सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा
“आपण जर या नदीपलीकडे जाऊन त्या निळ्या डोंगरावर चढलो आणि थोडेसे पाय उंचावले तर तो पांढऱ्या शुभ्र ढगांचा मऊमऊ कापूस नक्की आपल्या हातात येईल” वंदन म्हणाली. आमच्या सर्वांच्या मनातल्या कल्पनेला तिने शब्दरूप दिले होते. नीरव शांतता, स्वच्छ, ताजी, थंड, मोकळी हवा. पुढ्यात जियाभरोली नदीचे नितळ, निळसर थंडगार पाणी वाहत होते. त्यात निळ्या आकाशात तरंगणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ढगांचे आणि काठावरच्या हिरव्या वृक्षराजीचे प्रतिबिंब पडले होते नदीच्या मागे पांढरे शुभ्र पिंजलेले ढग माथ्यावर घेऊन निळसर डोंगरांच्या रांगा श्रीकृष्णाच्या मेघःशाम स्वरूपाची आठवण देत उभ्या होत्या.
आसाममधील तेजपूरपासून ३५ किलोमीटरवरील नामेरी इकोकॅ॑पमध्ये आमचा मुक्काम होता. लवकर म्हणून उठलो तरी छान उजाडलेलं होतं. नदीकाठी उंचावर बांधलेल्या लहान मोठ्या बंगल्यांमधून वाट काढीत तिथल्या वॉच टॉवरवर चढलो होतो. समोरच्या या दृश्याने आमची नजर खेळवून ठेवली होती.
ईशान्य भारताला आता पूर्वांचल म्हणून ओळखले जाते. पूर्वांचलची भौगोलिक परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. दुर्गम पर्वतराजी, निबीड अरण्ये, महाबाहो ब्रह्मपुत्रा, तिच्या उपनद्या आणि इतर नद्या यांचे अनुपम सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. तिथल्या विविध जनजातींच्या विविध भाषा, संस्कृती, आचारविचार सारेच आपले कुतूहल वाढविणारे आहे. हा गूढरम्य प्रदेश पूर्वी आसाम याच नावाने ओळखला जात असे. आसाम आता सात राज्यात वाटला गेला आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड. पुराणकथांचा, इतिहासाचा सुंदर गोफ या भूमीभोवती विणला गेला आहे. त्या अदृश्य धागांनी आपले या भूमीशी असलेले नाते घट्ट झाले आहे. असं सांगतात की नागालँडच्या डिमापूर शहराचे मूळ नाव हिडींबापूर असे होते. भीमाने ज्या हिडिंबेशी विवाह केला ती इथलीच. तर मणिपूरच्या राजकन्याशी म्हणजे चित्रांगदेशी अर्जुनाने विवाह केला होता. त्यांच्या पुत्राचे नाव बभ्रुवाहन.
गुवा म्हणजे सुपारी. ही सुपारीची बाजारपेठ गुवाहाटी पूर्वीच्या आसामची राजधानी होती. आताच्या आसामची राजधानी दिसपूर असली तरी गुवाहाटी आणि दिसपूर ही जुळी शहरे आहेत. महाभारतात आसामचा कामरूप असा उल्लेख आहे आणि गुवाहाटीचे नाव होते प्राग्ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसविले. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेतील सोळा सहस्त्र नारींची सुटका केली. त्यांच्याशी विवाह करून त्या पुरुषोत्तमाने त्या स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली ही गोष्ट सुद्धा सर्वांना माहीत असलेली.
आहोम राजांनी १३व्या शतकात आसाममध्ये आपले राज्य स्थापन केले. शिवसागर ही त्यांची राजधानी. जवळजवळ सहा शतके या हिंदुराजांचे राज्य आसाममध्ये होते. या काळात मोंगलांनी केलेली आक्रमणे इथे अयशस्वी ठरली. अजूनही गुवाहाटी शहरातील नवीन बांधकामाच्या वेळी तिथल्या ढिगार्यातून विविध आकारांचे तोफ गोळे सापडतात. १६७१ साली सराई घाट इथे आहोम राजे व मोंगल यांच्यामध्ये जी लढाई झाली त्यातील हे तोफगोळे असावेत असे इतिहास संशोधकांनी सांगितले.
कोलकत्याहून गुवाहाटीला आलो होतो. सकाळी लवकर आवरून निघालो. तेजपूर पासून पुढे ३५ किलोमीटरवरील नामेरी कॅम्प इथे मुक्काम करायचा होता. डोंगरदर्यांचा, वळणावळणांचा रस्ता असल्याने गुवाहाटी ते तेजपूर या १८० किलोमीटरच्या प्रवासाला दहा-बारा तास लागले. डोळ्यांना सुखविणाऱ्या हिरव्या रंगाच्या विविध छटा चारही बाजूंनी सोबत करीत होत्या. लांबवर पसरलेली पोपटी, हिरवी, सोनेरी भातशेती, चहाच्या विस्तीर्ण मळ्यांचा काळपट हिरवा गालिचा, शिडशिडीत उंच सुपारीची झाडं, जाड जाड बांबूंची बनं, नारळ, केळी, आणि डोंगरउतरणीवरचे अननसाचे मळे दिसले. त्याशिवाय साग, साल, देवदार, ओक हे वृक्ष अधून मधून दिसत होते. झाडांमध्ये लपलेली टुमदार कौलारू घरं मधूनच डोकावत होती. शेणाने किंवा मातीने लिंपलेल्या त्या घरांच्या भिंतींवर छान चित्रकला दिसत होती. बांबूच्या कलात्मक कुंपणाने वेढलेल्या या घरांशेजारी छोटेसे तळे असे. त्यातील ताजे, गोड्या पाण्यातले मासे आणि भात हेच इथले प्रमुख अन्न आहे.
आसाम भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈