सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २४- भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल
तेगस नदीच्या पात्रात १५२१ मध्ये बेलहेम टॉवर बांधला गेला. येणाऱ्या- जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले हे किल्ल्यासारखे मजबूत दगडी बांधकाम आहे. षटकोनी आकाराच्या या चार मजली टॉवरच्या प्रत्येक मजल्यावरून, त्याच्या नक्षीदार दगडी गवाक्षातून आपल्याला लांबवर पसरलेल्या नदीचे दर्शन होते. इथून जवळच ‘नॅशनल म्युझियम ऑफ आर्किऑलॉजी’ व नेव्हल म्युझियम आहेत. नॅशनल म्युझियममध्ये इजिप्त, आफ्रिका इथल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, विविध डिझाइनच्या मोझॅक टाइल्स, त्या काळातील नाणी आहेत तर नेव्हल म्युझियममध्ये नव्या जगाच्या शोधासाठी वापरण्यात आलेली जहाजे, राजेशाही नौका, समुद्र सफरीची इतर साधने, दक्षिण अटलांटिक महासागर ओलांडणारे पहिले जहाज अशा जगाच्या इतिहासातील अमूल्य वस्तू आहेत.
(बेलेम टॉवर, लिस्बन, मॉन्युमेंट टू डिस्कव्हरीज, क्रिस्तो रे (येशू ख्रिस्त) पुतळा)
तिथून जवळच ‘मॉन्युमेंट टू द डिस्कव्हरीज्’ उभारले आहे. पोर्तुगालमधील ज्या धाडसी दर्यावर्दींनी साहसी सागरी सफरीमध्ये भाग घेतला, आपल्या जिवाची बाजी लावली त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक १९६० मध्ये उभारण्यात आले. समुद्रावर आरूढ झालेल्या शिडाच्या भव्य नौकेसारखे याचे डिझाईन आहे. यावर पंधराव्या व सोळाव्या शतकातील २१ दर्यावर्दी, ज्यांनी पोर्तुगालचे समुद्रावरील अधिपत्य अधोरेखित केले त्यांचे पुतळे आहेत. या साऱ्यांच्या नेतृत्वस्थानी प्रिन्स एनरीक, जो स्वतः उत्तम दर्यावर्दी होता त्याचा पुतळा आहे. या स्मारकाच्या बाजूला
लांबरुंद फुटपाथवर सबंध पृथ्वीचा नकाशा, जलमार्ग, सर्व देशांची महत्त्वाची ठिकाणे व त्यांच्या राजधानीचे ठिकाण वेगवेगळ्या रंगाच्या ग्लेज टाइल्समध्ये अतिशय सुंदर रीतीने दाखविले आहे.
‘जेरोनिमस मॉनेस्ट्री’ हा सोळाव्या शतकातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मोनेस्ट्रीच्या अंतर्भागातील डिझाईनमध्ये वास्को-डि-गामाने आपल्या सागर सफरींमधून जे असंख्य प्रकारचे सोने, रत्ने, हिरे, मौल्यवान धातू पोर्तुगाल मध्ये आणले त्यांचा वापर केलेला आहे.युनेस्कोने १९८३ मध्ये या मोनेस्ट्रीचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अनेक प्रसंग इथे चितारलेले आहेत. प्रत्येक खांबावरील डिझाईन वेगवेगळे आहे. त्यावर धार्मिक चिन्हे, फुले, त्याकाळचे दागिने असे कोरलेले आहे.
या मोनेस्ट्रीमध्ये एका उंच चौथऱ्यावर वास्को-डि-गामाची टुम्ब ( थडगे ) आहे. त्यावर दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याच्या स्थितीमध्ये आडवा झोपलेला असा वास्को-डि-गामाचा संगमरवरी पुतळा आहे. त्याच्या समोरच्या बाजूला पोर्तुगालचा प्रसिद्ध कवी व लेखक लुइस- डि- कामोस याची तशाच प्रकारची टुम्ब आहे. या कवीने आपल्या महाकाव्यातून वास्को-डि-गामाच्या धाडसी सफरींचे गौरवपूर्ण वर्णन करून त्याला काव्यरूपाने अमर केले आहे. इसवीसन १५२४ मध्ये वास्को-डि-गामाचा मृत्यू कोचीन इथे झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याच्या मृतदेहाचे अवशेष पोर्तुगालला नेऊन ते या जेरोनिमस मोनेस्ट्रीमध्ये जतन करण्यात आले आहेत.
पोर्तुगाल म्हटलं की आपल्याला गोवा, दीव व दमण यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. मसाल्याच्या व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज लोकांनी भारतातील राजकीय अस्थिरतेचा, फुटीरतेचा फायदा घेऊन हिंदुस्तानात आपले साम्राज्य स्थापन केले हा अप्रिय पण सत्य इतिहास आहे. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात गोवा जिंकले. सत्तेबरोबर त्यांचा धर्मही रुजवायला सुरुवात केली. सत्ता, शस्त्रं, शक्तीच्या बळावर अत्याचार करून धर्मप्रसार केला. इंग्रजांचा इतिहासही काही वेगळे सांगत नाही.
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावरसुद्धा गोवा स्वतंत्र होण्यासाठी १९६१ साल उजाडले. त्यासाठी गोवा मुक्तिसंग्राम घडला. गोवा सत्याग्रहामध्ये अनेकांचा बळी गेला. त्यानंतरही लिस्बनमधील तुरुंगात असलेले श्री मोहन रानडे यांची सुटका माननीय श्री सुधीर फडके यांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. हा सारा कटू इतिहास आपण विसरू शकत नाही. आजही गोवा, दीव, दमण इथे पोर्तुगीजकालीन खुणा चर्च, घरे, रस्त्यांची, ठिकाणांची नावे अशा स्वरूपात आहेत. पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव तिथे जाणवतो.
इतिहास म्हणजे आपल्याला भविष्यकाळासाठी प्रेरणा देणारा काळाचा भव्य ग्रंथ आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी परकीय सत्ताधीशांच्या अनन्वित अत्याचाराला तोंड देत मृत्यूला जवळ केले आणि आपल्याला अनमोल स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी समृद्ध वर्तमान काळ उभा करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आपापल्या क्षेत्रातील प्रामाणिक योगदान ही स्वातंत्र्यवीरांसाठी कृतज्ञ श्रद्धांजली होईल. आपल्या भावी पिढ्यांसाठी ती अनमोल देणगी होईल.
भाग ३४ व पोर्तुगाल समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈