सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव
सियाम रीपहून आम्ही कंबोडियाची राजधानी नामपेन्ह इथे आलो. तिथले ‘रॉयल पॅलेस’ एका स्वच्छ, भव्य बागेत आहे. हरतऱ्हेची झाडे व अनेक रंगांची फुले फुलली होती. नागचाफा ( कैलासपती ) म्हणजे कॅननबॉलचा महाप्रचंड वृक्ष होता. त्याला बुंध्यापासून गोल फळे लगडली होती. कमळासारख्या गुलाबी मोठ्या पाकळ्या असलेल्या या फुलात मधोमध छोटी शंकराची पिंडी व त्यावर पिवळट केसरांचा नागाचा फणा असतो. एक मंद मादक सुवास सगळीकडे दरवळत होता. राजवाड्याचे भव्य खांब अप्सरांच्या शिल्पांनी तोललेले आहेत. राजवाड्याची उतरती छपरे हिरव्या, निळ्या, सोनेरी रंगाची आहेत. आवारात वेगवेगळे स्तूप आहेत. हे स्तूप म्हणजे राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर त्यांचे दागिने, कपडे, रक्षा ठेवण्याची जागा आहे. राजाची रक्षा सोन्याच्या कमलपात्रात ठेवली आहे.
सिल्व्हर पॅगोडा पाहिला. पॅगोडाच्या आतील संपूर्ण जमीन चांदीची आहे. एक किलो १२५ ग्रॅम वजनाची एक लादी अशा ५३२९ चांदीच्या लाद्या इथे बसविण्यात आल्या आहेत. या साऱ्या लाद्या फ्रान्समध्ये बनविल्या आहेत. प्रवाशांना त्यातील एक लादी काढून दाखविण्याची सोय केली आहे. या पॅगोडामध्ये सोने, रत्ने वापरून केलेला बुद्धाचा घडीव पुतळा आहे. त्याच्या कपाळावर आठ कॅरेटचा हिरा जडविलेला आहे. त्याच्या मुकुटावर व अंगावर मिळून २०८६ रत्ने बसविलेली आहेत अशी माहिती गाईडने दिली. या रत्नजडित बुद्धाच्या मागे थोड्या उंचीवर संपूर्ण एमरेल्डचा (Emerald ) पोपटासारख्या रंगाचा पण पारदर्शक असा बुद्धाचा पुतळा आहे. त्याच्या मागे जाऊन पाहिले की आरपार पोपटी उजेड दिसतो.
म्युझियममध्ये होडीच्या आकाराचे मोठे तंतुवाद्य होते. कंबोडियामध्ये उत्तम प्रतीचा पांढरा व हिरवट मार्बल मिळतो. तो वापरून हत्तीचे, बुद्धाचे पुतळे बनविले आहेत. सॅण्डस्टोन मधील स्कंद म्हणजे कार्तिकेयाची मूर्ती आहे. सहाव्या शतकातील शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश, शिवलिंग, सिंह, गरुड, वाली-सुग्रीव यांच्या मूर्ती आहेत. अर्धनारीनटेश्वराची ब्रांझमधील मूर्ती आहे. नागाच्या वेटोळ्यावर बसलेल्या बुद्धाला काही लोकं काडीला लावलेला मोगरा व लाल फूल वाहत होते.उदबत्यांचे जुडगे लावीत होते. तीन-चार हजार वर्षांपूर्वीची शस्त्रास्त्रे, वाद्ये, दागिने,सिल्कची वस्त्रे विणण्याचे माग, राजाचा व धर्मोपदेशकाचा ब्राँझचा पुतळा अशा असंख्य गोष्टी तिथे आहेत.
मानवतेला काळीमा फासणारा एक काळाकुट्ट काळ कंबोडियाने अनुभवला आहे. क्रूरकर्मा पॉल पॉट या हुकूमशहाने त्याच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ( १९७६ ते १९७९) वीस लाख लोकांना यमसदनास पाठविले. हे सर्व लोक त्याच्याच धर्म- वंशाचे होते. बुद्धीवादी सामान्य नागरिक म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, संपादक, डॉक्टर, वकील अशा लोकांचा पहिला बळी गेला. पॉल पॉटने हिटलरसारखे कॉन्संस्ट्रेशन कॅ॑पस् उभारले होते. महाविद्यालये , शाळा बंद होत्या. निरपराध लोकांना तिथे आणून हालहाल करुन मारण्यात आले. आम्हाला एका शाळेतील असा कॅम्प दाखविण्यात आला. गाईड बरोबर फिरताना, तिथले फोटो, कवट्या बघताना अश्रू आवरत नाहीत. गाईडचे नातेवाईकही या छळाला बळी पडले होते. एखादा माणूस असा राक्षसासारखा क्रूरकर्मा होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. पण हा चाळीस -बेचाळीस वर्षांपूर्वीचा सत्य इतिहास आहे. क्रूरतेची परिसीमा गाठलेला, माणुसकी हरवलेला!
कंबोडियन लोक साधे, गरीब व कष्टाळू आहेत. आपल्या परंपरा, धर्म आणि रूढी जपणारे आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. नोव्हेंबर मधील पौर्णिमेला बोन ओम थोक नावाचा सण साजरा करण्याची प्रथा बाराव्या शतकापासून आहे. त्यावेळी नद्यांमध्ये बोटीच्या स्पर्धा होतात. फटाके वाजविले जातात. केळीच्या पानातून अन्नाचा भोग (नैवेद्य ) दाखविला जातो. आता कंबोडियातील बहुतांश लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा ही विशेष प्रकारे साजरी होते. मे ते ऑक्टोबर हा तिथला पावसाळ्याचा ऋतू आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी मध्यापर्यंत कंबोडियाला जाण्यासाठी योग्य काळ आहे. त्यानंतर मात्र चांगलाच उन्हाळा असतो.
कंबोडियात परंपरेप्रमाणे क्रामा म्हणजे एक प्रकारचे छोटे उपरणे वापरण्याची पद्धत आहे. आम्हालाही एकेक क्रामा भेट म्हणून देण्यात आला. उन्हापासून संरक्षण करायला, लहान बाळाला गुंडाळून घ्यायला, झाडावर चढण्यासाठी अशा अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो.
अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेली दहा वर्षे आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय प्रवासी कमी असले तरी युरोप व इतर प्रवाशांचा चांगला ओघ असतो. आम्ही राजधानी नामपेन्ह इथे भारतीय उच्चायुक्तांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या राहण्याची व कार्यालयाची जागा एकाच छोट्या बंगल्यात होती. त्यांनी कंबोडियाबद्दल थोडी माहिती दिली.रबर,टिंबर, तयार कपडे यामध्ये कंबोडियाची निर्यात वाढत आहे तर औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, पेट्रोल व पेट्रोलियम उत्पादने चीन, तैवान, थायलंड, सिंगापूर येथून आयात केली जातात. व्यापार व इतर व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कंबोडिया भारताकडून औषधे, वाहनांचे सुटे भाग, मशिनरी, कॉस्मेटिक्स आयात करतो. पण अजूनही गुंतवणुकीला भरपूर वाव आहे. सिंगापूर, चीन, कुवेत, कोरिया,कतार यांनी बांधकाम व्यवसायात व शेतकी उत्पन्नात चांगली गुंतवणूक केली आहे. खाण उद्योग, वीज निर्मिती, रस्तेबांधणी तेल व गॅस संशोधन यामध्ये गुंतवणुकीला भरपूर वाव आहे.चीनने नेहेमीप्रमाणे मुसंडी मारली आहे. दोन मोठ्या सरकारी इमारती ‘फुकट’ बांधून देऊन उत्तरेकडील सोन्याच्या खाणीचे कंत्राट मिळविले आहे. उदासीनता झटकून भारतानेसुद्धा येथील संधीचा फायदा घेतला पाहिजे.
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक समृद्धी असलेल्या या देशाला आपले पूर्ववैभव प्राप्त करता येईल अशी आशा करुया.
भाग – ३ व कंबोडिया समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈