सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

मॉन्ट्रियलहून साडेचार तासांचा विमान प्रवास करून कॅनडाच्या पश्चिम भागात पोहोचलो. कॅलगरी एअरपोर्टपासून बांफपर्यंतचा  प्रवास नयनरम्य होता. आमच्या बसची ड्रायव्हर गाइडचे कामही करत होती. ती उंचनिंच, धिप्पाड आणि बोलकी होती. भरभरून माहिती देत होती. जुन्या काळातील देखणी घरे,  भोवतीच्या सुबक बागा, कारंजी, पुतळे यांनी कॅलगरी सजली होती. दारं- खिडक्या बंद करून निवांतपणे हे बंगले बसले होते. आत्ममग्न, उच्चभ्रू लोकांचे हे शहर असावे.कॅलगरी विमानतळापासून ‘बो’ नदीचीसाथ लाभली. रॉकी माउंटन्समधून उगम पावलेली बो नदी कॅलगरीमधून वाहते. तिच्या काठावरून जॉगिंग, सायकलिंग, स्केटिंगसाठी सुंदर मार्ग आहेत. फळाफुलांनी भरलेल्या बागांतून लोकं सहकुटुंब पिकनिकचा आनंद घेत होते. नदीच्या स्वच्छ, नितळ पाण्यातून कयाकिंग, राफ्टिंग करत होते. काठावरून मासे पकडण्याचा छंद जोपासत होते. ही नदी ट्राउट माशांसाठी ओळखली जाते.

कॅलगरीमध्ये दरवर्षी जुलै महिन्यात ‘स्टम्पेड’ हा दहा दिवस चालणारा  रोडिओ शो होतो. १९१२ पासून चालू असलेला हा उत्सव म्हणजे पाश्चिमात्य परंपरा व स्थानिक इतिहास यांचे मिश्रण आहे.’ ग्रेटेस्ट आऊटडोअर शो ऑन दी अर्थ’ असे त्याचे वर्णन केले जाते. जगभरातून जवळजवळ दहा लाख पर्यटक वेगवेगळे काउबॉय स्टाईल शो बघायला येतात. घोड्यांची रेस (डर्बी ),स्टम्पेड परेड, काऊबॉयच्या वेशातील फ्लोटस्,बॅ॑डस्,  म्युझिक, लोकसंगीताच्या तालावरील नृत्य असा सारा माहोल असतो. बियर फेस्टिवलपासून स्वीट कॉर्न फेस्टिवल, बेबी ॲनिमल फेस्टिवल साऱ्याचा जल्लोष असतो.

कॅलगरीमधील जुन्या दगडी इमारती तसेच आधुनिक टॉवर्स शेजारच्या इमारतींना भुयारी रस्त्याने किंवा छोट्या ब्रिजने एकमेकांना जोडलेल्या आहेत. नोव्हेंबरपासून पुढे पाच- सहा महिने इथली थंडी वाढत जाते. दुपारी तीन वाजताच काळोख होतो. सतत ढगाळ हवामान व काळोख यामुळे पूर्वी लोकं निराश, अनुत्साही होत. अति थंडीमुळे बाहेर पडायची सोय नव्हती. तेंव्हा रोजचे व्यवहार अडू नयेत म्हणून अशा पद्धतीने बिल्डिंगज् जोडल्यामुळे लोकांना खरेदीला,  रेस्टॉरंट्समध्ये जाता येते. एवढेच नाही तर एके ठिकाणी काचेच्या बंद दरवाजाआड सुंदर बाग उभी केली आहे. तिथे एकत्र येऊन लोक चहा-कॉफी, नाश्ता, मनोरंजन यांचा आस्वाद घेऊ शकतात. आता तर सर्वत्र आधुनिक सोयीसुविधा व दिवाळीसारखी रोषणाई, थंडीतले खेळ, स्पर्धा चालू असतात.

कॅलगरीपासून जगप्रसिद्ध रॉकी माउंटनसचे  दर्शन सुरू होते. युनेस्कोने या पर्वतरांगांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिला आहे. रॉकी माउंटनस ही पर्वतांची रांग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. फिओर्डस, नद्या, सरोवरे, पर्वत उतारावरील सूचीपर्ण वृक्ष, औषधी गरम पाण्याचे झरे, ग्लेशिअर्सच्या बर्फाळ सौंदर्याचा खजिना, ग्लेशिअर्सच्या पाण्याने बनलेली पोपटी, हिरवी सरोवरे सारे स्वप्नवत सुंदर, डोळे आणि मन निववणारे आहे.मोकळ्या आकाशाच्या भव्य घुमटामधला एखादा झळझळीत नीळा तुकडा नीलण्यासारखा या सौंदर्यावर सरताज चढवितो.

बांफ हे कॅनडातील सर्वात उंचावर( ४५३७ फूट ) वसलेले छोटेसे सुंदर शहर आहे. बांफ इथे १८८५ साली कॅनडातील पहिल्या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली. इथली नॅशनल पार्कची संकल्पना म्हणजे पर्वत, नद्या, सरोवरे, जंगले यांनी वेढलेला खूप मोठा प्रभाग!   यात एखादे छोटेसे शहर वसविलेले असते. या सर्व प्रभागाच्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी तेथील नागरिकांवर  असते. नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तिथल्या तांत्रिक सोयीसुविधा उभारण्याकडे लक्ष दिले जाते. देवाघरचे हे अनाघ्रात सौंदर्य जपले जाईल हे कटाक्षाने पाहिले जाते.

सकाळी उठून जवळपास फेरफटका मारला. खळाळून वाहणाऱ्या बो नदीवरील ब्रिजवरून सभोवतालचे बर्फाच्छादित डोंगर व दाट पाईन वृक्ष देखण्या चित्रासारखे दिसत होते. नंतर गंडोला राईडने सल्फर माऊंटनच्या शिखरावर अलगद पोहोचलो. खोल दरीतल्या उंच वृक्षांच्या माथ्यावरुन जाताना खालची बो नदी एखाद्या पांढऱ्या रेघेसारखी दिसत होती. सभोवतालची हिमाच्छादित पर्वतशिखरे, त्यातून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे बघून ‘कड्याकपारीमधोनी घट फुटती  दुधाचे ‘ या बा. भ. बोरकर यांच्या कवितेची आठवण झाली. अपंग आणि वृद्ध यांच्यासाठी असलेल्या विशेष सोयी- सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे सर्वांना या निसर्गसौंदर्याचा विनासायास आस्वाद घेता येतो. पर्वतावरून खाली खोल दरीतले  छोटेसे बांफ शहर दिसत होते. खालच्या लेकमध्ये प्रवाशांना घेऊन फिरणाऱ्या क्रूज दिसत होत्या.

गंडोलाने* सल्फर माउंटनवर पोहोचल्यावर पर्वताच्या टोकापर्यंत जायला एक सुंदर पायवाट होती. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. थंडी वाढली आणि आम्ही परतीचा मार्ग धरला. नंतर बो नदीतून कोसळणार्‍या धबधब्यांवर गेलो.  तिथल्या भल्या मोठ्या बागेत लोकं निवांतपणे वाचत बसले होते.

बांफवरून जास्पर इथे जायचे होते. बांफ, लेक लुईसा आणि जास्पर ही रॉकी पर्वतांमधील सर्वात निसर्गरम्य ठिकाणे आहेत. अतिशय देखण्या अशा अशा लेक लुईसाचे नामकरण क्वीन व्हिक्टोरियाच्या मुलीच्या नावावरून केले आहे. त्या सभोवतालची बर्फाच्छादित पर्वतराजी व त्यावरील ग्लेशियर माउंट व्हिक्टोरिया व व्हिक्टोरिया ग्लेशियर म्हणून ओळखले जाते.( मला वाटतं क्वीन व्हिक्टोरिया हिला खऱ्या अर्थाने  साम्राज्ञी म्हटले पाहिजे. जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये, अगदी कॅनडापासून ऑस्ट्रेलियापर्यंत तिची नाममुद्रा पर्वत, धबधबा,बागा , रेल्वेस्टेशन पासून घोडागाडीपर्यंत उमटलेली आहे. ) लेक लुईसा समुद्रसपाटीपासून ५६८० फूट उंचीवर आहे. व्हिक्टोरिया ग्लेशियरचे तुकडे पर्वतावरून घसरताना त्यांनी आपल्याबरोबर तांबे, ॲल्युमिनियम अशा प्रकारची खनिजेही आणली. त्या खनिज कणांमुळे झालेला या सरोवराचा अपारदर्शी , झळझळीत पोपटी निळसर रंग नजर खिळवून  ठेवतो. सभोवतालच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांचं प्रतिबिंब सामावून घेऊन लुईसा लेक शांतपणे पहुडला होता.कनोई म्हणजे लांबट होडीतून आपण या लेकची सफर करू शकतो किंवा गंडोलामधून जाऊन लेकचे विहंगम दृश्य पाहू शकतो.

जास्परला जायला घाटातला वळणदार रस्ता होता. मध्येच पाऊस हजेरी लावून जात होता. दुतर्फा बर्फाचे मुकुट घातलेली पर्वत शिखरे , त्यातून उड्या मारणारे धबधबे, पर्वतांच्या अंगावरील बर्फाच्या शुभ्र माळा आणि पर्वतपायथ्यापर्यंत अल्पाइन वृक्षांची अभेद्य काळपट हिरवी भिंत होती. वर्षानुवर्षे  पर्वतांवरून बर्फ, पाणी वाहत असल्यामुळे काही ठिकाणी पर्वतांचे आकार एखाद्या किल्ल्याच्या तटासारखे, अजिंठा- वेरूळच्या डोंगरांसारखे दिसत होते. लेक लुईसाच्या परिसरात कॅराव्हॅन कॅ॑पिंगसाठी तळ उभारलेले आहेत. अनेकजण या रम्य मार्गाची सफर सायकलवरून करीत होते. रस्त्याच्याकडेची जांभळी, पिवळी रानफुले, निळे- पांढरे गवत तुरे माना डोलावत स्वागत करीत होते. कोसळणाऱ्या धबधब्यांच्या, वाऱ्याबरोबर येणाऱ्या तुषारांनी  ती रानफुले स्नानाचा आनंद घेत होती.

वळणा-वळणांचा चढत जाणारा रस्ता माऊंट अथाबास्कापर्यंत जातो. आमच्या बसमधून उतरून तिथल्या बसने पर्वताच्या माथ्यावर गेलो. तिथे पुन्हा बस बदलली. सहा प्रचंड मोठे दणकट रबरी टायर असलेल्या लांबलचक आइस एक्स्प्लोरर स्नो कोच मधून  कोलंबिया आइस फिल्डवर गेलो. आठ ग्लेशियर्सचा मिळून बनलेला कोलंबिया आइसफील्डचा  विस्तार ३५ चौरस किलोमीटर एवढा प्रचंड आहे. आर्किक्ट सर्कलचा हा सर्वात दक्षिणेकडील भाग समजला जातो. आइसफिल्डशी पोचेपर्यंतचा रस्ता चढ-उताराचा, मध्येच पाण्यातून जाणारा होता. शेजारून बर्फाचा झरा वाहत होता. बसच्या खिडक्यांमधून आणि बसच्या डोक्यावरच्या काचेच्या छतातून स्वच्छ आभाळातला सूर्य, तांबूस पांढरे ढग आणि आजूबाजूचे लांबवर पसरलेले बर्फच बर्फ दिसत होते. बस चालविणारी सुंदर तरुणी तिथल्या गमतीजमती सांगत मजा आणत होती. बर्फातच गाडी थांबली.धीर करून त्या बर्फावर थोडेसे चालण्याचा पराक्रम केला. बर्फावरून घसरण्याची भीती वाटत होती. खूप थंड वारे होते तरी फोटो काढण्याचा उत्साह होता.

कॅनडा भाग ४ समाप्त

 * विजेच्या तारांवरून जाणारी पाळण्यासारखी छोटी केबिन. त्याला तिकडे गंडोला म्हणतात, पण त्याला केबल कार म्हणतो

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments