सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग
या हर्मिटेजमध्ये असंख्य प्रकारची घड्याळे आहेत. हिरे जडविलेली, लहान, गोंडस बाळांच्या हातात असलेली,होडीच़्या आकारातील, पऱ्यांनी हातात धरलेली, खांबांवर बसविलेली अशा अनेक तऱ्हा. या साऱ्यांमध्ये मोराचे घड्याळ अप्रतिम आहे. सोन्याचा मुलामा दिलेल्या एका गजांच्या पिंजऱ्यासारख्या घरामध्ये, सोनेरी मोर आपला निळा जांभळा रत्नजडित पिसारा फुलवून उभा आहे. त्याच्या पायाशी एका बाजूला एक मोठा लाल सोनेरी कोंबडा आहे. दुसऱ्या बाजूला खारुताईच्या डोक्यावर एक छोटा गोल आहे. कोंबड्याचा पोटात असलेली किल्ली फिरवून ठेवली की दर एक तासाने कोंबडा आरवे. कोंबडा आरवला की खारुताईच्या डोक्यावरील गोल पिंजरा फिरू लागे व त्याच्या घंटा मंजुळ वाजू लागत. घंटा वाजायला लागल्यावर मोर पिसारा फुलवे. तांब्यावर सुवर्ण मुलामा दिलेली ही कलाकृती, त्यातील नाजूक यंत्रणेमुळे आता चालविण्यात येत नाही.
पण नजाकतीने पिसारा उभारलेला मोर मनामध्ये कोरला जातो. मोराच्या पिंजऱ्यापासून जवळ मोझॅक टाइल्समध्ये काढलेली माणसांची, पक्षी-प्राण्यांची अप्रतिम चित्रे आहेत. तर जवळच्या एका चहा टेबलाची षटकोनी नक्षीही मोझॅक टाइल्समधील आहे. पाणी भरायला आलेल्या दोन स्त्रिया आपल्या उंच, उभ्या हंड्यांवर हात ठेवून, एकमेकींशी कुजबुजंत गप्पा मारत (स्त्रियांच्या गॉसिपिंगचा ऐतिहासिक पुरावा) उभ्या असलेले शिल्प नेहमीच्या परिचयाचे वाटल्याने लक्षात राहिले.
संध्याकाळी थोडे चालत, थोडे बसने जाऊन पॅलेस थिएटरला गेलो. हे दिवस ‘पांढर्या रात्रीं’चे म्हणजे व्हाईट नाईटसचे होते. रात्री उशिरापर्यंत चांगला उजेड असतो. रस्त्यांवरून मित्र-मैत्रिणी मजा करत हिंडत होती. दुकाने, मॉल्स, हॉटेल्स खच्चून भरली होती. एकदा का कडाक्याची थंडी सुरु झाली की घराबाहेर पडणे मुश्कील होते. रस्त्यावर झेंडू व लाल पिवळ्या फुलांची सुंदर सजावट केली होती. अधून मधून हिरवळीचे गालिचे होते. आम्हाला बघून रस्त्यावरची लोकं ,’इंडिया, इंडिया’ असे म्हणत व लगेच राज कपूरच्या सिनेमातील आणि लता मंगेशकरची गाणी म्हणायला सुरुवात करीत.’ मेरा जूता है जपानी’ तर फारच लोकप्रिय होतं. लोक उंचनींच, धिप्पाड, नाकेले आणि लालसर गोरे होते. तरुणाई युरोपियन फॅशनमध्ये होती. फॅशनेबल ड्रेसेस, त्यांचे रंग पेन्सिलसारख्या टाचा असलेले बूट सारे त्यांना शोभून दिसत होते. सारे पाहात भव्य युरोपा हॉटेलवरून इटालियन स्ट्रीटवर पोहोचलो. आम्ही ग्रँड पॅलेस थिएटरची ‘स्वान लेक’ या बॅलेची तिकिटे काढलेली होती. आमच्यासारखेच इतर देशातील प्रेक्षक लगबगीने आत शिरत होते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट सोकोलाव्ह यांनी १७९९ मध्ये हे सुंदर वास्तुशिल्प उभारले. थिएटरचे देखणेपण कसोशीने जपले आहे. मार्बलच्या अर्धवर्तुळाकार रूंद जिन्याने पहिल्या मजल्यावर गेलो. या जिन्याच्या कठड्याला पंख असलेल्या, कुरळ्या केसांच्या, छोट्या गोंडस बाळांचे शिल्प अनेक ठिकाणी बसवीले आहेत. प्रवेशद्वारापाशी, देखणे सौष्ठव असलेल्या आईच्या मांडीवर निवांत पहुडलेल्या बाळाचे सुंदर शिल्प आहे. जिन्याच्या व प्रवेशद्वाराच्या भिंती सुंदर पेंटिंग्जनी,दिव्याचे आकर्षक खांब यांनी सजविल्या आहेत. मोठ्या हॉलच्या प्रवेशद्वारावर सोनेरी रंगाची वेलबुट्टी आहे. त्याच्या पुढील पिवळट रंगाच्या ड्रॉइंगरूममध्ये सोव्हिनियर्स, बॅले ड्रेसमधील नर्तिका अशा वस्तूंची विक्री चालू होती. पुढे छोटा ग्रीन हॉल व बुफे रूम अशी रशियन क्लासिकल स्टाइल अंतर्गत सजावट आहे.
राजघराण्याच्या करमणुकीसाठी म्हणून १७४० मध्ये ‘इंपीरियल स्कूल ऑफ बॅले’ची पीटर्सबर्गमध्ये स्थापना झाली. रशियाच्या संपन्न परंपरेचे राष्ट्रीय लोकनृत्य म्हणजे बॅले. राज्यकर्त्यांनी ही कला टिकावी, वाढावी म्हणून आर्थिक पाठिंबा व प्रोत्साहन दिले. महान रशियन कवी अलेक्झांडर पुष्किन यांनी ‘जीव ओतून केलेले, नजाकतीने सादर केलेले भावपूर्ण नृत्य म्हणजे बॅले’ असे बॅलेचे वर्णन केले आहे. (flight performed by the soul). किरॉव्ह बॅले कंपनी व बोलशाय बॅले कंपनी या दोन जगप्रसिद्ध बॅले कंपनी आहेत.किरॉव्हच्या परंपरेतील कोरियोग्राफी या ‘स्वान लेक’ला लाभली आहे. थिएटरमध्ये थोडीशी अर्धवर्तुळाकार अशी खुर्च्यांची रचना होती. आम्ही बसलो होतो त्याच्या थोड्या उंचीवर, भिंतीच्या दोन्ही कडांना तीन-तीन खुर्च्यांचे छोटे,तिरके बॉक्स होते. आपल्या अॉपेरा हाउस थिएटरमध्ये होते तसे!वर अर्धवर्तुळाकार लाकडी बाके असलेली गॅलरी होती. याला पॅराडाइज गॅलरी म्हणतात. वैशिष्ट्य म्हणजे लाइव्ह सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. स्टेजच्या पुढील बाजूस वाद्यवृंद बसला होता.
बरोबर आठला पडदा बाजूला झाला. कमनीय, लवचिक देहाच्या बारा पऱ्या, स्वच्छ पांढऱ्या पिसासारख्या फ्रिलचा ड्रेस घालून चवड्यावर शरीर तोलत, कधी स्वतःभोवती गिरक्या घेत होत्या तर कधी जोडीदाराच्या हातावर चढून शरीराचा तोल सांभाळत नृत्य करीत होत्या. ही एका राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्र वयात येतो. किल्ल्याजवळील बागेत मित्रांबरोबर खाणेपिणे, नाच सुरू असते. राजमाता अचानक येते. पार्टीतील वाइन वगैरे बघून नाराज होते. मित्र गेल्यानंतर राजपुत्र बागेत फिरत असताना त्याला राजहंसांचा थवा दिसतो. शिकारीसाठी म्हणून तो त्यांच्या मागे बाण सरसावून जातो. त्याला दिसते की ते राजहंस जंगलाच्या मध्यभागी सरोवरात पोहत असतात. ते राजहंस म्हणजे सुंदर तरुणींचे जादूगाराने केलेले रूपांतर असते .त्या तरुणी फक्त रात्री मनुष्यदेह धारण करू शकतात. त्यातील राजकन्या राजपुत्राच्या प्रेमात पडते. पण तिला जादूगाराची भीती वाटत असते. राजपुत्र तिला स्वतःच्या प्रेमाची, निष्ठेची ग्वाही देतो. तेव्हा हाच आपली दुष्ट जादूगाराच्या तावडीतून सुटका करू शकेल अशी तिला खात्री वाटते. राजमहालात परतल्यानंतर राजपुत्राच्या आईने त्याच्यासाठी देशोदेशीच्या अनेक राजकन्या पसंतीसाठी आणलेल्या असतात. त्यांच्याबरोबर राजपुत्राला नृत्य करावे लागते. त्यावेळी जादूगार आपल्या मुलीला राजहंसाच्या रूपातील राजकन्येसारखे बनवतो. राजकुमार फसतो. तो जादूगाराच्या मुलीची निवड करणार एवढ्यात त्याला किल्ल्याच्या खिडकीमध्ये खरी राजकन्या दिसते. सारे तिथेच सोडून तो तिच्यामागे धावत जंगलातील सरोवरामध्ये जातो. राजकन्येचा गैरसमज दूर करतो व तिथे आलेल्या जादूगाराचे पंख छाटून त्याला मारून टाकतो. राजकन्या व तिच्या सख्यांची सुटका होते. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात राजकन्या व तिच्या सख्या आनंदाने नाचू लागतात. अर्थातच राजपुत्र व राजकन्या यांचा विवाह होऊन ते सुखाने नांदू लागतात अशी गोष्ट होती. अतिशय लयदार, शिस्तबद्ध, कधी हवेत तरंगत केल्यासारखे वाटणारे सांघिक हालचालींचे हे समूह नृत्य व त्यातून सादर केलेल्या गोष्टीने आम्हाला एक तासभर खुर्च्यांवर जणू बांधून ठेवले होते. सुंदर प्रकाशयोजना व संगीत संयोजन यामुळे बॅले रंगतदार झाला होता.
आपल्याकडेही असे अनेक राजहंस आहेत. समूह नृत्य प्रकारातून ऐतिहासिक व पौराणिक कथा अतिशय कौशल्याने, सांघिक हालचालीने सादर केल्या जातात. श्री शिवरायांच्या जीवनावरील ‘जाणता राजा’ ,अशोक हांडे यांचे ‘मराठी बाणा’, किंवा गोव्याच्या कलाकारांनी सादर केलेले श्रीकृष्णाच्या जीवनावरील ‘संभवामी युगे युगे’ अशी अनेक सुंदर नृत्य नाट्ये सादर होतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातही असे सुंदर सामूहिक नृत्य प्रकार आहेत. ही कला टिकविण्यासाठी आपण अशा कार्यक्रमांना सक्रीय पाठिंबा देऊन, कलाकारांना, निर्मात्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈