सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ✈️
कोइंब्राहून ‘फातिमा’ इथे जाताना वाटेत दोन्ही बाजूला काळ्या द्राक्षांचे मळे होते. मुख्यतः वाइन बनविण्यासाठी या द्राक्षांचा उपयोग केला जातो.’फातिमा’ हे युरोपमधील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.फातिमा हे ‘मदर मेरी’चे स्वरुप मानले जाते .१९२२ मध्ये इथे उभारण्यात आलेल्या चर्चचे १९५३मध्ये ‘बॅसिलिका ऑफ रोझॅरिओ’ या नावाने पुनर्निर्माण झाले. त्याच्या ६५ मीटर उंच टॉवरवर सोनेरी, नक्षीदार राजमुकुट आहे व त्यावर क्रॉस चिन्ह आहे. त्या चर्चच्या भव्य आवारात एका वेळी दहा लाख लोक प्रार्थनेसाठी एकत्र येऊ शकतात. आवारातील एका विशिष्ट रस्त्यावरून तरुण- वृद्ध, स्त्री- पुरुष हातात रोझरी (जपमाळ) घेऊन गुडघ्यांवर चालत चर्चपर्यंत जात होते. ते फातिमाला केलेला नवस फेडण्यासाठी आले होते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणसांच्या मनात असलेली श्रद्धा विविध स्वरूपात दिसते.माझ्या मनात आलं की,
पार्वती आणि अष्टभूजा
मेरी आणि फातिमा
रूपे सारी स्त्रीशक्तीची
देती बळ, आशिष आम्हाला
गाईडने सांगितले की आजही पोर्तुगालमध्ये मुलीचे नाव फातिमा ठेवले जाते व पोर्तुगीज भाषेत अनेक उर्दू शब्द आहेत.
पोर्तुगालमध्ये अनेक ठिकाणी रोमन संस्कृतीच्या खुणा दिसून येतात. बाराव्या शतकापासून इथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.आम्ही ‘इव्होरा’इथे गेलो होतो.इव्होराचा समावेश वर्ल्ड हेरिटेज मध्ये आहे. वैभवसंपन्न रोमन साम्राज्याच्या खुणा इथे जपण्यात आल्या आहेत. इथल्या उंच दगडी चौथऱ्यावरवरील नक्षीदार खांब हे रोमन देवता डायना हिच्या मंदिराचे आहेत. त्याच्यासमोर बाराव्या शतकात बांधलेले गॉथिक शैलीतील भव्य कॅथेड्रल आहे. सोळाव्या शतकात या कॅथेड्रलचे नूतनीकरण करण्यात आले. ओक वृक्षाचे लाकूड वापरून केलेले नक्षीदार खांब व पेंटिंग्स बघण्यासारखी आहेत.ओक वृक्षापासून बनविलेला सोळाव्या शतकातील ऑर्गन अजूनही वापरात आहे.
लिस्बन हे पोर्तुगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.तसेच ते पोर्तुगालची सांस्कृतीक, शैक्षणिक व व्यापारी राजधानी आहे.तेगस नदीच्या मुखावर वसलेले, सात टेकड्यांचे मिळून बनलेले लिस्बन हे सुंदर शहर आहे. अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या तेगस नदीचे पात्र इथे समुद्रासारखे रुंद आहे .पंधराव्या व सोळाव्या शतकातील राजांनी सागरी मोहिमांना पाठिंबा दिला. नव्या जगाचा शोध घेण्यासाठी अनेक धाडसी दर्यावर्दी जगप्रवासाला निघाले. प्रिन्स हेनरी हा स्वतः उत्तम साहसी दर्यावर्दी होता. या काळात सागरावर पोर्तुगीजांची सत्ता निर्माण झाली. लिस्बन हे व्यापारी केंद्र बनले. वास्को-डि-गामा याने दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला ( Cape of good hope ) वळसा घालून इसवीसन १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत येथे पाऊल ठेवले. सोळाव्या शतकात पोर्तुगीज दर्यावर्दी चीन, जपान एवढेच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इथेसुद्धा पोचले होते. ब्राझीलमध्ये अनेक वर्षे पोर्तुगिजांच्या वसाहती होत्या. आज जगातील वीस कोटीहून अधिक लोक पोर्तुगीज भाषा बोलतात.
इसवीसन १७५५ मध्ये झालेल्या भयंकर भूकंपाने लिस्बन शहराची प्रचंड हानी झाली. त्यातून नवे शहर उभारण्यात आले. काटकोनात वळणारे रुंद रस्ते, सलग, सारख्या आकाराच्या इमारती, प्रवेशद्वाराजवळील भक्कम खांब, कमानी, बिल्डिंगवरील पुतळे, नक्षीकाम अशी शहर रचना नंतर सर्व युरोपभर पसरली. तेगस नदीवरील पुलाच्या दक्षिण टोकाला ८२ मीटर उंचीवर २८ मीटर उंचीचा ‘क्रिस्तो रे’ म्हणजे येशू ख्रिस्ताचा दोन्ही हात फैलावलेला भव्य पुतळा आहे. या पुतळ्याजवळील लिफ्टने वर जाऊन लिस्बनचे उत्तुंग दर्शन घेण्याची सोयही आहे.
तेगस नदीवरील या ब्रिजला ‘२५एप्रिल ब्रिज’ असेच नाव आहे. हा ब्रिज जगातील तेविसावा मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे. पोर्तुगालमध्ये दर वर्षी २५ एप्रिलला ‘नॅशनल हॉलिडे ऑफ फ्रीडम डे’ साजरा केला जातो. २५ एप्रिल १९७४ पूर्वी जवळजवळ ३५ वर्षे हुकूमशहा सालाझार याची एकतंत्री राजवट होती. नंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू झाले.
संध्याकाळी आम्ही तेगस नदीकिनारी फिरायला गेलो. नदीवरून संथपणे जाणाऱ्या केबल कारमधून अतिशय सुंदर चित्रासारखे विहंगम दृश्य दिसत होते. नदीचे रुंद पात्र, त्यावरील निळसर लाटा, नदीकडेचे निळ्या- पिवळ्या फुलांनी बहरलेले जॅकारंडा वृक्ष,पाम, ऑलिव्ह,संत्री, बदाम,मॅग्नेलिया यांची झाडे, जॉगिंग ट्रॅक वरील स्त्री-पुरुष, हिरव्या बगीच्यात खेळणारी मुले, रेस्टॉरंटमध्ये निवांतपणे खाद्य- पेयांचा आस्वाद घेणारे स्त्री-पुरुष असे नयनरम्य दृश्य दिसत होते.
केबल कारमधून उतरल्यावर तिथल्या भव्य वास्को-द-गामा मॉलमध्ये विंडो शॉपिंग केले. इथल्या रस्त्यावरच्या बऱ्याच इमारतींना जहाजासारखा, जहाजाच्या शिडासारखा आकार दिला आहे. इथल्या भव्य ओरिएंट स्टेशनवरून रेल्वे, बस आणि मेट्रो यांचे जाळे शहरभर पसरलेले आहे. या मोकळ्या, रूंद, उंचावरील स्टेशनचे कलापूर्ण छप्पर मेटलचे असून त्याला स्टीलचे खांब व काही ठिकाणी हिरवट काचा आहेत. या सार्याचा आकार निरनिराळ्या झाडांच्या फांद्यांसारखा,बुंध्यांसारखा केलेला आहे.
पोर्तुगाल भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈