सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल
कॅपाडोकीयाजवळ चार हजार वर्षांपूर्वीचं एक भुयारी शहर पाहिलं. शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जमिनीखाली हे सात मजल्यांचं शहर बसवलं होतं.टर्कीमध्ये अशी आणखी काही शहरं प्रवाशांना दाखविण्यासाठी स्वच्छ करून प्रकाशाची सोय केलेली आहे. गाईडच्या मागून वाकून चालत, कधी ओणव्याने जाऊन ते भुयारी शहर पाहिलं. त्यात धान्य साठविण्याच्या जागा, दारू तयार करण्याची जागा, एकत्र स्वयंपाक करण्याची जागा, स्वयंपाकाचा धूर बाहेर दिसू नये म्हणून घेतलेली काळजी, मलमूत्र साठविण्याचे भले मोठं दगडी रांजण, मृत व्यक्तींना टाकण्याचेही वेगळे दगडी रांजण, प्रार्थनेसाठी जागा असं सारं काही होतं. सकाळपासून रात्रीपर्यंतचे सारे कार्यक्रम त्या अंधाऱ्या, सरपट जायच्या बोळातून करायचे. हजारो माणसांनी त्यात दाटीवाटीने राहायचं! कल्पनेनेही अंगावर काटा आला. सहा- सहा महिने बाहेरील ऊन वारा न मिळाल्याने माणसं फिकट पांढुरकी, आजारी होऊन जात. ‘सबसे प्यारा जीव’ वाचविण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तीमंत दर्शन झालं.
अंकारा ही टर्कीची राजधानी. तिथल्या ‘अनातोलिया सिव्हिलायझेशन म्युझियम’ मध्ये प्राचीन संस्कृतीचा वारसा नेटकेपणाने जपला आहे. उत्खननात सापडलेल्या दगडी मूर्ती, भलं मोठं दगडी रांजण, वेगवेगळ्या जातींच्या दगडांपासून बनविलेले दागिने, हत्यारे असं सारं आहे. त्यातील तीन- चार दगडी शिल्पे मात्र विलक्षण वाटली. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहेत हे शिल्प आपल्याकडे आपण नेहमी पाहतो. अगदी तशाच प्रकारची शिल्पं, पण चेहरे थोडे वेगळे. अशी चार-पाच दगडी शिल्पे तिथे होती. त्याचा संदर्भ मात्र मिळाला नाही.
अंकारामध्ये राष्ट्रपिता केमाल पाशा यांचं अतिभव्य स्मारक आहे. एक राष्ट्रप्रमुख द्रष्टा असेल तर राष्ट्राची किती आणि कशी प्रगती होऊ शकते याचं अतातुर्क (म्हणजे तुर्कांचा पिता) केमाल पाशा हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्या अत्याधुनिक विचार शैलीने व थोड्या लष्करी शिस्तीने टर्कीला युरोपियन राष्ट्रांच्या पंक्तीत देऊन बसविले आहे. स्त्री- पुरुष सर्वांना सक्तीचं शिक्षण केलं. बुरखा, बहुपत्नीत्व या पद्धती रद्द केल्या. मुल्ला मौलवींचा विरोध खंबीरपणे मोडून काढून स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तंत्रज्ञानाची, आधुनिक विज्ञानाची विद्यापीठे उभारली. व्यापार उद्योग, स्वच्छता, पेहराव, प्राचीन संस्कृतीचं जतन अशा अनेक गोष्टी त्यांनी राष्ट्राला शिकविल्या.१९३८ मध्ये मृत्यू पावलेल्या या नेत्याचे उत्तुंग स्मारक बघताना हे सारं आठवत होतं. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या वस्तू, फोटो, युद्धाचे देखावे असं त्या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे.
रात्री विमानाने इस्तंबूल विमानतळावरून उड्डाण केलं. खिडकीतून पाहिलं तर इस्तंबूलच्या असंख्य प्रकाश वाटा हात हलवून आम्हाला निरोप देत होत्या. आम्हीही या पूर्व- पश्चिमेच्या सेतूचा ‘अच्छा’ (आणि ‘अच्छा’ म्हणजे ‘छान’ असंही) म्हणून निरोप घेतला.
भाग ४ व इस्तंबूल समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान … लिखाण आवडले.