सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ एक जिद्दी देश— इस्त्रायल  ✈️

जेरुसलेम ही आता इस्त्रायलची राजधानी आहे. या प्राचीन नगरीला चार हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास आहे.ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तीनही धर्मांसाठी हे पवित्र अध्यात्मिक ठिकाण आहे. बेथलहेम इथे येशू ख्रिस्त जन्माला आला असे मानले जाते . येशू ख्रिस्त जिथे जन्माला आला त्या जागेवर ‘चॅपेल ऑफ नेटिव्हिटी’ बांधले आहे. तसेच तिथे एक चांदीची चांदणी आहे.

आजचा इस्त्रायलचा शेवटचा दिवस हा ‘मृत समुद्राच्या’ मजेशीर अनुभवाचा होता. आमच्या जेरुसलेमच्या हॉटेलपासून मृत समुद्र एक- दीड तासाच्या अंतरावर होता. मृत समुद्राच्या सभोवतालचा भाग हा ज्युदिअन वाळवंटाचा भाग आहे. या वाळवंटात मध्ये मध्ये आम्हाला एकसारखी वाढलेली, लष्करी शिस्तीत उभी असलेली असंख्य खजुराची झाडे दिसली. या झाडांना खजुरांचे मोठ-मोठे घोस लटकलेले होते. ही इस्त्रायलच्या संशोधनाची किमया आहे. ‘सी ऑफ गॅलिली’चे पाणी पाईप लाइनने ज्युदिअन वाळवंटापर्यंत आणलेले आहे.ड्रीप इरिगेशन पद्धतीने व उत्तम जोपासना करून हे पीक घेतले जाते. थोड्याच वर्षात इस्त्रायल या वाळवंटाचे नंदनवन करणार हे नक्की! आम्ही इस्त्रायलमध्ये खाल्लेला खजूर हा काळसर लाल रंगाचा, लुसलुशीत, एका छोट्या लाडवाएवढ्या आकाराचा होता. त्यातील बी अतिशय लहान होती.इस्त्रायलमधून मोठ्या प्रमाणात खजूर निर्यात होतो.

‘मृत समुद्रा’मध्ये तरंगण्याची मजा घेणारे इतर अनेक प्रवासी होते. गुडघाभर पाण्यात गेल्यावर तिथली तळाची मऊ, काळी, चिखलासारखी माती अंगाला फासून क्लिओपात्रा राणीची आठवण जागवली. अजिबात पोहायला येत नसताना मृत समुद्राच्या पाण्यावर तरंगण्याचा  अनुभव सुखदायक होता. पाण्यातून बाहेर आल्यावर मोठमोठ्या शॉवर्सखाली आंघोळ करण्याची सोय आहे.

सौर ऊर्जेचा सर्वात जास्त उपयोग करणारा देश म्हणून इस्रायल जगात पहिल्या नंबरावर आहे.’पेन ड्राइव्ह’,’जी.पी.एस्'(global positioning system) आणि यासारखे कितीतरी अद्ययावत तंत्रज्ञान इस्रायलने जगाला दिले आहे. अत्याधुनिक संरक्षण सामग्री बनविण्यात, रोबोटिक्स, औषध निर्मिती करण्यात इस्त्रायलची आघाडी आहे. त्यांच्या शिक्षण पद्धतीत संशोधन व उद्योजकता या गोष्टींचा समावेश आहे. उद्योगधंद्यातील  उच्चपदस्थ व्यक्ती शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगतात,  मार्गदर्शन करतात. समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे असा विचार व कृती त्यांच्या देशप्रेमामुळे घडते.

राजकीय परिस्थितीमुळे ज्यू लोक जगभर विखुरले गेले. इस्त्रायलच्या स्थापनेनंतर इस्रायलमध्ये परतलेल्या प्रत्येक ज्यू व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले. मात्र त्यासाठी हिब्रू भाषा शिकणे अनिवार्य आहे. देशाचे सर्व महत्त्वाचे व्यवहार हिब्रू भाषेतूनच होतात. आम्हाला मिळालेला व्हिसा हिब्रू भाषेत होता आणि त्यातले एक अक्षरही आम्हाला वाचता येत नव्हते.   अरेबिक आणि इंग्लिश भाषेचा वापरही होतो. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक तरुणाला तीन वर्षे व तरुणीला दोन वर्षे  लष्करातील प्रशिक्षण सक्तीचे आहे. इस्त्रायलमध्ये झोपडपट्टी, भिकारी दिसले नाहीत.

त्यांच्याकडे ‘शबाथ’ पाळला जातो .म्हणजे शनिवार हा त्यांचा पवित्र दिवस! या दिवशी सार्वजनिक वाहन व्यवस्थासुद्धा बंद असते. फक्त अत्यावश्यक सेवा चालू असते. स्त्रियांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी ‘चूलबाईं’ना सुट्टी असते. कुठलाही स्वयंपाक केला जात नाही. आदल्या दिवशी केलेले किंवा आणलेले शनिवारी खातात. धार्मिक पोथ्यांचे  वाचन, सर्व कुटुंबाने एकत्र येऊन गप्पा मारीत सारा दिवस मजेत घालविणे असा त्यांचा ‘शबाथ’ साजरा होतो.

जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीपासून मायभूमीपासून तुटलेला इस्रायली समाज आपल्याकडे कोकण किनाऱ्याला, विशेषतः अलिबाग परिसरात समुद्रकिनाऱ्यावर स्थिरावला. कालांतराने ते इथल्या समाजाशी एकरूप झाले. आपला धर्म त्यांनी निष्ठेने सांभाळला. इस्त्रायल स्वतंत्र झाल्यावर त्यातील अनेकांनी इस्त्रायलला स्थलांतर केले तरी त्यांची भारतीयांशी असलेली नाळ तुटली नाही. आजही  इस्रायलमधून ‘मायबोली’ नावाचे मराठी नियतकालिक निघते. त्याचे संपादक श्री. नोहा मस्सील (म्हशेळकर ) आम्हाला मुद्दाम आमच्या जेरूसलेमच्या हॉटेलवर भेटायला आले होते. भारताबद्दलचे प्रेम त्यांच्या गप्पांमधून व्यक्त होत होते. ते सर्व मिळून १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस व १ मे हा महाराष्ट्र दिन साजरा करतात.

आमच्या ‘ट्रिपल एक्स लिमिटेड’ या इस्त्रायलच्या टुरिस्ट कंपनीचे, मूळ भारतीय असलेले, श्री व सौ बेनी यांनी आम्हाला एका भारतीय पद्धतीच्या उपहारगृहामध्ये दुपारचे जेवण दिले. त्यावेळी मिसेस रीना पुष्कर व तिचे पती, मूळ भारतीय, ही त्या हॉटेलची मालकीण मुद्दामून आम्हाला भेटायला आली. गाजर हलव्याची मोठी,ड्रायफ्रुटस् लावून सजवलेली डिश आम्हाला आग्रहाने दिली.टेबलावर  त्या डिशभोवती फुलबाजा लावून दिवाळी साजरी केली. आम्ही दहा बायकाच इस्त्रायलला आलो याचे तिने फार कौतुक केले.

किबुत्सु फार्मवर गाईंची देखभाल करणाऱ्या सोशीने  (सुशी ) सात रस्ता, भायखळा इथल्या आठवणी तसेच इथल्या मिठाईच्या आठवणी जागविल्या.तिने उत्कृष्ट दुधामधल्या ड्रिंकिंग चॉकलेट व बिस्कीट यांनी आमचे स्वागत केले.

श्री मोजेस चांदवडकर यांनी व त्यांच्या मित्रांनी उभारलेले सिनेगॉग आवर्जून नेऊन दाखविले व गरम सामोसे खाऊ घातले. हे सारेजण आम्ही दिलेल्या शंकरपाळे, चकल्या, लाडू वगैरे घरगुती खाऊवर बेहद्द खुश होते. अशा असंख्य सुखद आठवणींचे गाठोडे आम्ही भारतात परततांना घेऊन आलो.

भाग-३ व इस्त्रायल समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments