सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 37 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
अंदमान आता प्रवासी स्थान झालं आहे. जैवविविधतेने नटलेला निसर्ग, अनेक दुर्मिळ झाडं, प्राणी, पक्षी, जलचर असा दुर्मिळ खजिना इथे आहे. वर्ल्ड हेरिटेज म्हणून आणि इको टुरिझम म्हणून अंदमानला मान्यता मिळाली आहे. इथे सेंटेनल, जारवा, ओंगे, ग्रेट निकोबारी अशा आदिम जमाती आहेत. त्यांना एकांतवास व त्यांची जीवनपद्धतीच प्रिय आहे. आपण प्रवाशांनी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप न करता, तिथल्या श्रीमंत निसर्गाला धक्का न लावता, तिथल्या टुरिझम बोर्डाच्या नियमांप्रमाणेच वागणं आवश्यक आहे. इथले आदिवासी हे मानववंशशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांना इथलं प्राणी व पक्षी जीवन, सागरी जीवन, विविध वृक्ष, त्यांचे औषधी उपयोग यांचं पारंपरिक ज्ञान आहे. या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कलाने उपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे.
पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेला वांडूर बीच जवळ लहान मोठी पंधरा बेटे मिळून ‘महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क उभारण्यात आलं आहे. इथली सागरी संपत्ती पाहिली की निसर्गाच्या अद्भुत किमयेला दाद द्यावीशी वाटते. कोरल्सचे असंख्य प्रकार इथे बघायला मिळतात. आपल्या मेंदूसारखे लाटालाटांचे कोरल, बशीसारखे, झाडासारखे असे विविध आकारांचे कोरल्स आहेत. विंचवासारखा, वाघासारखा, सार्जंट, गिटार, वटवाघुळ, फुलपाखरू यांच्या आकारातील मासे आहेत. पोपटाच्या चोचीसारखे तोंड पुढे आलेले हिरवट पॅरट मासे आहेत. हे सारे जलचर एकमेकांशी सहकार्याने राहतात. सी-ॲनम हा जलचर खडकाला चिकटून राहतो तर जोकराच्या आकाराचा मासा त्याला खायला आणून देतो व सी-ॲनम जोकर माशाला खडकाचं घर देतो.काळ्या चंद्रकलेवर मोती जडवावे तसे काळ्या छोट्या माशांवर स्वच्छ पांढरे ठिपके होते. एका प्रचंड व्हेल माशाचा सांगाडा ठेवला आहे.
सेल्युलर जेलजवळ आता अंदमान वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं आहे. त्यात मोटार बोटी,पॅडल बोटी, वॉटर स्कूटर्स,स्किईंग वगैरे प्रकार आहेत. पोर्ट ब्लेअर जवळील चातम आयलंडला एका पुलावरून गेलो. इथे आशियातील सर्वात जुनी व सर्वात मोठी सॉ मील आहे. रेडवूड, सागवान, सॅटिन वूड, ब्लॅक चुगलम, थिंगम, कोको, महुआ, जंगली बदाम, डिडु अशा नाना प्रकारच्या वृक्षांचे भले मोठे घेर असलेले ओंडके ठेवले होते. दुसऱ्या महायुद्धात या मिलच्या काही भागाचं नुकसान झालं. हे मोठमोठे लाकडी ओंडके कापणाऱ्या, धारदार, विजेवर चालणाऱ्या करवती होत्या. यातील काही लाकूड इमारत कामासाठी तर काही फर्निचर व कोरीव कामासाठी,बोटी बनविण्यासाठी वापरण्यात येतं. पूर्वी रेल्वे रूळांचे स्लीपर्स बनविले जात. तिथल्या म्युझियममध्ये रेडवूडपासून बनविलेले कोरीव गणपती, देव्हारे, पुतळे, घड्याळे अशा सुंदर वस्तू आहेत. तिथून मानव विज्ञान संग्रहालय पाहायला गेलो. अंदमान- निकोबारच्या आदिवासींच्या वापरण्यातल्या वस्तू म्हणजे बांबूच्या चटया, पंखा, झाडू, टोपली मशाल, बाण, तिरकमठा, हुक्का, मधपात्र, बरछी, मासे पकडायची जाळी, सामुदायिक झोपडी, लाकडाची डोंगी म्हणजे होडी, झाडाच्या सालींच्या पट्ट्या रंगवून त्या डोक्याला व कमरेला गुंडाळायचे वस्त्र, शंख- शिपल्यांच्या माळा, कवड्यांच्या माळा, सुंभाचे बाजूबंद, समुद्र कोरलचे पैंजण, लाल मातीने चेहऱ्यावर केलेले पेंटिंग,नृत्याचे रिंगण अशा वस्तू, पुतळे पाहिले की आदिम काळापासून स्त्रियांची नटण्याची हौस आणि उपलब्ध सामग्रीतून जीवनोपयोगी वस्तू बनविण्याची मानवाची बुद्धी लक्षात येते.
रॉस आयलँड ही ब्रिटिशांची जुनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राजधानी होती. तिथे ब्रिटिशांनी घरे, स्विमिंग पूल, चर्च, जिमखाना, क्लब, ओपन एअर थिएटर सारं काही उभारलेलं होतं. नारळाची व इतर अनेक प्रकारची झाडं आहेत. हरणं व बदकं फिरत असतात. विहिरी व जपानी सैन्याने खोदलेले बंकरही बघायला मिळाले. आता हे बेट आपल्या नौदलाच्या ताब्यात आहे. वायपर आयलंड इथे कैद्यांना फाशी देण्याची ब्रिटिशकालीन जागा आहे. तसंच स्त्री कैद्यांसाठी तिथे तुरुंग बांधण्यात आला होता. आमच्या गाईडने अगदी तन्मयतेने त्या काळातील राजकीय कैद्यांचा त्याग, त्यांनी भोगलेल्या शिक्षा आमच्यापुढे शब्दातून उभ्या केल्या. त्या अज्ञात शूरवीरांना आम्ही ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ असं म्हणत आदरांजली वाहिली.
नॉर्थ बे आयलंड इथे स्नॉर्केलिंगची मजा अनुभवता आली. आपल्याला डोळ्यांना विशिष्ट प्रकारचा चष्मा लावायला देतात. त्यामुळे नाकपुड्या बंद होतात. आपण दातांमध्ये धरलेल्या नळीचं तोंड समुद्राच्या वरच्या पातळीवर राहतं. आपल्याला तोंडाने श्वास घ्यायला लागतो. तेथील प्रशिक्षकाच्या सहाय्याने पाण्यावर तरंगत हा निसर्गाचा खजिना बघायला मिळाला. या भागात किनाऱ्याजवळच खूप प्रवाळ बेटे आहेत. पाणी संथ व स्वच्छ असल्यामुळे नाना तऱ्हेचे व रंगाचे छोटे-मोठे मासे सुळकन इकडे तिकडे फिरताना दिसत होते. बटरफ्लाय, टायगर, गोल्डन टेट्रा असे मासे झुंडीने फिरत होते. स्पंजसारखे जिवंत कोरल्स होते. त्यांना स्पर्श केल्यावर ते तोंड उघडत. त्यांचा फिका जांभळा रंग व तोंडात छोटे छोटे गोंड्यासारखे जांभळ्या रंगाचे पुंजके दिसले.
अंदमान – भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈