सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

| स्वस्ति श्री जलदेवता प्रसन्ना भवतु |

| स्वस्ति श्री वनदेवता प्रसन्ना भवतु  |

| स्वस्ति श्री निसर्गदेवता प्रसन्ना भवतु |

|जलवननिसर्गदेवता: सुप्रसन्ना: भवन्तु |

‘आकाशातल्या बाप्पाने’ अवाढव्य कॅनडाला जगातील सर्वाधिक सरोवरे, समुद्रासारख्या नद्या, घनदाट जंगले, माथ्यावर बर्फाचे मुकुट मिरवणारी पर्वतराजी, मनमोहक निसर्ग यांचा असा भरभरून आशीर्वाद दिला आहे. या स्वप्नसुंदर भूमीवरील आकाशाच्या भव्य घुमटातून डोकावणारा देवबाप्पा समाधानाने हसत असतो कारण कॅनडाने या साऱ्या दैवी देणगीची कसोशीने जपणूक केली आहे. या दैवी देणगीचा आदरपूर्वक सन्मान केला आहे.

फ्रँकफर्टला विमान बदलून टोरंटोला उतरलो. विमानतळावरील सोयी-सुविधा अनुभवून बोलक्या ड्रायव्हरच्या साथीने गुळगुळीत रस्त्यावरून हॉटेलपर्यंत अलगद पोहोचलो आणि प्रवासाचा सारा शीण पळाला.

ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे पण आर्थिक राजधानी टोरंटो आहे . सांस्कृतिक विविधता असलेल्या टोरंटो शहराने इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या आहेत तसेच गगनाला भिडणारे टॉवर्सही उभारले आहेत. बसमधून कॅसालोमा इथे उतरलो. कॅसालोमा हा किल्ल्यासारखा राजवाडा सर हेनरी यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधला.९८ दालने, ३०  बाथरूम्स, दोन गुप्त भुयारी रस्ते, आठशे फूट लांबीचे अंतर्गत जोडणी करणारे टनेल, २५ फायर प्लेसेस, १७०० बाटल्या मावतील एवढी वाईनसेलर, दहा हजार ग्रंथ असणारी लायब्ररी असा सारा अफलातून कारभार  आहे. त्या महालासभोवती पाच एकर जागेवर कारंजी आणि सुंदर पुतळे असलेला रंगीबेरंगी फुलांनी डवरलेला सुंदर बगीचा आहे. आपल्याला फक्त त्या बागेत फेरफटका मारुन उंची महालाचे दर्शन व फोटो घेता येतात.

बाटा शू म्युझियममध्ये जगभरातील वैविध्यपूर्ण १३००० बुटांचा संग्रह आहे. चीनमधील एम्ब्रॉयडरी केलेल्या रेशमी बुटांपासून  बॉलरूम डान्सिंग बुटांपर्यंत सारे प्रकार या संग्रहात आहेत. शोकेसमध्ये बुटाचा स्टॅन्ड ठेवलेला असावा अशी या इमारतीची रचना आहे.इटॉन सेंटर या  शॉपिंग मॉलचे एक प्रवेशद्वार एका रेल्वे स्टेशन जवळ तर दुसरे प्रवेशद्वार त्यापुढच्या स्टेशनजवळ  एवढा तो भरपूर लांब, अवाढव्य मॉल आहे.

साऱ्या आधुनिक इमारतींचा मानबिंदू म्हणजे सी -एन् टॉवर ! ३६५ मीटर्स म्हणजे ११९८ फूट उंच असलेला हा टॉवर काही वर्षांपूर्वी जगातला सर्वात उंच टॉवर होता. लिफ्टने दीड मिनिटात या टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेस्कवर पोचलो. पायाखालच्या काचेच्या जमिनीवरून खालची माणसे, गाड्या बुद्धिबळातल्या सोंगट्यांएवढी दिसंत होती. अनेक जण त्या काचेवर झोपून सेल्फी काढण्यात रमले होते. इथे रेस्टॉरंट, थिएटर अशा सोयी आहेत तसेच भक्कम दोराच्या सहाय्याने या टॉवरला बाहेरून फेरी मारण्याचा धाडसी खेळही आहे.

काही वर्षांपूर्वी नायगाराचा अनुभव अमेरिकेच्या बाजूने घेतला होता. आता तोच नायगारा कॅनडाच्या बाजूने अनुभवायचा होता. लांबूनच त्याचा घनगंभीर आवाज कानावर आला. चंद्रकोरीच्या आकारातून धमासान कोसळणारा तो जलप्रपात पाहिला आणि समर्थ रामदास स्वामींचे शब्द आठवले ;

‘गिरीचे मस्तकी गंगा, तेथूनी चालली बळे

धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोये आदळले’

जणू ते प्रचंड पाणी आकाशातून येऊन आवेगाने पाताळात घुसत होते. पाण्यावर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्यांचे  अनेक शेले त्यावर तरंगत होते. नजर खिळवून ठेवणारे, तनमन व्यापून टाकणारे ते दृश्य होते.

१८००० वर्षांपूर्वी हिमयुगाचा अंत होऊ लागला तेंव्हा सध्याच्या अमेरिका आणि कॅनडा देशांच्या सरहद्दीवर असलेल्या पाच ग्रेट लेक्स भागातलं बर्फ वितळू लागलं. लेक एरी भागातील बर्फ संथपणे उत्तरेला ओन्टारिओ सरोवर भागाकडे वाहू लागलं.वाहताना वाटेत एका कड्यावरून कोसळू लागलं तोच हा सुप्रसिद्ध नायगारा धबधबा! कालौघात खडकांची झीज होऊन धबधबा मूळ जागेपासून मागे जातो. जून, जुलै, ऑगस्टमध्ये भरभरून कोसळणारा धबधबा प्रवाशांना आकर्षित करतो. या  धबधब्यात बंद पिंपात बसून उडी मारण्याचं वेडं साहसही अनेकांनी केलं आहे. धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेले  ‘नायगारा,’ ‘सुपरमॅन’ असे अनेक चित्रपट आहेत. हिवाळ्यात एरी सरोवराचं पाणी गोठतं.  जलप्रवाह अतिशय क्षीण होतो. १८४८ च्या मार्च महिन्यात तर हा धबधबा पूर्णतः गोठला होता.

धबधब्याच्या पाण्यावर जल विद्युत केंद्र चालविले जाते. विद्युत केंद्राचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून एरी सरोवरातून नायगारा नदीत दोन मैल लांबीच्या साखळीला खूप मोठे लोखंडी , तरंगणारे प्लॅटफॉर्मस् सोडलेले आहेत. त्यामुळे सरोवरातील हिमखंडांना अटकाव होऊन विद्युत केंद्राचा पाणीपुरवठा चालू राहतो.

नायगारावरील तरंगती इंद्रधनुष्ये डोळ्यात साठवून आम्ही  ‘जर्नी बिहाइंड दी फॉल्स ‘ साठी एका लिफ्टने जमिनीच्या पोटात दीडशे फूट खाली गेलो. नंतर एका लहानशा ओल्या टनेलमधून गेल्यावर आम्ही थेट नायगाराच्या कोसळणाऱ्या पाण्याच्या पडद्यामागे उभे ठाकलो.आवेगाने अविरत कोसळणाऱ्या नायगाराचे थंडगार तुषार, अंगावर शिरशिरी आणंत होते. तिथून थोडे वर चढल्यावर अर्धवर्तुळाकार ऑब्झर्वेशन गॅलरी आहे. तिथून दिसणारा, आपल्या बाजूने लांबट अर्धवर्तुळाकार  कोसळणारा धबधबा पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं.

आता आम्हाला नायगाराची गळाभेट घ्यायची होती. ‘हॉर्न ब्लोअर’ नावाच्या क्रूझमधून धबधब्याला समोरून भिडताना अंगावर जलतुषारांचा फवारा उडत होता. रेनकोट घालूनही सर्वांग भिजंत होतं. नायगाराच्या उसळत्या पाण्यात शिरलेली बोट हेलकावत होती. कोसळणार्‍या धारा, त्यावर तरंगणारे धुक्याचे ढग, कानामनात भरून राहिलेली ती अजस्त्र ऊर्जा सारेच विलक्षण अद्भुत वाटत होते.

रात्री आमच्या हॉटेलरुमच्या काचेच्या खिडकीतून दिसणारा नायगारा संथगतीने खाली उतरत आहे असं वाटंत होतं. दिवसभरच्या श्रमाने नायगारा थोडा दमल्यासारखा दिसंत होता. झोप येईपर्यंत त्याचे दर्शन घेतले. पुन्हा पहाटे उमलती सूर्यकिरणे त्यावर पसरली. इंद्रधनुष्याचा सप्तरंगी खेळ सुरू झाला. पाण्याचा प्रचंड मोठा रंगीत पडदा झिरमिळत घरंगळू लागला.

जगातील सर्व प्रवाशांना नायगाराचे आकर्षण आहे .अमेरिका व कॅनडा यांनी अनेक सोयी- सुविधा तिथे निर्माण करून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धबधब्याला माणसाळले आहे.भरदार आयाळ असलेल्या सिंहाच्या गळ्यात पट्टा बांधावा तसे! सदर्न ऑंटारिओ भागात नायगारा नदीचा संगम लेक ऑंटारिआमध्ये होतो. त्याला ‘नायगारा ऑन दी लेक’ म्हणतात. इथल्या छोट्या शहरावर ब्रिटिश वास्तुशैलीची छाप आहे. इथे अनेक वायनरीज आहेत. जगप्रसिद्ध ‘आइस वाइन’ इथे बनविली जाते. अतिशय थंड हवेत वेलीवर लगडलेल्या द्राक्षांमध्ये बर्फ तयार होतो. त्या द्राक्षातून निघालेला थेंबभर रस खूप गोड असतो. म्हणून त्यापासून बनविलेली वाइन,इतर वाइनपेक्षा जास्त मधुर असते. डेझर्ट वाइनसाठी आइस वाइन उत्तम समजली जाते.

कॅनडा भाग- १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments