सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
अंदमान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काळं पाणी या शब्दांचं नातं अतूट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पवित्र झालं आहे. लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात नेताना एका दिवसासाठी येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. इसवी सन १९४२ साली सुभाषचंद्र बोस यांनीही या तुरुंगाला भेट दिली होती.
अंदमान व निकोबार हा दक्षिणोत्तर पसरलेला जवळजवळ ३५० बेटांचा समूह भारताच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरात आहे. चेन्नई आणि कोलकता अशा दोन्हीकडून साधारण १२०० किलोमीटर अंतरावर ही बेटं येतात. पूर्वी तिथे बोटीने पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागत. आता चेन्नई किंवा कोलकताहून विमानाने दोन- तीन तासात पोहोचता येतं. आम्ही चेन्नईहून विमानाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर उतरलो. जेवून लगेच सेल्युलर जेल बघायला निघालो.
ब्रिटिशांनी १९०६ साली या जेलचं बांधकाम पूर्ण केलं. चक्राच्या दांड्यांसारख्या सात दगडी, भक्कम तिमजली इमारती व त्या इमारतींना जोडणारे मधोमध असलेले वॉच टाॅवर अशी या तुरुंगाची रचना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ अंदमान जपानी लोकांच्या ताब्यात होते. इमारतींच्या सात रांगांपैकी तीन रांगा जपान्यांनी नष्ट करून टाकल्या. आता एका इमारतीत हॉस्पिटल आहे व एकात सरकारी कर्मचारी राहतात.हा सेल्युलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक ज्ञात व अज्ञात शूरवीरांनी भोगलेल्या हालअपेष्टांचं काळं पान. साम्राज्यवादी ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या वेडाने भारलेल्या अनेकांनी या यज्ञकुंडात उडी घेतली. अशा अनेकांना अंदमानला सश्रम कारावासाच्या शिक्षेवर पाठविले जाई. ब्रिटिशांच्या क्रूर, कठोर, काळ्याकुट्ट शिक्षांमधून केवळ काळच त्यांची सुटका करू शकणार असे. अंदमानचा तुरुंग म्हणजे काळं पाणी. एकदा आत गेला तो संपल्यातच जमा!
दगडी, दणकट, अंधारलेले जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आलो. तिथल्या शेवटच्या ४२ नंबरच्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. आज त्याला पवित्र तीर्थस्थानाचं महत्त्व आहे. सावरकरांनी लिहिलेले ‘कमला’ काव्यही तेथील दगडी भिंतीवर आहे. स्वातंत्र्यवीरांचा फोटो व अशोकचक्राची प्रतिमा आहे. एकावेळी एकच माणूस जेमतेम वावरू, झोपू शकेल अशी ती अंधार कोठडी. भिंतीवर अगदी वरच्या बाजूला एक लहानशी खिडकी. जेलची रचनाच अशी की समोरासमोरच्या खोल्या एकमेकांना पाठमोऱ्या. खोल्यांच्या दगडी भिंती भक्कम आणि बाहेर लोखंडाचे मजबूत दार. बाहेरून कुलूप लावायची कडी सरळ भिंतीत घुसवलेली. स्वातंत्र्यासाठी हे लोक काय साहस करतील याचा नेम नाही म्हणून एवढा बंदोबस्त केलेला असावा. आम्ही तिथे ‘ने मजसी ने….’ जयोस्तुते श्री महन् मंगले….’ अशी गाणी म्हणून श्रद्धांजली वाहिली. अनेक ज्ञात- अज्ञात वीरांना मनोमन, मनःपूर्वक नमस्कार केला.
ध्वनीप्रकाश शोमध्ये पूर्व इतिहासावर प्रकाश पाडला आहे. अपार कष्ट भोगणारे, कदान्न खाणारे, कोलू पिसणारे, उघड्या पाठीवर फटके खाणारे, वंदे मातरम् म्हणत हसतमुखाने फासावर जाणारे ते कोवळे जीव हृदयात कालवाकालव निर्माण करतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय विज्ञाननिष्ठ होते. आधुनिक विचार व विज्ञान आपलंसं केलं तरच राष्ट्राची प्रगती होईल. राष्ट्र कणखर सुसज्ज व बलवान हवं अशीच या साऱ्या थोर नेत्यांची शिकवण होती. गोरगरीब, कष्टकरी, दलित या साऱ्यांबरोबर माणुसकीने वागण्याची, शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अशी त्यांची शिकवण होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हे विचार आपण पूर्णतः आत्मसात करू शकलो नाही याची खंत वाटली.
देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आज अंदमान- निकोबार बेटांना अतिशय महत्त्व आहे. निकोबार ही संरक्षित बेटं आहेत. आपल्या हवाई दलाचा तळ इथे आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या निकोबार बेटाचं दक्षिण टोक जे कन्याकुमारीपेक्षाही दक्षिणेला होतं त्याला इंदिरा पॉईंट असं नाव दिलं होतं. २००४ सालच्या त्सुनामीमध्ये हे स्थान सागराने गिळंकृत केलं. अंदमानला आपल्या नौदलाचा तळ आहे. तसंच तटरक्षक दलही आहे. त्यांची अति वेगवान व अत्याधुनिक जहाजं सतत समुद्रावर गस्त घालित असतात. किनाऱ्याजवळ फ्लोटिंग डॉक आहे. त्याचे १६ अवाढव्य टँकर्स पाण्याने भरले की ते डॉक समुद्राखाली जातं. मग डॉकच्या वरच्या प्लॅटफॉर्मवर दुरुस्तीसाठी बोटी घेतल्या जातात. बोटीची दुरुस्ती, देखभाल होऊन ती बाहेर पडली की टँकर्समधलं पाणी काढून टाकलं जातं व डॉक पुन्हा समुद्रावर येतं
अंदमान – भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈