सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कारीबू केनिया
केनियातील मसाईमारा आणि टांझानियातील गोरोंगोरो,सेरेंगेटी हा सारा सलग, एकत्रित, खूप विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. राजकीय सोयीसाठी त्याचे दोन विभाग कल्पिलेले आहेत. इथले एक आश्चर्य म्हणजे ‘ग्रेट मायग्रेशन’! दरवर्षी ठराविक वेळेला लाखो प्राणी झुंडीने स्थलांतर करतात ते बघायला जगभरचे प्रवासी आवर्जून येतात. साधारण जुलै पर्यंत टांझानियातील गोरोंगोरो, सेरेंगेटी इथले हिरवे गवत संपते, वाळते. अशावेळी फक्त गवत हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले लक्षावधी वाइल्ड बीस्ट, झेब्रे, हरणे ग्रुमिटी आणि मारा या नद्या ओलांडून, हजारभर मैलांचे अंतर कापून, केनियाच्या मसाईमारा विभागात येतात. कारण मार्च ते जूनपर्यंत केनियात पडणाऱ्या पावसामुळे तिथे भरपूर ओला चारा असतो. मसाईमारा विभागात जेंव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये हिरवे गवत संपते, वाळते तेंव्हा हे प्राणी पुन्हा सेरेंगेटी, गोरोंगोरो इथे स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराच्या काळात सिंह, चित्ता, बिबळ्या तिथे बरोबर दबा धरून बसलेले असतात. आणि नदीतील मगरी तर त्यांची वाटच पहात असतात.आयते चालून आलेले भक्ष त्यांना मिळते तर काही वेळेला एका वेळी हजारो प्राणी नदी प्रवाह ओलांडून जात असताना त्यांच्या वजनाने सुसरी दबून जातात. नदीच्या आजूबाजूला कोल्हे, तरस, गिधाडे हीसुद्धा उरलेसुरले मिळवायला टपून असतात. शेकडो वर्षांची ही निसर्गसाखळी घट्ट टिकून आहे. नाहीतरी नद्या, वारा, पक्षी, प्राणी यांना सरहद्दीची बंधने नसतातच. लाखो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे सयबेरियातील फ्लेमिंगो व इतर पक्षी ठराविक काळापुरते येतात व त्यांच्याकडील कडाक्याची थंडी संपल्यावर परत आपल्या ठिकाणी जातात. निसर्गाने पक्ष्यांना, प्राण्यांना बहाल केलेली ही जीवनशक्ती आहे.
आज लवकर नाश्ता करून, चार तासांचा प्रवास करून नैवाशा लेकला पोहोचलो. या विस्तीर्ण जलाशयातून एक तासाची सफर होती. त्या विस्तीर्ण तलावाच्या कडेने झाडे- झुडपे, पाणवनस्पती होत्या. खडकासारखे दिसणारे पाणघोडे डुंबत होते. इथले खंड्या पक्षी ( किंगफिशर ) काळ्या- पांढऱ्या रंगाचे होते. ते पाण्यावर धिरट्या घालून, लांब चोचीत अचूक मासा पकडून, झाडावर घेऊन जात. जलाशयाच्या कडेने पिवळ्या चोचींच्या बदकांचा थवा चालला होता. लांब लाल चोच आणि उंच लाल पाय असलेला पांढराशुभ्र बगळा बकध्यान लावून मासे टिपत होता. आमच्या नावाड्याने पाण्यात भिरकावलेला मासा, लांब झाडावर बसलेल्या गरुडाने भरारी घेऊन अचूक टिपला. एका बेटावरील झाडीत जिराफ, लांब माना आणखी उंच करून झाडपाला ओरबाडीत होते. बेटावर उतरून थोडे पायी फिरलो. गेझल्सचा (हरिणांचा) खूप मोठा कळप कमानदार उड्या मारीत पळाला. हरिणांसारखेच पण चांगले मोठे, काळपट तपकिरी रंगाचे, पाणीदार डोळ्यांचे, उंच शिंगे असलेले ॲ॑टीलोप नावाचे प्राणीही होते.
आज ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ या प्रदेशातून लेक नुकरू नॅशनल पार्क इथे जायचे होते. चहा व कॉफीचे मळे रस्त्याच्या कडेला होते. डोंगर उतारावर शेती होती. खालच्या उंच सखल पोपटी दरीमध्ये निळ्याशार पाण्याची छोटी- मोठी तळी, सूर्यप्रकाशात निळ्या रत्नासारखी चमकत होती. ही ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणजे मूळ मानवाचे जन्मस्थान मानले जाते. संध्याकाळी लेक नुकरू या मचुळ पाण्याच्या सरोवरापाशी गेलो. भोवतालच्या दलदलीत असंख्य काळे- पांढरे पक्षी चरत होते. हेरॉन, पेलिकन, शुभ्र मोठे बगळे होते. कातरलेले पंख असलेले स्पर विंगड् गूझ होते.
विषुववृत्ताची कल्पित रेषा केनियामधून जाते. दुसऱ्या दिवशी माउंट केनिया रीजनला जाताना, वाटेत थॉमसन फॉल्स नावाचा धबधबा पाहिला. एका गावामध्ये ‘इक्वेटर’ अशी पाटी होती. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून माउंट केनियाकडे जाताना रस्त्यावर अनेक धावपटू स्त्री-पुरुष पळताना दिसले. इथल्या ‘केनिया स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये ऑलम्पिक पदक विजेते धावपटू घडविले जातात. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या गावात केनियातीलच नाही तर अन्य देशांचे खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात.
१६०००.फूट उंच असलेल्या माउंट केनियाच्या उतरणीवर ‘सेरेना माउंट लॉज’ हे गर्द जंगलातील हॉटेल ५२०० फूट उंचीवर आहे. संपूर्ण हॉटेल महोगनी आणि सीडार वृक्षांचे लाकूड वापरून बांधलेले आहे. प्रत्येक रूममधील काचांच्या मोठ्या खिडक्यातून पुढ्यातला छोटा, नैसर्गिक मचुळ पाण्याचा तलाव दिसत होता. तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीत खनिज द्रव्य आहेत. ही खनिज द्रव्य मिळविण्यासाठी, इथली माती चाटण्यासाठी जंगली प्राणी रात्री या पाण्यावर येतात. हॉटेलला मोठे फ्लड लाईट लावून ठेवले होते. वेगवेगळे प्राणी पाण्यावर आले की हॉटेलचा स्टाफ आपल्याला सूचना द्यायला येतो. तसेच एक घंटाही वाजवतात. रानटी म्हशी, हरिणे, रानडुक्कर, हैना असे अनेक प्राणी आम्हाला काचेतून दिसले.
माउंट केनिया हा थंड झालेला ज्वालामुखी पर्वत १६००० फूट उंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शिखरावरील बर्फ चमकताना दिसत होते. केनियाच्या आग्नेय दिशेला हिंदी महासागर आहे. युगांडा, टांझानिया, सुदान, सोमालिया हे देश सभोवती आहेत. १९६३ मध्ये केनियाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा जोमो केन्याटा हे पहिले पंतप्रधान झाले. शेतीप्रधान असलेल्या या देशातून चहा व कॉफीची निर्यात होते. अलीकडे ताजी गुलाबाची व इतर फुले युरोपमध्ये निर्यात केली जातात. पर्यटन हेही उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
देवाघरचे हे समृद्ध निसर्ग वैभव एक प्रवासी म्हणून आपल्याला आवडते परंतु तिथल्या सर्वसामान्य माणसाचे जीवन फार कष्टाचे, गरिबीचे आहे.
आक्रमक घुसखोर स्वभावाला अनुसरून चिनी ड्रॅगनने आपला विळखा जवळजवळ सर्व आफ्रिकेला घातला आहे. एअरपोर्ट, बंदरे, रस्ते अशा सोयी उभारून देणे, त्यासाठी प्रचंड कर्ज देणे आणि कर्ज फेड न झाल्याने ते प्रोजेक्ट गिळंकृत करणे अशी ही कार्यशैली आहे.( याबाबतीत नेपाळ व श्रीलंकेचे उदाहरण आहेच). आफ्रिकेतील शेतजमिनी, खाणी यामध्ये चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. केनियामध्येही चिनी गुंतवणुकीचा वाढता ओघ आहे.
नैसर्गिक व खनिज संपत्तीचे वरदान असलेल्या या देशांना ब्रिटनने आधीच लुटले आहे. आता देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी केनिया आणि इतर आफ्रिकी देशांनी चिनी कर्जांच्या काटेरी सापळ्यात न अडकता पुढील वाटचाल केली तर ते हितावह होईल. पण…….
केनिया भाग ३ व केनिया समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈