सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

मसाई लोकांचे छोटे घर बघायला गेलो. अगदी कोंदट, अंधारी जागा होती. त्यातच गवताचे पार्टिशन घातले होते. एका बाजूला मधोमध पेटती चूल व चुलीच्या दोन्ही बाजूंना झोपण्यासाठी मातीचे कट्टे होते. एका कट्ट्यावर छोटी मुलं व दुसऱ्या कट्ट्यावर आई-बाबा अशी झोपायची व्यवस्था होती. मागच्या भिंतीला छोटासा झरोका होता. जेवणासाठी लाकडी भांडी होती. जरा मोठी झालेली मुलं गवती पार्टिशनच्या पलीकडे अथवा आपल्या दुसऱ्या आयांकडे झोपतात. बाहेर आल्यावर तिथल्या पुरुषाने सिडार वृक्षाच्या लाकडावर सॅ॑डपेपर वूड घासून अग्नी तयार करून दाखविला.

बाजार बघायला गेलो. तिथे मण्यांच्या माळा, बांगड्या, लाकडी कंगवे, टोपल्या, मातीचे प्राणी, रंगविलेली बाउल, त्यांनी गुंडाळली होती तसली कापडं विकायला ठेवली होती. थोडी दूर असणारी नदी म्हणजे खळाळत वाहणारा गढूळ पाण्याचा ओढा होता. इथे अंघोळ, कपडे धुणे वगैरे चालते.

‘मसाई’ हाच मसाई लोकांचा धर्म आहे. प्राचीन परंपरांची जोखडं आपल्या खांद्यावरून उतरवायला ते तयार नाहीत. एका पुरुषाला कितीही लग्ने करण्याचा अधिकार आहे. मसाई स्त्रीचे आयुष्य अत्यंत कष्टप्रद आहे. स्त्री सतत बाळंतपणाच्या चक्रातून जात असते. त्यामुळे स्त्रिया कुपोषित, मुले कुपोषित व बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुले तितकी अधिक श्रीमंती अशी समजूत आहे.

पहाटे सुरू होणारा मसाई स्त्रीचा दिवस, मध्यरात्र झाली तरी संपत नाही. एकेका स्त्रीला पंधरा-पंधरा गाईंचे दूध काढावे लागते. दूध हे तिथले मुख्य अन्न आहे. कुटुंबातील सर्वांचे दूध घेऊन झाले की उरलेले दूध स्त्रीच्या वाट्याला येते.तिला लांबवर जाऊन डोक्यावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. जंगलात जाऊन चुलीसाठी लाकूडफाटा गोळा करणे हे तिचेच काम! त्यावेळी जंगलातील हत्ती, रानटी म्हशी, सिंह, साप यांची भीती असते. एका वेळी ३०-४० किलो सरपण तिला आणावे लागते कारण घर उबदार ठेवणे आणि घरातला अग्नी सतत पेटता ठेवणे ही तिचीच जबाबदारी! राख, चिखल, गवत वापरून घर बांधण्याचे, गळके घर दुरुस्त करण्याचे कामही स्त्रियाच करतात. स्वयंपाक करणे, घर सारवणे, कपडे धुणे, गाई धुणे, गाभण गाईंवर, आजारी गाईंवर लक्ष ठेवणे, परंपरागत झाडपाल्याची औषधे गोळा करणे, कधी लांबच्या बाजारात जाऊन गाय देऊन मका, बीन्स, बटाटे खरेदी करणे अशी तिची खडतर दैनंदिन असते. भरीला नवऱ्याची मारझोडही असतेच.

एवढ्या मालमत्तेची देखभाल केली तरी या मालमत्तेवर मसाई स्त्रीचा कोणताही हक्क नसतो. त्या समाजात घटस्फोट मान्य नाही. स्त्रीचे परत लग्न होत नाही. नवऱ्याच्या अनेक बायकातील एक आणि मुलांना जन्म देणारी असे तिचे स्थान आहे. जेवणात गाई, शेळ्या- मेंढ्या यांचे मांस वापरले जाते. मारलेल्या जनावरांचे मांस, हाडे, कातडी यांची नीट व्यवस्था तिला करावी लागते. या साऱ्यातून वेळ काढून ती हौसेने स्वतःसाठी, मुलांसाठी व नवऱ्यासाठीसुद्धा मण्यांच्या, खड्यांच्या माळा बनविते. ब्रेसलेट, बांगड्या, कानातले दागिने बनविणे हे उद्योगसुद्धा करते. एवढेच नाही तर दर दहा वर्षांनी स्थलांतर केले जाते त्याचीही जबाबदारी तिच्याकडेच असते.

आजही अनेक अघोरी प्रकार तिथे पाहायला मिळतात. आठवड्यातून एकदा एका गायीच्या मानेजवळील शीर कापून तिचे रक्त दुधात घालून सर्वांनी घेण्याची प्रथा आहे. त्या गाईच्या जखमेवर झाडपाल्याचे औषध लावून तिला नंतर रानात सोडून देतात. आणखी एक अघोरी प्रथा म्हणजे मुली ११ ते १३ वर्षांच्या असताना म्हणजेच त्या वयात येताना त्यांचा योनीविच्छेद(Female circumcision ) करण्यात येतो. म्हणजे स्त्रीच्या योनीतील लैंगिक अवयव थोडा अथवा पूर्णपणे काढून टाकण्यात येतो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्राने, कसलीही भूल वगैरे न देता करतात. त्यावेळी जी मुलगी ओरडेल ती भित्री समजली जाते. स्त्रीची कामेच्छा कमी व्हावी या हेतूने ही पूर्वपार चालत आलेली प्रथा आहे. यात जंतुसंसर्ग होऊन, अतिरक्तस्त्राव होऊन किती स्त्रियांचा बळी जात असेल ते त्या मसाईनाच माहित!

नैरोबीला एका हॉटेलच्या आवारात एक सरळसोट उंच, हिरवा, जाड बुंध्याचा वृक्ष आणि त्याला अगदी लगटून वाढलेले फड्या निवडुंगाचे उंच झाड वेगळे वाटले म्हणून कुतूहलाने बघत मी उभी होते. तेंव्हा तिथल्या वेटरने माहिती दिली की या मोठ्या झाडाने त्या फड्या निवडुंगालाच आपले खाद्य बनविले आहे. परत नीट बघितल्यावर लक्षात आले की त्या निवडुंगाच्या काट्यासकट दोन फांद्या अर्ध्या- अर्ध्या संपल्या आहेत. असं वाटलं की मसाई जमातीतील  अमानुष प्रथा, परंपरा, रुढी यांच्या राक्षसी झाडाने मसाई स्त्रीची काटेरी वाटसुद्धा गिळून टाकली आहे. तिचा जीवनरस शोषून घेतला आहे.

सरकारतर्फे मसाईंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. त्यांच्या वसाहतीला जवळ पडेल अशी शाळा बांधण्यात येते. मुलींना शाळेत न पाठविल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहिले तेंव्हा मुली लहान भावंडांना सांभाळीत होत्या आणि शाळेतून नुकताच परत आलेला, समुहप्रमुखाचा युनिफॉर्ममधील  मुलगा छान, स्वच्छ, चुणचुणीत वागत- बोलत होता. त्यांच्यातील काही धडपड्या महिलांनी अनेक कष्ट, हाल- अपेष्टा, पुरुषांचा मार सोसून  शिक्षण घेतले आहे. आपल्या व्यथा, आपल्यातील वाईट प्रथा उघड्या केल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काही काम सुरू केले आहे. मसाई स्त्रियांना भाजीपाला, फळे लावायला शिकविणे, शिवण शिकविणे, लिहा- वाचायला शिकविणे, प्राथमिक आरोग्याचे शिक्षण देणे अशी त्यांची अनेक उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये रेडक्रॉसचे डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या गोळ्या देतात. आपली बायको असे औषध वापरत आहे हे नवऱ्याच्या लक्षात आल्यास तिला अमानुष मार पडतो.

नुसत्या भाल्याने सिंहाची शिकार करणारे मसाई पुरुष अजून तरी बाह्य जगाच्या दबावाला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. सरकारलाही थोडे त्यांच्या कलाने घ्यावे लागते. स्वतःचे आरामशीर, आळशी आयुष्य सोडायला मसाई पुरुष सहजासहजी तयार होणार नाहीतच. जर त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर कालांतराने मसाई स्त्रीचे जीवन सुसह्य होऊ शकेल.

केनियामधील दुसऱ्या एका लॉजच्या कंपाउंडला षटकोनी लांबट आकाराचा, निवडुंगाचा खूप मोठा जाड बुंधा असलेला वृक्ष बघायला मिळाला. त्याच्या शेंड्यावर पिवळट फुलांचे मोठे गुच्छ आले होते. गाईड म्हणाला की या झाडावर पंचवीस- तीस वर्षांनी अशी फुलं येतात. मसाई स्त्रीच्या काटेरी वाटेवर काही वर्षांनी तरी आनंदाची फुलं फुलतील का? मसाई स्त्रियांच्या वाट्याला आलेले दुर्दैवी जीवन बघून खिन्न मनाने त्यांचा निरोप घेतला.

केनिया  भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments