सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा
कोलंबिया आइसफिल्डपासून जवळच एक अद्भुत वास्तव आमची वाट पहात होतं. ते म्हणजे ग्लेशियर स्कायवॉक! सनवाप्ता या निसर्गरम्य, सुशांत, सुंदर, अनाघ्रात दरीखोऱ्याचं दर्शन प्रवाशांना आकाशातून मनमुक्त उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे घेता यावं या कल्पनेचा ध्यास कॅनेडियन इंजिनियर्सनी घेतला. तज्ज्ञ इंजिनियर्सनी अनेक वर्षं परिश्रम करून या स्कायवॉकचा आराखडा बनविला.स्टील, ग्लास आणि लाकूड यांचा वापर करून पर्वतकड्याच्या टोकावरून एक अर्धवर्तुळाकार वॉक वे बनविण्यात आला. विशेष प्रकारच्या क्रेनच्या सहाय्याने ही काचेची लंबगोल जमीन बसविण्याचे काम २६ जुलै २०१३ रोजी पूर्ण झाले. संपूर्ण काचेची जमीन असलेला हा ‘ऑब्झर्वेशन वॉक वे’ सनवाप्ता दरीच्यावर २८० मीटर ( ९१८ फूट )वर उभारलेला आहे. अधांतरी वाटणाऱ्या या काचेच्या जमिनीवर पहिली पावलं टाकताना नक्कीच भीती वाटते. समोरच्या पर्वतावरचे ग्लेशियर, त्यातून ओघळणारे, कुठे थबकलेले हिमशुभ्र बर्फाचे प्रवाह, खालच्या खोल दरीमध्ये उड्या घेणारे धबधबे, पर्वत उतारावरील सूचिपर्णी वृक्ष, उतरणीवर चरणारे माउंटन गोट्स आणि बिगहॉर्न शिपस् असे विहंगम दृश्य कितीतरी वेळ त्या अर्धवर्तुळाकार, अधांतरी वाटणाऱ्या काचेच्या जमिनीवरुन पाहता आले. चालताना आपल्या पायाखाली पर्वतशिखरे आणि खोल दरी आहे ही अद्भुत, स्वप्नसुंदर कल्पना प्रत्यक्ष अनुभवण्याचा देवदुर्लभ आनंद मिळाला. या वॉकवेला ‘वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिवल’ॲवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
सरळसोट आठ पदरी हायवेने जास्पर इथे पोहोचलो.कॅनडाच्या पूर्वेकडील न्यू फाउंड लॅ॑डपासून पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबियापर्यंतचा ट्रांन्स कॅनडा हायवे हा ८००० किलोमीटर ( ५००० मैल ) चा अत्यंत सुंदर मार्ग आहे. ट्रेनने पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जाणाऱ्या कॅनेडियन रेल्वेने हा प्रवास चार दिवस आणि पाच रात्रींचा आहे. पर्वतरांगा, त्यावरील घनदाट जंगले, प्रचंड मोठे शेती व फळ विभाग, खूप मोठ्या प्रेअरीज ( मांस निर्यातीसाठी जोपासना केलेले पशुधन ), सायकलिंग, ट्रेकिंगचे वेगळे मार्ग आणि जलमार्गाजवळून बांधलेले मालगाड्यासाठींचे वेगळे मार्ग हे दृश्य सतत पाहायला मिळते. कॅनडाच्या पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या या मालगाड्यातून गहू, पशुधन, न्यूजपेपर व इतर पेपर पल्प बनविण्यासाठी लागणारे प्रचंड मोठे लाकडी ओंडके, खनिजे यांची सतत वाहतूक सुरू असते.
जास्परमधील सुबक बंगले गुलाब, डेलिया, जास्वंदासारख्या सुंदर फुलझाडांनी नटलेले होते .जांभळे हिरवे पोपटी तुऱ्यांचे गवत आणि रस्त्यामध्ये शोभिवंत फुलझाडांच्या मोठमोठ्या कुंड्या होत्या. आमच्या हॉटेलसमोर रॉकी माउंटन रेल्वेचे स्टेशन होते. सभोवतालच्या निळसर हिरव्या पर्वतरांगामुळे थंडी वाढली होती. हॉटेलच्या अंगणात निळसर ज्योतींची लांबट चौकोनी शेकोटी ठेवली होती. शेकोटीभोवती ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून शेक घेताना मजा वाटत होती.
तिथे आणखी एक मजा अनुभवली. आमच्या हॉटेलमधून जेवणासाठी आम्हाला जवळच्याच एका भारतीय हॉटेलमध्ये जायचे होते. त्या हॉटेलचे तरुण मालक गोपाळ व सविता शेळके हे आठ वर्षांपूर्वी नाशिकहून येऊन इथे स्थिरावले आहेत. दोघेही कुशल पाकतज्ज्ञ आहेत. हॉटेलमध्ये परदेशी लोकांची भरपूर गर्दी होती. माझी मैत्रीण शोभा म्हणजे जगन् मित्र! शोभाची या दोघांशी लगेच मैत्री झाली आणि शोभाने तिचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला. दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती. काही जणांचा पक्का उपवास तर आमच्यासारख्या काही जणांचा लंगडा उपवास होता. शोभाने त्यांच्या किचनमध्ये बटाट्याच्या उपासाच्या काचर्या करण्याची परवानगी मिळवली. नयनाच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे काचऱ्या बनविल्या. स्वतः गोपाळ यांनी शोभाने दाखविल्यासारख्या बारीक काचऱ्या कापून दिल्या व मोठ्या कढईत ढवळूनही दिल्या.त्यांच्याकडून काकड्या बारीक चिरून घेतल्या. आम्ही तिथल्या स्टोअर्समधून प्रत्येक ठिकाणी दही- ताकाची खरेदी करीत होतो. इथे शोभाने स्टोअर्समधून पीनट बटरची बाटलीही घेतली. नयनाच्या मदतीने, गोपाळच्या सहकार्याने त्याची झकास दाण्याची आमटी बनवली. गोपाळ आणि सविताने साऱ्याचे पॅकिंग केले. कारण आम्हाला तिथून साडेअकरा वाजता निघून साडेचारशे किलोमीटरवरील कामलूप्स इथे पोचायचे होते. या मार्गावर आम्ही वाटेत केलेला फराळ हा ‘दुप्पट खाशी’ या सदरात मोडणारा होता. बटाट्याच्या काचऱ्या, काकडीची कोशिंबीर, दाण्याची आमटी,नयनाने घरून भाजून आणलेल्या साबुदाण्याचा जिरे, मिरचीची फोडणी घातलेला दही- साबुदाणा शिवाय पक्का उपवासवाल्यांनी आणलेले डिंकाचे लाडू आणि फराळी चिवडा असा भरभक्कम मेनू होता. गोपाळ सविताचा निरोप घेताना आम्ही छान छोट्या पर्समध्ये काही डॉलर्स घालून सविताला दिले आणि मुंबईहून आणलेला खाऊ गोपाळला दिला. ‘आम्हीपण आज छान नवीन पदार्थ शिकलो’ असे म्हणत त्या दोघांनी भरल्या डोळ्यांनी आम्हाला ‘अच्छा’ केलं.कॅनडामध्ये संस्मरणीय चतुर्थी साजरी झाली. अर्थातच फराळापूर्वी आम्ही अथर्वशीर्ष म्हणायला विसरलो नाही.
जास्पर नंतर ‘ब्रिटिश कोलंबिया’ हा विभाग सुरू होतो. वाटेत ऊन-पावसाचा खेळ चालू होता. खूप मोठी पोपटी कुरणे, त्यात चरणाऱ्या धष्टपुष्ट गाई, उतरत्या दगडी छपरांची घरे, काळपट हिरवे पाईन वृक्ष, नद्या आणि धबधबे यांची नेहमीची साथ-संगत होतीच.कामलूप्स हे डोंगरमाथ्यावरचे एक छोटे ,स्वच्छ- सुंदर शहर आहे. दुसऱ्या दिवशी कामलूप्सहून साडेतीनशे किलोमीटर्सचा प्रवास करून व्हॅ॑क्यूव्हरला पोहोचलो.
पूर्वेकडे रॉकी माउंटन्स आणि पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर अशा देखण्या कोंदणात व्हॅ॑कूव्हर वसले आहे. व्हॅ॑कूव्हरमधील ‘लायन्स गेट ब्रिज’ ओलांडून कॅपिलोनो इथली सामन (Salman ) हॅचरी बघायला गेलो. कॅपिलानो नदीवरच्या धरणाजवळ सामन माशांचे प्रजोत्पादन केंद्र आहे. हे मासे प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन अंडी घालतात. त्यांची शिकार करण्यासाठी अस्वले टपून बसलेली असतात. गंडोला राइडने ग्रूझ पर्वतशिखरावर गेलो. इथे पूर्वीच्या काळचे शिकारी, ट्रेकर्स, अस्वले, घुबड यांचे मोठमोठे लाकडी पुतळे बनविलेले आहेत. दुपारी लंबर शो झाला. पूर्वी भल्यामोठ्या लाकडी ओंडक्यांचे तुकडे कसे करीत, त्यापासून बनवलेल्या विविध वस्तू, ६० फूट उंच वृक्षाच्या ओंडक्यावर सरसर चढत जाणे, इतक्या उंचावरून विविध कसरती करणे, या ओंडक्यावरून तशाच दुसऱ्या ओंडक्यावर तारेवरून घसरत जाणे असे धाडसी खेळ दोघांनी करून दाखविले. त्याला एका स्त्रीच्या उत्साही निवेदनाची जोड होती.
या ३००० फुटांवरील पर्वतमाथ्यावरून, छोट्या उघड्या केबलकारमधून ६००० हजार फूट उंचीवर जाताना कॅपिलानो नदी,पाइन वृक्षराजी, डोंगरमाथे यांच्या डोक्यावरून केबलकार जात होती. सूचीपर्ण वृक्षांचे शेंडे जवळून बघायला मिळाले. या वृक्षांची पाने पुढून पोपटी व मागे काळपट हिरवी होती. अधून-मधून त्यावर लाल बोंडं दिसत होती. त्यामागे निळसर हिरवे कोन होते. केबलकारने परतताना काही तांत्रिक अडचणीमुळे सर्व केबलकार्स अडकून स्तब्ध झाल्या. खूप उंचावरच्या त्या उघड्या ,अधांतरी, झुलत्या केबलकारमध्ये बसून आम्ही आजूबाजूच्या केबलकार्समधील देशोदेशींच्या लटकलेल्या प्रवाशांशी ‘हाय हॅलो’ करीत, गप्पा मारत खालच्या दरीकडे बघण्याचे टाळले. थोड्या वेळाने दुरुस्ती होऊन कार्स चालू झाल्या.
‘कॅपिलानो सस्पेन्शन ब्रिज पार्क’मधील सस्पेन्शन ब्रिज त्याच्या कठड्याला धरून, हलत-डुलत, थांबून- थांबून, धीर एकवटून क्रॉस केला. या पार्कमध्ये १००० हजार वर्षांहून अधिक वयाचे वृक्ष आहेत. या रेन फॉरेस्टमध्ये डग्लस फर,रेड सिडार,हॅमलॉक असे ३००-३५० फूट उंच वृक्ष निगुतीने सांभाळले आहेत. एके ठिकाणी जंगली घुबड बॅटरीसारखे डोळे विस्फारुन बसले होते. एका मोठ्या तळ्यामध्ये ट्राउट मासे उड्या मारीत होते.
या पार्कमधील ‘ट्री टॉप वॉक’ हा एक वेगळा अनुभव घेतला. उंच झाडांना मध्यावर गोल प्लॅटफॉर्म बांधून तिथले सात भलेमोठे घनदाट वृक्ष केबल ब्रिजने जोडले आहेत. जिन्याने पहिल्या झाडापर्यंत पोहोचताना दम निघाला पण तिथे पोहोचल्यावर भरपूर ऑक्सिजनयुक्त ,थंडगार, ताजी हवा मिळाली.खूप उंच झाडांच्या मध्यावरून त्या जंगलातील झाडे बघण्याचा अतिशय वेगळा अनुभव मिळाला. सस्पेन्शन केबलवरून चालत त्या सातही झाडांना भोज्जा करून आलो. आम्ही साधारणपणे दहा मजले उंचीवरून फिरण्याचा पराक्रम केला होता.
कॅनडा भाग ५ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈