सौ. पुष्पा चिंतामण जोशी
✈️ मी प्रवासीनी ✈️
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️
दरबार हॉलच्या भोजनकक्षात एकाच वेळी २०० माणसे टेबल खुर्च्यांवर बसून जेऊ शकतील अशी चांदीच्या ताटांसह सुसज्ज व्यवस्था आहे. या भल्यामोठ्या टेबलावर शाही पाहुण्यांसाठी चांदीची छोटी रेल्वेगाडी आहे. या रेल्वेचे चार छोटे, उघडे डबे कटग्लासचे बनविले आहेत. त्यात खानपानाचे पदार्थ भरून ती गाडी जेवणाच्या टेबलावर रुळांवरून फिरत असे. पूर्वी विशिष्ट प्रकारच्या इंधनावर चालणारी ही गाडी आता इलेक्ट्रिकवर चालते.
बिलीअर्डरूममधील भव्य टेबलावरील छतात आणि समोरासमोर बिलोरी आरसे आहेत. एका रूममध्ये १८८० सालचा इटालियन पियानो आहे . पियानोच्या स्टॅण्डवरील लंबकाचे मोठे घड्याळ अगदी आजही बरोबर वेळ दाखविते. गालिच्यावर ठेवलेल्या बिलोरी आरशात वरच्या सुंदर झुंबराचे प्रतिबिंब पाहताना स्वतःचेही प्रतिबिंब दिसते. आरशाच्या दोन्ही बाजूंना कारंज्यासारखी काचेची दोन झाडे आहेत.
इतर दिवाणखान्यात असंख्य अमूल्य वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये इटलीहून बनवून आणलेला काचेचा सुंदर पाळणा आहे. हा पाळणा दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला वापरण्यात येत असे. औरंगजेब व शहाजहानने वापरलेल्या रत्नजडीत तलवारी, देशी-परदेशी राजांनी भेटीदाखल दिलेल्या मौल्यवान वस्तू,उंची फर्निचर,चिंकु राणीच्या रत्नजडित चपला, दागिने, गालिचे, तैलचित्रे सारे बघावे तेवढे थोडेच! परतंत्र भारतातील संस्थानिकांच्या ऐश्वर्यसंपन्नतेची ही झलक पाहून डोळे दिपून जातात.
अफगाण राजपुत्र मोहमद गौस हे सम्राट अकबराचे गुरु. यांची भव्य कबर एका बागेत आहे. षटकोनी आकारातील ही कबर लाल दगडात असून त्याला सहा मिनार आहेत. त्याच्या दगडी जाळीची कलाकुसर नाजूक लेससारखी दिसते. त्याच्याजवळच गानसम्राट तानसेनची साधीशी समाधी आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे तिथे हल्ली तानसेन समारोह साजरा होतो. तिथल्या चिंचेच्या झाडाची पाने खाल्ली असता आवाज सुधारतो अशी अख्यायिका आहे. आम्ही आजूबाजूला चिंचेचा वृक्ष कुठे दिसतो का ते पाहत होतो. शेवटी चिंचेचे एक खुरटलेले झाड दिसले. त्यावरील उरलीसुरली पानेही लोक झोडपून काढीत होते. ही पाने खाऊन किती लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी तयार झाले कुणास ठाऊक! झाड मात्र खुरटे, बोडके झाले होते.
पुढे एका फुलबागेजवळ राणी लक्ष्मीबाईंचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. तात्या टोपे यांचाही पुतळा आहे. उस्ताद हाफिज अली खॉ॑ यांच्या पुरातन वास्तूमध्ये, सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी गतकालातील बुजुर्ग कलावंतांची वाद्ये जतन केली आहेत. बिर्लांनी बांधलेले सूर्यमंदिर एका सुंदर बागेत आहे.
नवव्या शतकात बांधलेले ‘तेली का मंदिर’ शंभर फूट उंच व भव्य आहे. दक्षिणेतील राष्ट्रकूट राजांनी ग्वाल्हेरवर राज्य केले होते. त्या वेळचे हे बांधकाम म्हणजे उत्तर- दक्षिणेचा संगम आहे. षटकोनी आकारातील या मंदिराचा कळस गोपुरासारखी रचना असलेला आहे आणि बाकी बांधकाम गुप्त शैलीतील आहे. सर्व बाजूंनी वरपर्यंत पिवळसर दगडांवर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. ‘सास- बहू’ मंदिराचे शिल्पद्वय ( कदाचित या मंदिराचे पूर्वीचे नाव सहस्त्रबाहु असावे) १६९३ मध्ये ग्वाल्हेरचा रजपूत राजा महिपाल याने उभारले . अप्रतिम कलाकुसरीने नटलेले पिवळसर दगडातील कोरीवकाम दिलवाडा मंदिराची आठवण करून देते. दरवाजावर ब्रह्मा-विष्णु-महेश यांची शिल्पे कोरली आहेत. आतील सर्व उंच, भव्य खांब सुंदर नक्षीने नटलेले आहेत. चतुर्भुज विष्णूची मूर्ती आता तिथे नाही.
असंख्य, अज्ञात कलाकारांच्या अथक परिश्रमाने साकारलेली अशी शिल्पकाव्ये भारतभर विखुरलेली आहेत. कालौघात काही नष्ट झाली, काही असंस्कृत लोकांनी विशोभित केली तर कोणी पैशाच्या लोभाने त्यांची तस्करी केली. सोन्याहिऱ्यांच्या सुंदर कलाकृती गझनीच्या महंमदापासून इंग्रजांपर्यंत सर्वांनी मनसोक्त लुटल्या. तरीही जे शिल्लक आहे ते भारताच्या प्राचीन वैभवशाली परंपरेची साक्ष आहे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी आणि देश-विदेशातील प्रवाशांसाठी हा समृद्ध वारसा डोळ्यात तेल घालून जपला पाहिजे.
भाग ३ व ग्वाल्हेर यात्रा समाप्त.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈