सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- 17 – भाग 1  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ शांतिनिकेतन ✈️

कोलकत्याहून शांती निकेतन इथे पोचायला पाच तास लागले. शांतिनिकेतन परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. अनेक प्रकारच्या वनस्पती आणि मोहक रंगाच्या फुलझाडांनी बहरलेली झाडे, काटकोनात वळत जाणारे गेस्ट हाऊस शांत आणि शीतल होते. मागच्या बाजूला खळाळत येणारा एक ओढा होता .त्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होते . ओढ्याचा तळ, तळातील खडे गोटे शेवाळे, छोटे छोटे मासे सहज दिसत होते. दुपारी शांतिनिकेतन पाहायला निघालो. शांतिनिकेतनचा परिसर विस्तीर्ण आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे श्रेष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. आकाशाच्या छताखाली आंबा, सप्तपर्णी ,शाल,बकुळअशा वृक्षांच्या दाट सावलीत तिथे पूर्वी शाळा कॉलेजांचे वर्ग भरत असत. झाडांना बांधलेल्या पाराजवळ शिक्षकांचे आसन फळा खडू आणि विद्यार्थ्यांसाठी बैठी आसने अशी त्याकाळची शिक्षण व्यवस्था बघायला मिळाली

रवींद्रनाथांचे घराणे पिढीजात जमीनदारांचे! त्यांचे वडील देवेंद्रनाथ जमिनींच्या कामासाठी फिरत असताना त्यांना बोलपुर जवळील हा उजाड माळ दृष्टीस पडला. त्यांनी तो माळ विकत घेऊन तिथे घर बांधले व त्याला शांतिनिकेतन असे नाव दिले. या घरांमध्ये रवींद्रनाथांनी १९०१ मध्ये चार पाच विद्यार्थ्यांना घेऊन गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देणारी शाळा काढली. चार भिंतीतील पुस्तकी शिक्षणापेक्षा निसर्ग सान्निध्यातील जीवनदायी शिक्षण मुलांना माणूस म्हणून घडविण्यासाठी सुयोग्य आहे अशी त्यांची धारणा होती. या मूळ वास्तूमध्ये आता भारतीय भाषा विभाग आहे. आश्रम शाळेचे आज जगप्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठ झाले आहे. विश्वभारती मध्ये पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाप आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृती बरोबरच पाश्चिमात्य संस्कृतीत उत्तम घटकांना या शिक्षणात सामावून घेतले आहे. चिनी जपानी फारसी इस्लामिक अशा आंतर्राष्ट्रीय शिक्षणाचे संशोधनाचे कलेचे ते महत्वपूर्ण केंद्र आहे .प्राचीन गुरुकुल परंपरेचा वारसा सांगणारे, निसर्गाशी सुसंवाद राखणारे, मानवी जीवन मूल्यांचा आदर राखणारे असे वैविध्यपूर्ण शिक्षण दिले जाते. जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तसेच सार्‍या जगातून लोक या विद्यापीठाला भेट देण्यासाठी येत असतात.

मूळ वास्तू बाहेर प्रसिद्ध शिल्पकार भास्कर रामकिंकर यांनी साकारलेले एक वेगळेच शिल्प आहे. निर्वाण शिखा असे या कलाकृतीचे नाव आहे त्यावर जेव्हा ऊन पडते तेव्हा त्याची लांब मोठी सावली जमिनीवर पडते. एक माता बालकाला हातात धरून ईश्वराकडे मंगल प्रार्थना करीत आहे असे दृश्य त्या सावलीतून साकार होते. तिथून प्रार्थना सभागृह पाहिले. आता या काच सभागृहात प्रार्थना व कर्तृत्ववान व्यक्तींच्या निधनानंतर शोकसभा घेतली जाते. इथेच मातीच्या भिंती आणि छप्पर असलेले एक वर्तुळाकार घर आहे. रवींद्रनाथांनी तिथे महिलांसाठी हस्तकलेचे शिक्षण देणारे वर्ग सुरू केले होते. आता हे हस्तकला केंद्र दुसऱ्या इमारतीत आहे. आम्रवृक्ष वेढलेल्या परिसरात पदवीदान समारंभाच्या मंच बांधलेला आहे. यशस्वी पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच इथे असलेल्या सप्तपर्णी वृक्षाची फांदी भेट देण्याची प्रथा आहे.१९३४ मध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरूंसह शांतिनिकेतन ला भेट दिली होती. त्यावेळी इंदिराजीही त्यांच्याबरोबर होत्या. नंतर काही काळ त्या तेथील विद्यार्थिनी होत्या. भारताचे पंतप्रधान हे विश्व भारती विद्यापीठाचे कुलगुरू असतात व त्यांच्या हस्ते पदवीदान समारंभ होतो.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४० साली रवींद्रनाथांना डि.लीट ही पदवी दिली तो पदवीदान समारंभ या इमारतीत झाला. या इमारतीच्या टॉवरवर मोठे घड्याळ आणि घंटा आहे. एका अष्टकोनी वास्तूला विनंतीका असे नाव आहे. सायंकाळी सर्व अध्यापकांनी इथे चहापानासाठी एकत्र जमून अनौपचारिक गप्पा माराव्यात अशी गुरुदेवांची कल्पना होती. तिथेच रवींद्रनाथांना सुचलेली चहा ही कविता भिंतीवर विराजमान आहे. चीन संस्कृती व परस्पर संबंधाचा अभ्यास होतो इथल्या भिंतीवर सत्यजित रे ,प्रभास असें नामवंतांनी चितारलेली सुंदर पेंटिंग. आहेत. त्या शिवाय संगीत भवन कला भवन नृत्य नाट्य भवन विज्ञान भवन अशा अनेक वस्तू आहेत तीन लाखांहून अधिक पुस्तके असलेले केंद्रीय ग्रंथागार आहे शेतकी कॉलेज आहे तसेच आधुनिक काळाला अनुसरून कम्प्युटर सेंटरही आहे अनेक नामवंतांची शिल्पे मिरज पेंटिंग आहेत रवींद्रनाथांनी प्रमाणेच सत्यजित रे नंदलाल बोस राम बिहारी मुखोपाध्याय अशा नामवंतांच्या कलाकृती इथे आहेत

भाग-1 समाप्त

 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments