सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस ✈️

प्राईम मिनिस्टर रेसिडन्स म्हणजे पूर्वीच्या रॉयल पॅलेस इथे उतरलो. इथे दर तासाला ‘चेंजिंग द गार्डस्’  सेरीमनी होतो. दोन सैनिक पांढरी तंग तुमान व त्यावर पांढरा, तीस मीटर्स कापडाचा, ४०० सारख्या चुण्या असलेला घेरदार ड्रेस घालून,  डोळ्यांची पापणीसुद्धा न हलवता दोन बाजूंना उभे होते. त्यांच्या डोक्यावर लाल पगडीसारखी टोपी आणि हातात तलवारी होत्या. त्यांच्या पायातील लाकडी तळव्यांचे बूट प्रत्येकी साडेतीन किलो वजनाचे होते. थोड्यावेळाने सैनिकांची दुसरी जोडी आल्यावर या सैनिकांनी गुडघ्यापर्यंत पाय उचलून बुटांचा खाडखाड आवाज करीत शिस्तशीर लष्करी सलामी दिली. ते निघून  गेल्यावर त्यांची जागा दुसऱ्या जोडीने घेतली.

प्लाका या भागात शहराचं जुनं खानदानी सौंदर्य दिसतं. जुन्या पद्धतीची घरं, उघडमीट होणारी शटर्स असलेल्या काळ्या लाकडी पट्टयांच्या खिडक्या, घरापुढील कट्टयावर सुंदर फुलझाडं, षटकोणी लांबट लोलकासारखे  काळ्या रंगाचे डिझाईनचे दिव्याचे खांब, चर्चेस, जुन्या वास्तू, घरांच्या कलापूर्ण गॅलेऱ्या  ब्राँझचे रेलिंग असलेल्या होत्या.अशा या भागात जुन्या काळी श्रीमंत व्यापारी, राजकारणी,विद्वान यांची घरं असायची .आजही तिथे घर असणं अभिमानास्पद समजलं जातं.

ॲक्रोपोलीसवरील तोडमोड केलेली अनेक शिल्पं आणि शहरभर उत्खननात सापडलेले अनेक भग्न अवशेष आता ॲक्रोपोलिस म्युझियममध्ये अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. प्राचीन इतिहास, मानवी जीवन, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला यांचा जागतिक महत्त्वाचा हा खजिना बघण्यासाठी तसंच ॲक्रोपोलिसचे उद्ध्वस्त अवशेष पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो प्रवासी ग्रीसला भेट देतात. उत्खननात सातव्या ते नवव्या शतकातील बेझेन्टाईन काळातील एका छोट्या वसाहतीचे अवशेष मिळाले . हे सापडलेले अवशेष साफसफाई करून त्यावर जाड काचेचे आवरण घालून ॲक्रोपॉलिस म्युझियमच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहेत .इथून म्युझियममध्ये प्रवेश करताना या लोकवस्तीची वर्तुळाकार रचना, सार्वजनिक हॉल, मध्यवर्ती असलेली विहीर अशी रचना पाहता येते. ॲक्रोपोलीसमध्ये सापडलेल्या मार्बलच्या पट्टिका म्युझियमच्या तिसऱ्या मजल्यावर आहेत.  पॅसिडॉन, अथेना, अपोलो आणि इतर अनेकांचे अतिशय रेखीव  कोरलेले पुतळे तिथे आहेत. त्यांची बसण्याची आसने, अंगावरील वस्त्रे, बसण्याची ऐटदार पद्धत, कुरळे केस, दाढी, चेहऱ्यावरील भावभावना ,शरीराच्या स्नायूंचा डौलदारपणा, तेजस्वी डोळे असं पाहिलं की त्या प्राचीन शिल्पकारांच्या कलेला मनापासून दाद द्यावीशी वाटते.पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केलं व तोडफोड सुरू केली त्यावेळी ॲक्रोपोलीसवरील सौंदर्य देवतेचा पुतळा शत्रूपासून वाचविण्यासाठी जमिनीत पुरला होता. तो १८८६ मध्ये उत्खननातून वर काढला. तिचा हसरा चेहरा, डोक्यावरील रुंद महिरप आणि दोन्ही खांद्यांवरून पुढे आलेल्या पीळ घातल्यासारख्या तीन-तीन वेण्या बघत रहाव्या अशा आहेत. त्रिकोणी आसनावर नृत्याच्या मुद्रा करणारी, डोक्यावरून पदरासारखं मार्बलच वस्त्र घेतलेली स्त्री वर्षभरातील वेगवेगळ्या ऋतूंचं अस्तित्व दाखवते. तिने उजव्या खांद्यावरून मार्बलचे चुणीदार वस्त्र घेतले आहे. त्याचे काठ  व वस्त्रावरील डिझाईन रंगीत काळसर मार्बलचं आहे. काही पाठमोरे स्त्री पुतळे कुरळ्या केसांच्या पाचपेडी वेण्या घालून खाली केसांचे झुपके सोडलेल्या अशा आहेत.

महान योद्धा अलेक्झांडर खुष्कीच्या मार्गाने भारतापर्यंत आला होता. त्याचा फक्त मानेपर्यंत चेहरा असलेला एक पुतळा इथे आहे. त्याच्या कुरळ्या केसांची महिरप, तरतरीत नाक आणि हिरवे घारे डोळे बघण्यासारखे आहेत. लहान मोठ्या अनेक उंच खांबांवर स्त्री-पुरुषांचे उभे पुतळे ठेवले आहेत. त्यातील कोणाचे हात तुटलेले आहेत तर कुणाचं नुसतं धडच आहे. तरीही त्यांचं शरीरसौष्ठव, उभे राहण्याची पद्धत, अंगावरील वस्त्रांच्या चुण्या यावरून त्यांच्या शरीराच्या प्रमाणबद्ध रचनेची कल्पना येऊ शकते.

भाजलेल्या मातीच्या, भोवर्‍याच्या आकाराच्या, सुंदर रंगकाम केलेल्या अनेक स्पिंडल्स १९५० साली उत्खननात सापडल्या. प्राचीन काळातील स्त्रिया हे *स्पिंडल देवीच्या पायाशी वाहत असत असे गाईडने सांगितले. काही पट्टीकांवर ग्रीक आणि पर्शियन योद्धे एकमेकांशी लढताना दाखविले आहेत. तीन सशक्त, हसऱ्या मुद्रेच्या पुरुष प्रतिमा एकाला एक चिकटून आहेत. पाणी, अग्नी आणि वायू यांचे ते प्रतीक आहे. एका घोडेस्वाराची तंग तुमान आणि चुडीदार अंगरखा रंगीत आहे तर घोड्याच्या आयाळीवरील लाल हिरवा मार्बलचा पट्टा रेशमी वस्त्रासारखा दिसतो. घोड्याच्या शेपटीलाही हिरवट रंगाचा मार्बल वापरला आहे. समाजातील उच्चभ्रू स्त्रियांची स्कर्टसारखी फॅशनेबल व रंगीत डिझाईनच्या मार्बलची वस्त्र लक्षवेधी आहेत. एक दाढीवाला तरूण मानेभोवती गाईच्या छोट्या वासराला घेऊन निघाला आहे तर हात तुटलेल्या एका नग्न उभ्या युवकाचं प्रमाणबद्ध शरीर, तेजस्वी डोळे, छाती- पोटाचे, पायाचे स्नायू अतिशय रेखीव आहेत.एका पेल्मेटवरील रंगीत उमलत्या फुलांचं शिल्प वाऱ्यावर डोलत असल्यासारखं वाटतं. गतकाळातील हा अमूल्य सांस्कृतिक वारसा पाहता-पाहता  खरोखरच हरवल्यासारखं झालं.

सॅ॑टोरिनी हे ग्रीसचं छोटसं बेट एजिअन समुद्रात आहे. अथेन्सहून विमानाने सॅ॑टोरिनीला पोचलो. एका चढणीवरच्या रस्त्यावरील सुंदर प्रशस्त बंगला हे आमचं हॉटेल होतं. हॉटेलच्या आवारात टोमॅटो, अंजीर, रंगीत बोगनवेल ,सुवासिक मॅग्नेलिया बहरली होती. लंबवर्तुळाकार निळ्या पोहण्याच्या तलावाभोवती आमच्या रूम्स होत्या. रूमला छोटी गॅलरी होती. वाटलं होतं त्यापेक्षा हॉटेल खूपच मोठं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी  दाराचा पडदा सरकवला तर काय आश्चर्य स्विमिंगपुलावरील आरामखुर्च्या बाजूला सरकवून त्या जागेवर योगवर्ग चालू होता. एक कमनीय योग शिक्षिका समोरच्या पंचवीस-तीस स्त्री पुरुषांकडून योगासनं, प्राणायाम करून घेत होती. खरं म्हणजे हा योगवर्ग हॉटेलमधील सर्व प्रवाशांसाठी होता. आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे आल्यावर बाजारात फेरफटका मारताना अतिशय रसाळ, लालसर काळी, मोठाली चेरी मिळाली होती. मोठे पीच आणि तजेलदार सफरचंद आपल्यापेक्षा खूप स्वस्त व छान वाटली म्हणून घेतली होती. जेवून हॉटेलवर आल्यावर सर्वांनी तिथल्या हॉलमध्ये बसून गप्पा मारताना त्या फळांवर ताव मारला होता आणि त्या गडबडीत हॉलमध्ये लावलेली योगवर्गाची नोटीस वाचायची राहिली. नाही तर आम्हालाही योगवर्गाचा लाभ घेता आला असता. पण आमचा ‘योग’ नव्हता. भारतीय योगशास्त्राचे महत्त्व आता जगन्मान्य झालं आहे हे मात्र खरं!

माझी मैत्रीण शोभा भरतकाम आणि विणकाम करण्यात कुशल आहे. नाश्त्याच्या वेळी तिथल्या एका खिडकीचा विणकाम केलेला पांढरा स्वच्छ पडदा तिला आवडला म्हणून ती जवळ जाऊन बघायला लागली तर टेबलावरच्या आमच्या डिश उचलून, टेबल साफ करणारा इसम लगबगीने तिच्याजवळ गेला. आणि कौतुकाने सांगू लागला की हे सर्व भरतकाम, क्रोशाकाम माझ्या आईने केले आहे. तीन चार वर्षांपूर्वी आमची आई आणि नंतर वडीलही गेले. आम्ही सर्व बहिण भावंडं मिळून हा फॅमिली बिझनेस चालवतो. मग त्याने आम्हाला आपल्या आई-वडिलांचे फोटो, आईने केलेल्या अनेक वस्तू, विणलेले रुमाल दाखवले. खरोखरच सर्व हॉटेलमधील निरनिराळ्या पुष्परचना, सोफ्यावरील उशांचे अभ्रे, पडदे, दिवे, कलात्मक वस्तू उच्च अभिरुचीच्या, स्वच्छ, नीटनेटक्या होत्या. आई-वडिलांबद्दलंच प्रेम आणि अभिमान त्या देखणेपणात भर घालीत होतं.

आज दिवसभर छोट्या बोटीतून एजिअन समुद्रात फेरफटका होता. आम्हा दहाजणांसाठीच असलेली ती छोटीशी बोट सर्व सुविधायुक्त होती. चालक व त्याचा मदतनीस उत्साहाने सारी माहिती सांगत होते आणि अधून मधून वेगवेगळे खाद्यपदार्थ देऊन आमची जिव्हा तृप्त करीत होते. त्या छोट्याशा बोटीच्या नाकाडावर बसून समुद्राचा ताजा वारा प्यायला मजा वाटत होती. दोन्ही बाजूला उंच कड्यांच्या डोंगररांगा होत्या. काहींचा रंग दगडी कोळशासारखा होता. काही डोंगर गाद्यांच्या गुंडाळीसारखे वळकट्यांचे होते.  काही पांढरट पिवळट लालसर मार्बलचे होते. काही डोंगर ग्रॅनाइटचे होते. एका छोट्या डोंगराजवळ बोट थांबली. हा जागृत ज्वालामुखी आहे. त्याच्या माथ्यावरच्या छिद्रातून सल्फ्युरिक गॅसेस बाहेर पडताना दिसतात. दगडी कोळशासारखा दिसणार तो डोंगर अतिशय तप्त होता.

तिथून जवळच थर्मल वॉटरचे झरे समुद्रात आहेत. आमच्या आजूबाजूला असंख्य लहान- मोठ्या बोटी प्रवाशांनी भरलेल्या होत्या. सर्फिंग करणारे, छोट्या वेगवान यांत्रिक बोटीतून पळणारे अनेक जण होते.उष्ण  पाण्याच्या झऱ्यांजवळ आल्यावर आजूबाजूच्या बोटीतून अनेकांनी समुद्रात धाड् धाड् उड्या मारल्या. जल्लोष,मौज मस्ती यांना ऊत आला होता. समुद्रस्नान, परत डेकवर सूर्यस्नान असा मनसोक्त कार्यक्रम चालू होता. इथे बाकी कशाची नाही पण अंगावरच्या कपड्यांची टंचाई नजरेत भरत होती. आणि सिगारेटसचा महापूर लोटला होता. बोट थिरसिया बेटाजवळ आल्यावर चालकाने बोट थांबवून बोटीतच सुंदर जेवण दिलं. तिथून परतताना एका उंच डोंगरकड्यावर पांढरीशुभ्र असंख्य घरं एका ओळीत बसलेली दिसली. पांढरे शुभ्र पंख पसरून बसलेला राजहंसांचा थवाच जणू!’ इथे कुठे यांनी घरं बांधली? वर जायची- यायची काय सोय?’ असं मनात आलं तर चालकाने डोंगरातून वर जाणाऱ्या केबल कार्स आणि डोंगराच्या पोटातून जाणारी फनिक्युलर रेल्वे दाखविली. उच्चभ्रू श्रीमंत लोकांची ती उच्च वसाहत होती.

ग्रीस भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments