सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल
जॉर्डेनिअन एअरवेजने अमान इथे विमान बदलून स्पेनची राजधानी माद्रिद इथे पोहोचलो. माद्रिदहून आम्ही पोर्तुगालमधील पोर्टो या शहरात आलो. युरोपमधील जवळजवळ सर्व देश एकमेकांना अत्यंत उत्तम आठ पदरी महामार्गांनी व शानदार रेल्वे मार्गाने जोडलेले आहेत.’शेंगेन व्हिसा’ असल्याने (ब्रिटन सोडून ) सहजतेने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करता येतो. माद्रिद ते पोर्टो या चारशे किलोमीटरच्या प्रवासात बसच्या स्वच्छ काचेतून दुतर्फा ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ दिसत होते. डोंगर पायथ्याशी भातशेतीची आणि लुसलुशीत कोवळ्या पोपटी गवताची खूप मोठी कुरणे होती. त्यात वाळलेल्या सोनेरी गवताच्या दुलया गुंडाळून ठेवल्या होत्या.जॅकारंडाचे वृक्ष हळदी व जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरले होते. ऑलिव्ह, कॉर्क, पाम, ओक, पाईन अशा वृक्षांची दाटी होती. याशिवाय संत्री, सफरचंद, द्राक्षे यांच्या मोठ्या मोठ्या बागा होत्या. शेतांमधून कारंज्यांसारखी स्प्रिंकलर्स होती. खूप मोठ्या सोलर प्लेट लावलेल्या होत्या. डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांच्या रांगा भिरभिरत होत्या.
पोर्टो हे प्राचीन, नऊशे वर्षांपूर्वीचे सुंदर शहर डोरो नदीच्या मुखाजवळ आहे. १९९७ मध्ये युनेस्कोने या शहराचा वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश केला आहे. एकेकाळी इथूनच पोर्तुगालचा राज्य कारभार चालत असे. नव्या जगाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी दर्यावर्दींसाठी जहाजांचे बांधकाम पोर्टो येथील गोदीमध्येच झाले. पोर्टोमधील खूप उतार असलेल्या दगडी रस्त्यांवरून ट्रॅमपासून सर्व प्रकारची वाहने धावत होती. या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकींना चिकटलेल्या सलग इमारती आहेत. छोट्या घरांच्या दर्शनी भागावर सुंदर डिझाईनच्या ग्लेझ्ड टाइल्स लावल्या आहेत. या टाइल्समुळे सर्व ऋतूंमध्ये घराचे संरक्षण होते असे गाईडने सांगितले. या घरांना नळीची कौले होती आणि अगदी छोट्या जागेत, खिडकीत तर्हेतर्हेची फुलांची झाडे सौंदर्यपूर्ण रीतीने जोपासली होती. चौरस्त्याच्या मधोमध सुंदर पुतळे आहेत. इथल्या सांता क्लारा चर्चच्या अंतर्गत लाकडी नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे.उंच मनोऱ्यांवर मोठी घड्याळे आहेत.छोट्या बागांमधील दगडी चौथर्यावर, स्त्रिया, मुले, इतिहासातील पराक्रमी पुरुष, दर्यावर्दी यांचे पुतळे आहेत. प्रसिद्ध शिल्पकारांच्या शिल्पांची म्युझियम्स आहेत.
पोर्टोची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे डोरो नदीवर बांधलेले वैशिष्ट्यपूर्ण देखणे पूल! स्पेनमध्ये उगम पावलेली डोरो नदी पोर्तुगालमध्ये येऊन अटलांटिक महासागराला मिळते. निळसर रंगाच्या, समुद्राप्रमाणे भासणाऱ्या लांबरुंद डोरो नदीवरील पूल म्हणजे स्थापत्यशास्त्रातील कलात्मक सौंदर्याचे नमुने आहेत. मारिया पाया हा ६० मीटर लांबीचा, नदीवरून रेल्वे वाहतूक करणारा पूल हा संपूर्णपणे धातूचा (metallic structure) बांधलेला आहे. एकाच लोखंडी कमानीवर तोललेल्या या पुलाचे डिझाईन गुस्ताव आयफेल ( पॅरिसच्या सुप्रसिद्ध आयफेल टॉवरचे वास्तुशास्त्रज्ञ ) यांनी केले आहे. १८७७ मध्ये पूर्ण झालेला हा पूल अजूनही उत्तम स्थितीत असून तो वापरात आहे.आयफेल यांचे शिष्य टोफिलो सिरींग यांनी या नदीवर डी लुईस हा पूल १८८६ मध्ये बांधला. वाहनांसाठी असलेला हा दुमजली पूल आपल्या गुरुंप्रमाणे त्यांनी मेटलचा व एकाच कमानीवर तोललेला असा बांधला आहे. यावरून सतत वाहतूक चालू असते. त्याशिवाय आणखी तीन सिमेंट काँक्रीटचे पूल बांधण्यात आले आहेत. नदीचे विहंगम दृश्य बघण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांना जोडणाऱ्या केबलकारची सोय करण्यात आली आहे. नदीतून जुन्या पद्धतीच्या, पसरट तळ व उंच टोकदार डोलकाठी असलेल्या रिबेलो नावाच्या होड्यांतूनही वाहतूक चालते.
पोर्टोची आणखी एक खासियत म्हणजे इथली जगप्रसिद्ध ‘पोर्ट वाइन ‘. पोर्टोच्या आसपासच्या परिसरातील व डोरो व्हॅलीतील द्राक्षांपासून ही गोडसर चवीची रेड वाइन बनविली जाते. मोठ्या लाकडी पिंपांतून (बॅरल्स ) साठविली जाते व जगभर निर्यात होते.
भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈