवरील फिकट पिवळ्या रंगाची, गडद लाल रंगाच्या कौलांची टुमदार घरे चित्रातल्यासारखी दिसत होती. समुद्रात छोट्या कयाकपासून प्रचंड मोठ्या मालवाहू बोटी होत्या. डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर दगडी तटबंदीच्या आत लालचुटुक कौलांची घरे डोकावत होती.

गाइडबरोबर केबलकारने एका उंच मनोऱ्यावर गेलो. तिथून निळ्याभोर एड्रियाटिक सागराचे मनसोक्त दर्शन घेतले. गार, भन्नाट वारा अंगावर घ्यायला मजा वाटली. तिथून जुने शहर बघायला गेलो. जुन्या शहराभोवती भक्कम दगडी भिंत आहे. दोन किलोमीटर लांब व सहा मीटर रुंद असलेल्या या खूप उंच भिंतीवरून चालत अनेक प्रवासी शहर दर्शन करीत होते.

दगडी पेव्हर ब्लॉक्सच्या रस्त्यावर एका बाजूला चर्च व त्यासमोर ओनोफ्रिओ फाउंटन आहे. रोमन काळात दूरवरून पाणी आणण्यासाठी खांबांवर उभारलेल्या पन्हळीमधून उंचावरून येणारे पाणी गावात नळाने पुरवत असत. तसेच ते ओनोफ्रिओ फाउंटनमधूनही पुरवण्याची व्यवस्था होती. आजही आधुनिक पद्धतीने या फाऊंटनमधून प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.

रस्त्याच्या एका बाजूला सोळाव्या शतकातील एक फार्मसी आहे. वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्या, औषधी कुटण्यासाठीचे खलबत्ते, औषधी पावडरी मोजण्याचे छोटे तराजू, औषधांचे फाॅर्म्युले, रुग्णांच्या याद्या असे सारे काचेच्या कपाटात प्रवाशांना बघण्यासाठी ठेवले आहे. मुख्य म्हणजे आजही या ठिकाणी आधुनिक फार्मसीचे दुकान चालू आहे. मुख्य रस्त्याच्या शेवटी १६ व्या शतकातले कस्टम हाऊस आहे. तिथे राजकीय मौल्यवान कागदपत्रे, वस्तू ठेवल्या जात.

‘गेम ऑफ थ्रोन (Game of Throne)’ ही वेब आणि टीव्ही सिरीयल जगभर लोकप्रिय झाली. त्यातील एका राजघराण्याचे शूटिंग दुब्रावनिक  येथे झाले आहे. हे शूटिंग ज्या ज्या ठिकाणी झाले त्याची ‘गेम ऑफ थ्रोन वॉकिंग टूर’ तरुणाईचे आकर्षण आहे. ‘गेम ऑफ थ्रोन’ असे लिहिलेले टी-शर्ट, बॅग, मग्स, सोव्हिनियर्स दुप्पट किमतीला जोरात खपत होते. दुब्रावनिकच्या नितळ निळ्याभोर समुद्रातून लहान-मोठ्या बोटीने काॅर्चुला,स्प्लिट, बुडवा, व्हार अशा निसर्गरम्य, ऐतिहासिक बेटांची सफर करता येते. ताज्या सी-फूडचा आस्वाद घ्यायला मिळतो.व्हार खाडीतून फार पूर्वीपासून क्रोएशिया व इटली यांचे व्यापारी संबंध होते. त्यामुळे इथे थोडी इटालियन संस्कृतीची झलक दिसते. पास्ता, पिझ्झा, वाइन, आईस्क्रीम यासाठी दुब्रावनिक प्रसिद्ध आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर वाळू नाही तर चपटे, गोल गुळगुळीत छोटे छोटे दगड (पेबल्स) आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर लव्हेंडर, रोजमेरीसारख्या साधारण मोगऱ्याच्या जातीच्या फुलांचा सुवासिक दरवळ पसरलेला असतो. नितळ, निळ्याशार, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवर अनेक जण पोहोण्याचा पोटभर आनंद घेतात. स्वच्छ समुद्रकिनारा आणि सुंदर हवामान यामुळे क्रोएशियाकडे प्रवाशांचा वाढता ओघ आहे. इंग्लंड, फ्रान्स, इटली येथील लोकांना दोन तासांच्या विमान प्रवासावर हे ठिकाण असल्याने त्यांची इथे गर्दी असते. स्थानिक लोक स्लाव्हिक भाषेप्रमाणे इंग्लिश, फ्रेंच भाषा उत्तम बोलू शकतात.

राजधानी झाग्रेब आणि दुब्रावनिक यांच्या साधारण मध्यावर झाडर नावाचे शहर एड्रियाटिक सागराकाठी आहे. हॉटेलमधून चालत चालत समुद्रकाठी पोहोचलो. समोर अथांग निळा सागर उसळत होता. झळझळीत निळ्या आकाशाची कड  क्षितिजावर टेकली होती. लांब कुठे डोंगररांगा आणि हिरव्या बेटांचे ठिपके दिसत होते. दूरवर एखादी बोट दिसत होती. आणि या भव्य रंगमंचावर अलौकिक स्वरांची बरसात होत होती. प्रत्यक्ष समुद्रदेवाने वाजविलेल्या पियानोच्या स्वरांनी आसमंत भारून गेले होते.

या समुद्र काठाला दहा मीटर लांबीच्या सात रुंद पायर्‍या आहेत. विशिष्ट प्रकारे बांधलेल्या या पायर्‍यांना पियानोच्या कीज्  सारखी आयताकृती  छिद्रे आहेत. सर्वात वरच्या पायरीवर, ठरावीक अंतरावर छोटी छोटी गोलाकार वर्तुळे आहेत. या वेगवेगळ्या उंचीवरच्या समुद्रात उतरणाऱ्या पायर्‍यांच्या आतून ३५ वेगवेगळ्या लांबी-रुंदीचे पाईप्स बसविले आहेत. संगीत वाद्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले हे पाईप म्हणजे समुद्र देवांचा पियानो आहे. किनाऱ्यावर आपटणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे या पाईप्समधील हवा ढकलली जाते. लाटांच्या आवेगानुसार, भरती- ओहोटीनुसार या पाईप्समधून सुरेल सुरावटी निनादत असतात. उतरत्या पायऱ्या, त्याच्या आतील रचना आणि वाऱ्याचा, लाटांचा आवेग यामुळे हे स्वरसंगित ऐकता येते. आम्ही सर्वात वरच्या पायरीवरील गोल भोकांना कान लावून या संगीत मैफलीचा आनंद घेतला. पायर्‍या उतरून गार गार निळ्या पाण्यात पाय बुडवले. ज्ञानदेवांची ओवी आठवली..

निळीये रजनी वाहे मोतिया सारणी

निळेपणी खाणी सापडली..

आकाश आणि समुद्राच्या या निळ्या खाणीमध्ये स्वर्गीय सुरांचा खजिना सापडला होता.

झाडर या प्राचीन शहराने मंगोल आक्रमणापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक लढाया पाहिल्या. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर झाडर हे नाझी सैन्याचे मुख्यालय होते. अमेरिका आणि ब्रिटनच्या बॉम्बवर्षावाने झाडर भाजून निघाले, उध्वस्त झाले. युद्धानंतर विद्रूप झालेल्या शहराची, समुद्रकिनार्‍याची पुनर्रचना करण्यात आली. सरकारने जगप्रसिद्ध स्थापत्यविशारद निकोल बेसिक यांच्याकडे या समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम सोपविले. त्यांच्या कल्पकतेतून हे अलौकिक सागर संगीत निर्माण झाले आहे. त्यांना ‘सर्वोत्कृष्ट युरोपियन पब्लिक स्पेस’  सन्मान या कलाकृतीसाठी 2006 साली मिळाला.

निकोल बेसिक यांनी इथे ‘दी ग्रीटिंग टू दी सन’ हे आणखी एक आगळे स्मारक सूर्यदेवांना समर्पित केले आहे. त्यांनी या समुद्रकिनार्‍यावर  आहे त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर २२ मीटर परिघाचे आणि ३०० पदरी काचांचे वर्तुळ बांधले. या वर्तुळात सौरऊर्जा शोषणाऱ्या पट्ट्या बसविल्या. या पट्ट्या दिवसभर सूर्याची ऊर्जा साठवितात आणि काळोख पडला की त्या वर्तुळातून रंगांची उधळण होते. त्यावर बसविलेली ग्रहमालासुद्धा उजळून निघते. किनारपट्टीवर लावलेल्या सौरऊर्जेच्या दिव्यांनी किनारा रत्नासारखा चमकू लागतो.

सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा समोर दिसत होता. आकाशातल्या केशरी रंगांची उधळण समुद्राच्या लाटांवर हिंदकळत होती. आकाश आणि सागराच्या निळ्या शिंपल्यामध्ये सूर्य बिंबाचा गुलाबी मोती विसावला होता. दूरवरून एखादी चांदणी चमचमत  होती. पु.शी. रेगे यांची कविता आठवली,

आकाश निळे तो हरि

अन् एक चांदणी राधा

श्रीकृष्णासारखी ती असीम, सर्वव्यापी निळाई आणि त्यातून उमटणारे ते पियानोचे- बासरीचे अखंड अपूर्व संगीत! निसर्ग आणि मानव यांच्या विलोभनीय मैत्रीचा साक्षात्कार अनुभवून मन तृप्त झाले.सौंदर्य आणि संगीत यांचा मधुघट काठोकाठ भरला.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

खुप सुंदर लेख….किती सुंदर अनुभव आहे