सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️
टंगमर्गवरून आम्ही गुलमर्ग इथे गेलो. पायथ्याशीच थंडीचे कोट व बूट भाड्याने घेतले. गोंडेला राइड ( केबल कार राइड ) जिथून सुरू होते त्याच्या दीड किलोमीटर आधी आपल्या गाड्या थांबतात. तिथून बर्फावरील स्लेजने, स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने गोंडेला स्टेशनवर पोहोचता येते किंवा बर्फ बाजूला केलेल्या चांगल्या रस्त्यावरून थोडासा चढ चढून चालत जाता येते. आम्ही रमतगमत चालण्याचे ठरवले. प्रवाशांचे जत्थे कुणी चालत तर कुणी स्लेजवरून गोंडेला स्टेशनला जात होते .प्रवाशांना ओढत नेणाऱ्या स्लेज गाड्यांची उजवीकडील बर्फातील रांग आणि डावीकडील अर्धी बर्फात बुडलेली घरे पाहत गोंडेला स्टेशनवर पोहोचलो. खूप मोठी रांग होती. चार- चार प्रवाशांना घेऊन गोंडेला (केबल कार्स ) जात होत्या. त्यात धावत्या गाडीत बसल्याप्रमाणे पटकन बसल्यावर दरवाजे बंद झाले. खालीवर, सभोवती पांढरे शुभ्र बर्फच बर्फ. काही धाडसी ट्रेकर्स ती वाट चढून जाताना दिसत होते. त्यांच्या गुडघ्यापर्यंत आत गेलेल्या बुटांच्या खुणा गोंडेलातून स्पष्ट दिसत होत्या. बर्फात बुडालेली मेंढपाळ गुराखी या गुजर जमातीची घरे रिकामी होती. हे लोक बर्फ वितळेपर्यंत गुरे, शेळ्यामेंढ्यांसह खाली सपाटीवर येऊन राहतात व नंतर परत आपल्या घरी येतात. पश्मिना या एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीच्या पश्मिना शाली हलक्या, उबदार असतात. महाग असल्या तरी त्यांची नजाकत और असते.
गोंडेलाने पहिल्या टप्प्यापर्यंत म्हणजे कॉंगडोरीपर्यंत गेलो. त्यापुढचा अफरबटचा टप्पा इथून धुक्यात हरवल्यासारखा दिसत होता. पण हौशी, धाडसी प्रवासी तिथेही जात होते. पहिल्या टप्प्यावर उतरून तिथे बांधलेल्या लाकडी कठड्यांवर निस्तब्ध बसून राहिले. नगाधिराज हिमालयाचं दर्शन म्हणजे विराटाचा साक्षात्कार! ते भव्य- दिव्य, विशाल, थक्क करणारं अद्भुत दर्शन आज युगानुयुगे तिथे उभे आहे. अभेद्य कवचकुंडलासारखे आपले संरक्षण करीत चिरंजीवित्वाने ताठ उभे आहे. अशावेळी वाटतं की, आपण असणं आणि नसणं ही फार फार क्षुल्लक गोष्ट आहे. हे सनातन, चिरंतन वैभव आहे म्हणून आपल्या अस्तित्वाला किंचित अर्थ आहे.
थोड्याच दिवसात तिथे स्कीईंग कॉम्पिटिशन सुरू होणार होत्या. त्यात भाग घेणारी तरुणाई तिथे उत्साहाने प्रॅक्टिस करीत होती. हौशी प्रवासी स्कीईंगची मजा घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या सहाय्याने धडपडत होते. आम्ही स्लेजची राइड घेतली. छोट्याशा लाकडी चाकवाल्या फळकुटावरून, मागेपुढे मदतनीस घेऊन बर्फाच्या गालीच्यावरून थोडे चढून गेलो आणि त्यांच्याच मदतीने घसरत परतलो. आल्यावर गरम- गरम छान कॉफी प्यायल्यावर थोडे उबदार वाटले. गरम चहा, कॉफी, भेळ, सँडविच सारा नाश्ता अगदी तयार होता.स्वित्झर्लंडला जुंगफ्रा येथे लिफ्टने वर जाऊन बर्फात जायच्या आधी गरम- गरम टोमॅटो सूप घेतले होते तेव्हा त्या व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. तेही आता उरले नाही. ‘हम भी कुछ कम नही’ हे सप्रमाण सिद्ध झाले.
जम्मू ते श्रीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची जोरदार उभारणी सुरू आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे बरेचसे काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काश्मीर खोऱ्याच्या गरजा द्रुतगतीने पूर्ण होतील आणि पर्यटनातही चांगली वाढ होईल.
असे सतत जाणवत होते की सर्वसामान्य काश्मिरी माणसाला असे तणावपूर्ण आयुष्य नको आहे. गरिबी आणि अज्ञान यामुळे त्यांच्यापुढील मार्ग बदलले आहेत. अजूनही तरुणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाच्या मार्गाला लावले जाते. राजकीय परिस्थितीमुळे या देवभूमीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांचे दुःख फार मोठे आहे. या भूप्रदेशाची कथा आणि व्यथा खूप वेगळी आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक समस्या इथे ठाण मांडून उभ्या आहेत. आपले ‘सख्खे शेजारी’ हर प्रयत्नांनी ही परिस्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत करणारे ‘विषारी ड्रॅगन’ त्यात भर घालतात. दहशतवादाची काळी सावली आज साऱ्या जगावर पसरली आहे.
वैष्णोदेवी, कारगिल, लेह- लडाख, अमरनाथ, काश्मीरचे खोरे अशा अनंत हातांनी हिमालय आपल्याला साद घालीत असतो. आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे या हाकेला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. शांततापूर्ण सौंदर्याची, समृद्धीची बहुरंगी ट्युलिप्स इथे बहरतील अशी आशा करुया.
भाग ४ आणि श्रीनगर समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈