सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस ✈️

मुंबईहून इस्तंबुल इथे विमान बदलून ग्रीसची राजधानी अथेन्स इथे उतरलो. मनात ग्रीसबद्दल प्रचंड कुतूहल होतं .प्राचीन काळातील ग्रीस म्हणजे आजच्या युरोपीयन संस्कृतीचं मूलस्थान आहे. अनेक विद्या आणि कला यांचे हे माहेरघर! विख्यात गणिती आर्किमिडीज, भूमितीवरील पहिलं पुस्तक लिहिणारा युक्लिड, आधुनिक वैद्यक शास्त्राची देणगी जगाला देणारा हिप्पॉक्रेटिस,  सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल अशा एकाहून एक नररत्नांची ही जन्मभूमी.इलियट आणि ओडिसी ही महाकाव्यं लिहिणारा होमर हा श्रेष्ठ कवीही इथलाच! लोकशाहीचा पहिला हुंकार जिथे उमटला ते ग्रीस! जगातील पहिलं ऑलिम्पिक जिथे खेळलं गेलं ते हे अथेन्स!

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाप्रमाणे ग्रीसला निसर्गाचं वरदानही लाभलं आहे. पूर्वेकडे एजिअन समुद्र, पश्चिमेकडे आयोनियन समुद्र आणि दक्षिणेकडे भूमध्यसागर अशी १४ हजार किलोमीटर्सहून अधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या सागरात ग्रीसची दोन हजार लहान-मोठी बेटे आहेत.

हॉटेलपासून पॉसेडॉनच्या देवालयापर्यंत जाताना संपूर्ण बासष्ट किलोमीटरचा देखणा समुद्रकिनारा पाहून मन आणि डोळे तृप्त झाले. पारदर्शक पोपटी रंगाचा भल्यामोठ्या एमरेल्ड (Emerald )रत्नासारखा तो समुद्र वाटत होता. ग्लीफाडा,वौला,वार्किझा अशी श्रीमंत उच्चभ्रू उपनगरं या समुद्रासमोर उभी आहेत. समुद्रकिनाऱ्यावर गाड्या पार्क करून लोक तासनतास पोहण्याचा आनंद घेतात. ताजी, मोकळी ,स्वच्छ हवा, लहान मुलांना खेळायला, सायकल फिरवायला मोकळी जागा, हॉटेल्स,  बार्स , ओपन एअर सिनेमा थिएटर्स, वाळू आणि पाण्यातले खेळ यात ग्रीक अभिजन वर्ग रमून गेला होता. आरामात पाय पसरून बसायला खुर्च्या होत्या आणि त्या खुर्च्यांच्या डोक्यावर पांढऱ्या स्वच्छ चौकोनी छत्र्या होत्या. गोरे, उंच, सशक्त, नाकेले, निळ्या- घाऱ्या डोळ्यांचे ग्रीक स्त्री-पुरुष त्यांना लाभलेल्या समुद्र किनार्‍याचा मनसोक्त उपभोग घेतात. पांढऱ्या शिडांच्या होड्या,याटस्  यांचीही गर्दी होती.

या सुंदर रस्त्याच्या शेवटी एका उंच खडकावर पॉसिडोनच्या देवालयाचे भग्नावशेष आहेत. इतिहासाप्रमाणे ग्रीसला पौराणिक कथांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या महाभारतासारखे मनुष्य स्वभावाचे कंगोरे यात रेखाटलेले असतात. आमची गाईड डोरा सांगत होती की अडीचहजार वर्षांपूर्वी पॉसीडॉन आणि अथेना यांच्यातली  स्पर्धेमध्ये अथेनाने ग्रीसमधील पहिली ऑलीव्ह वृक्षाची फांदी लावली. तिचा विजय झाला. तिच्यावरून या शहराचं नाव अथेन्स असं पडलं. या खडकाळ टेकडीवरील रोमन पद्धतीच्या पॉसिडॉनच्या देवालयाचे आयताकृती पायावरील मार्बलचे खांब गतकालाची साक्ष आहेत. गाईडने सांगितलं की लॉर्ड बायरन या इंग्लिश कवीने आपली नाममुद्रा यातील एका खांबावर कोरलेली आहे. टेकडीच्या टोकावरुन एजिअन समुद्रातला सोनेरी सूर्यास्त भारून टाकीत होता.

अथेना देवीचं देऊळ ॲक्रोपॉलिसवर आहे आहे.आहे म्हणजे कोणे एके काळी होतं. ॲक्रोपोलीस म्हणजे ग्रीसचा मानबिंदू! साधारण पाचशे फूट उंच टेकडीवर अडीचशे फूट उंचीचे  एक  भव्य स्वप्नशिल्प पेरिक्लस राजाच्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी साकारण्यास सुरुवात झाली. एक हजार फूट लांब व पाचशे फूट रुंद असं हे शिल्पकाव्य राजाच्या मित्राने म्हणजे फिदिआस  याने उभारले. फिदिआस हा उत्कृष्ट  शिल्पकार होता. त्याच्यासह अनेक शिल्पकार, स्थापत्यकार, कलाकार या निर्मितीसाठी आपला जीव ओतत होते. त्यांनी अंतर्बाह्य अप्रतिम देखण्या ,भव्य वास्तू उभारल्या. अथेना देवीचे भव्य मंदिर उभारलं.तिचं मुखकमल आणि हात हस्तिदंताचे होते. आणि बाकी सर्व अंग ११४० किलो सोन्याच्या पत्र्याने बनविलेले होते. ही प्रचंड मोठी वास्तू उभारण्यासाठी वापरलेले १४ हजार मार्बल ब्लॉक १६ किलोमीटर दूर असलेल्या माऊंट पेटली इथल्या खाणीतून आणण्यात आले होते.ग्रीक सूर्यपूजक होते. विशिष्ट वेळी देवळात सूर्यप्रकाश येई आणि अथिनाचं पायघोळ सुवर्ण वस्त्र व रत्नजडित डोळे सूर्यप्रकाशात तेजाने चमकत असत. (गाइडच्या तोंडून हे ऐकताना आपल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची आठवण आली).  तिथे अनेक डौलदार इमारती होत्या. त्यातल्या विशाल नाट्यगृहाचे अवशेष, आरोग्यधामाचे अवशेष आणि सुंदर कोरीव काम केलेले मार्बलचे विखुरलेले तुकडे बघण्यासाठी जगभरातील कलावंत तिथे येतात . ते शिल्पकाम पाहून त्यांच्या प्रतिभेला नवे पंख फुटतात.एकसारख्या चुण्या घातल्यासारखे दिसणारे, मार्बलचे   पस्तीस फूट उंच खांब, एकाच अखंड दगडातून कोरल्यासारखे आपल्याला वाटतात पण ते खांब  एकावर एक दगड रचून उभारलेले आहेत. त्यांच्या सांध्यात चुना वगैरे काही भरलेलं नाही. इतके ते मोजून-मापून काटेकोर बनविलेले आहेत. देवळाचं छत तोलण्यासाठीचे खांब म्हणून मार्बलच्या सहा सुंदर युवती उभ्या आहेत.  त्यांची चुणीदार वस्त्रे, केशभूषा ,दागिने ,चेहऱ्यावरील भाव पहाण्यासारखे आहेत, मात्र या युवतींची ही मूळ शिल्पं नसून त्यांच्या प्रतिकृती बनवून तिथे उभारल्या आहेत. मूळ शिल्पांपैकी काही तिथल्या ॲक्रोपॉलिस म्युझियममध्ये आहेत तर यातील एक युवती ब्रिटिश म्युझियमची शोभा वाढवीत आहे. गाइड म्हणाला की  दोन हजार वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक संस्कृती लयाला गेली. त्यानंतर ग्रीकांवर रोमन्स, बेझेन्टाईन,अरब, ख्रिश्चन,क्रुसेडर्स,ऑटोमन्स (तुर्की मुस्लिम ) अशा अनेक राजवटी आल्या. ऑटोमन्सच्या काळात त्यांनी ॲक्रोपोलीसचा मार्बलच्या खाणीसारखा उपयोग केला. या भव्य वास्तूंच्या खांबांवरील सहा फूट रुंद सलग पट्टिकांवर  ग्रीक पुराणातील देवदेवता,ट्रोजन वॉर व इतर शत्रूंबरोबरच्या लढाया असे कोरलेले होते. लॉर्ड एल्गिन या ब्रिटिश सरदाराने अशा अनेक पट्टिका तोडून- फोडून काढल्या व इंग्लंडमध्ये नेल्या.

मध्यंतरी ग्रीसमधील एका इतिहासतज्ञ स्त्रीने ब्रिटिश म्युझियममध्ये असलेला हा ग्रीसचा ठेवा ग्रीसला परत मिळावा यासाठी राजकीय पातळीवरूनही पाठपुरावा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गाइडच पुढे म्हणाली, ‘कसा मिळणार तो ठेवा परत? एकदा  ग्रीसला त्यांच्या अमूल्य वस्तू परत केल्या तर साम्राज्यावर कधीही सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश सरकारने जगभरातून ब्रिटनमध्ये जे जे नेले ते ते इतर सर्व देश परत मागतील. मग ‘ब्रिटिश म्युझियम’मध्ये काय उरेल? काही नाही!’ आपणही आपला अमूल्य कोहिनूर हिरा व इतर असंख्य मौल्यवान वस्तू आठवून आवंढा गिळण्यापलीकडे काय करू शकतो?

ॲक्रोपोलीस  टेकडीवरून खालच्या दरीतली पांढरीशुभ्र छोटी- छोटी घरं दिसत होती. जुन्या आणि नव्या शहराच्या सीमारेषेवरील ‘आर्च ऑफ हेड्रियन’ ही कमान रोमन सम्राट हेड्रियन याने इ.स. १३२ मध्ये उभारली. कॉन्स्टिट्यूशन स्क्वेअर, हाऊस ऑफ पार्लमेंट बिल्डींग, नॅशनल लायब्ररी या बिल्डिंग बसमधून पाहून पॅन्थेनाक  स्टेडियम इथे उतरलो. इथेच १८९६ मध्ये ऑलम्पिक गेम्स खेळले गेले. अर्धवर्तुळाकार उतरत्या दगडी पायऱ्यांच्या अंडाकृती स्टेडियमचं पुनरुज्जीवन करून ते नेटकं सांभाळलं आहे.

ग्रीकांना मानवी देहाच्या आरोग्याचं महत्त्व माहीत होतं तसंच मनाच्या आरोग्याचं महत्त्वही ते जाणून होते. एकमेकांशी खिलाडू स्पर्धा करण्याच्या विचारातून ऑलिंपिकचा जन्म झाला. व्यायाम शाळा, स्टेडियम यांची उभारणी झाली. नाट्यकलेतून लोकांना देव, धर्म, राजकारण, समाजकारण यांची ओळख झाली. प्रत्येक धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी ॲ॑फी थिएटर असावे असा नियम होता. तत्वज्ञान विद्यापीठ या उंच खांबांच्या इमारतीच्या प्रवेशद्वारी सॉक्रेटिस  व त्याचा शिष्य प्लेटो यांचे संगमरवरी मोठे पुतळे आहेत. जवळच अथेन्स विद्यापीठाची भव्य सुंदर इमारत व लायब्ररी आहे. एकोणिसाव्या शतकातील अथेंस सिटी हॉल व नॅशनल थिएटर हे उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत.

ग्रीस भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments