सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ मोरोक्को –  रसरशीत फळांचा देश ✈️

मोरोक्कोला पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तरेकडील ४०० किलोमीटर भूभागाला भूमध्य समुद्र व त्यापलीकडे स्पेन हा देश आहे. पूर्व दिशेला आणि दक्षिणेला सहा हजार किलोमीटरपर्यंत सहारा वाळवंट आहे. मोरोक्कोहून मोठ्या प्रमाणात संत्री, सफरचंद, ऑलिव्ह, द्राक्षे निर्यात होतात. कॉर्क वृक्षाच्या लाकडाचा हा देश प्रमुख निर्यातदार आहे. खतासाठी लागणारे फॉस्फेट येथे विपुल प्रमाणात मिळते. अमेरिका व रशिया यांच्यानंतर मोरॉक्कोचा फॉस्फेट उत्पादनात नंबर आहे. त्या शिवाय इथे  आयर्नओर, मँगनीज, झिंक मिळते. इथे फळांचे कॅनिंग, मासेमारी, कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.

कासाब्लांका इथून अटलांटिकच्या समुद्रकिनाऱ्याने शंभर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही राजधानी रबात इथे पोहोचलो.  रबात म्हणजे तटबंदी असलेलं गाव.अल्मोहाद राजवटीतील खलिफा मन्सूर यांनी रबात हे राजधानीचे ठिकाण केले .शहराच्या मध्यभागी रॉयल पॅलेस आहे व शेजारी रॉयल मॉस्क आहे. मोरोक्कोचा शाही परिवार इथे नमाज पडतो. पांढऱ्या भिंती व हिरवे छत असलेल्या या मशिदीचे बांधकाम आधुनिक आहे. मशिदीच्या समोरच असलेल्या हसन टॉवरचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. लाल सॅंडस्टोनमधील या टॉवर समोर मोहम्मद मुसोलियमची ऐतिहासिक वास्तू आहे. आतमध्ये राजा हसन आणि राजपुत्र अब्दुल्ला यांच्या कबरी आहेत. हा शहराचा निवांत भाग आहे. स्वच्छ सुंदर रस्ते, झाडे, जास्वंदीची लालचुटुक फुले यांनी टुमदार बंगल्यांची आवारे सुशोभित दिसत होती. इथे उच्चपदस्थांची निवासस्थाने व परदेशी वकिलाती आहेत. अटलांटिकच्या किनाऱ्यावरील या शहरावर फ्रेंच वास्तुकलेचा प्रभाव आहे.

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रबातहून निघालो कारण टॅ॑जेर बंदरात दहा वाजताची बोट पकडायची होती. सारे शहर धुक्यात गुरफटलेले होते. दूरवर टेकड्यांच्या रांगा दिसत होत्या. त्यावरील दिव्यांच्या चांदण्या आम्हाला हसून निरोप देत होत्या. ड्रायव्हरने बसमध्ये लावलेल्या सूफी संगीताच्या तालावर मोरोक्कोचा वेगळा प्रवास आठवत होता. धुक्याचे आवरण बाजूला सारून सोनेरी सूर्याची किरणे आसमंत उजळत होती.

भाग चार व मोरोक्को समाप्त

 

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments