सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- 18 – भाग 2  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ शांतिनिकेतन ✈️

‘उत्तरायण ‘हा अनेक इमारतींचा समूह आहे. समूहातील एका इमारतीत आता म्युझियम केलेले आहे. रवींद्रनाथांनी लिहिलेली पत्रे ,त्यांच्या कविता, ड्रॉइंग, पेंटिंग, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व इतर कलाकारांच्या चित्रकृती त्यात ठेवल्या आहेत.

बदलत्या ऋतूंना अनुसरून शांतिनिकेतनमध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात. निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे सामाजिक, सांस्कृतिक उत्सव साजरे होतात. फेब्रुवारीमध्ये माघोत्सव तर मार्चमध्ये वसंत उत्सव होतो. श्रावणात सजवलेल्या पालखीतून वृक्ष रोपाची मिरवणूक निघते. रवींद्र संगीत म्हणत, फुलांचे अलंकार घालून, शंखध्वनी करत ठरलेल्या ठिकाणी वृक्षारोपण होते.शारदोत्सवात इथे आनंद बाजार भरतो. डिसेंबरमध्ये विश्वभारती संस्थापना दिवस साजरा होतो. त्यावेळी खेळ नृत्य संगीत आदिवासी लोकसंगीत, आणि स्थानिक कला  यांचा महोत्सव भरविण्यात येतो.

गुरुदेव रवींद्रनाथ हे लोकोत्तर पुरूष होते. कथा, कादंबरी, निबंध, कविता, तत्वज्ञान, नृत्य ,नाट्य ,शिल्प, चित्रकला अशा अनेक कला प्रकारांमध्ये त्यांनी मुक्त संचार केला. त्याचप्रमाणे ते उत्तम संगीतकारही होते. त्यांच्या दोन हजारांहून अधिक रचना आजही बंगालभर आवडीने गायल्या जातात.

उत्तरायण मधील म्युझियम मधून रवींद्रनाथांना मिळालेला नोबेल पुरस्कार २००४ मध्ये चोरीला गेला. आता तिथे त्या पुरस्काराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव म्युझियम मधील अनेक दालने बंद होती. भारताचा राष्ट्रीय वारसा असलेल्या पुरस्काराची प्रतिकृती पाहताना आणि बंद केलेल्या  अनेक दालनांचे कुलूप पाहताना मन विषण्ण होते. एकूणच सगळीकडे अलिप्तता, उदासीन शांतता जाणवत होती ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ ही कविता वारंवार आठवत होती. कदाचित पुलंचे ‘बालतरूची पालखी’ आणि शांतिनिकेतनवरील इतर लिखाण डोळ्यापुढे होते म्हणूनही ही निराशा झाली  असेल. तरीही सर्वसामान्य कष्टकरी बंगाली खेडूत पर्यटकांनी तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याचे कारण म्हणजे तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या हृदयातून वाहणारे, लोकजीवनात मुरलेले रवींद्र संगीत आणि रवींद्रनाथांबद्दलचे भक्तीपूर्ण प्रेम! बंगालमधील निरक्षर व्यक्तीच्या ओठावरसुद्धा त्यांची गीते संगीतासह असतात.

कालौघात अनेक गोष्टींमध्ये बदल हा अपरिहार्य असतो. तो स्वीकारणे, जुन्या गोष्टींमध्ये बदल करणे सुसंगत ठरते. शिक्षण आनंददायी व्हावे, निसर्ग सान्निध्यात व्हावे ही कल्पना रवींद्रनाथांनी यशस्वीपणे सत्यात उतरवली होती. केवळ पुस्तकी नव्हे तर अनेक कला प्रकारांचे शिक्षण एकाच ठिकाणी देण्यात यावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ते द्रष्टे पुरुष होते. आधुनिक काळाला अनुसरून शिक्षण पद्धतीत योग्य ते बदल करावेत,  कालबाह्य प्रथांची औपचारिकता बदलावी या मागणी मध्ये गैर काहीच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रवींद्रनाथांनी भारतीयत्वाचा, त्यातील परंपरा, संस्कृती यांचा अभिमान जनमानसात स्वकृतीने रुजविला. जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिशांनी दिलेली ‘सर’ ही पदवी सरकारला परत केली. त्या गुलामीच्या काळात अनेक कलाकार, बुद्धिमंत घडविले. अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत लावली. गुरुदेवांच्या ‘जन गण मन’ या गीताने राष्ट्रीय भावना प्रज्वलित करीत अनेकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा दिली. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकता अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी या गीताचे सर्वप्रथम जाहीर गायन झाले होते. स्वातंत्र्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी संसदेने या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. रवींद्रनाथांचे कर्तृत्व हे असे अलौकिकच आहे.

शंभर- सव्वाशे वर्षांपूर्वीच्या कालमानाप्रमाणे, त्या वेळच्या सामाजिक स्थितीला अनुसरून शिक्षणामध्ये, लोकांमध्ये भारतीय संस्कृतीमधील चांगले संस्कार रूजावेत म्हणून रवींद्रनाथांनी अनेक प्रथा, पद्धती सुरू केल्या. आज रवींद्रनाथ असते तर त्यांनी स्वतःच कालानुसार त्यात अनेक बदल केले असते. कारण ते थोर द्रष्टे होते व लोककल्याण हा एकच विचार त्यांच्या मनात होता. भारत सरकारने रवींद्रनाथांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वभारतीसाठी भरघोस अनुदान देण्याचे जाहीर केले .शांतिनिकेतनमधील मरगळ झटकली जाऊन, आधुनिक काळाशी सुसंगत असे बदल तिथल्या सर्व ज्ञानशाखांमध्ये झाले आणि आजची तरुण बुद्धिमान पिढी इथे चैतन्याने वावरू लागली तर गुरुदेवांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने तीच त्यांना खरीखुरी आदरांजली ठरेल.

भाग दोन आणि शांतिनिकेतन समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments